बापाचा दिवस

जून महिन्याचा तिसरा रविवार अख्ख्या जगाने बापजाद्यांच्या उत्सवासाठी राखून
ठेवलाय. एरव्ही बापाचा दिवस सहसा कोणताही पोट्टा 'साजरा' करतांना दिसत नाही.
मात्र बापाचा 'दिवस घालायला' सगळी चिरंजीव मंडळी न चुकता हजर होतात. कारण
त्याच दिवशी इस्टेटीच्या लॉटरीची सोडत असते!
असो. त्यामुळे काही फादर्स
डे चं महत्व कमी झालेलं नाहीये. 'पप्पा वेडुल्या' मुली आजही मोठ्या उत्साहाने
आपल्या डॅड करिता काहीतरी 'हटके' भेटवस्तू खरेदी करण्यासाठी गिफ्ट
आर्टिकल्सची अनेक दुकाने या दिवशी पालथी घालतांना दिसतात.
मातृदिनाइतका
प्रतिसाद पितृदिनाला मिळत नसतो हे मात्र खरे. मुळात मातेविषयी अपत्यांना
जन्मजात वाटणारे ममत्व पित्याप्रति अपुरेच ठरते. बाप म्हणजे स्वैर पोरांना
वठणीवर आणणारे हत्यार अशी कुटुंबाची एकंदर समजूत असते, धारणा असते. बापाचा
दरारा, भिती, दडपण यांमुळे 'म्हाताऱ्‍या'चा दिवस आवर्जून साजरा केला जात
नसावा. त्याउलट 'म्हातारी'चा मदर्स डे खूपदा गौरविला जातो. याला कारण म्हणजे
म्हातारी मोठ्या कामाची असते. पोरंटोरं सांभाळणे, घरकामाला हक्काची बाई,
घरादाराला राखण असे आईचे खूप फायदे आहेत. त्यातुलनेत 'बा' म्हणजे भुईला
भारच ठरतो. म्हणूनच बहुदा गृहस्थाची श्रमपूर्वक कामे करून थकलेला बाप
त्याच्या 'पडत्या काळात' वृद्धाश्रमात पाठविला जातो. अशी काही उदाहरणे मी
माझ्या डोळ्यांदेखत अनुभवली आहेत...
आमच्या गल्लीतील मोडकळीस आलेल्या
मंदिरात असे तीन चार अगतिक म्हातारे त्यांच्या पोरांनी बेवारशी अवस्थेत
सोडलेले पाहिले आहेत. एकेकाच्या करूण कहाण्या ह्रदय हेलावून टाकणाऱ्‍या.
ती आंधळी, लुळी, पांगळी 'बापमाणसं' अगदी लाचार होऊन देवळापुढे येणाऱ्‍या
जाणाऱ्‍याला भीक मागून जगायची. गल्लीच्या प्रत्येक घरातल्या शिळ्या
टुकड्यांचे 'धनी' ही म्हातारी माणसं असायची. काय ह्यांच्या सुशिक्षित
पोरासोरांना फादर्स डे ही संकल्पना माहीत नसेल? ही चिंता मला सतावते. कोठे
त्या फादर्स डे च्या पाश्चात्यांच्या जंगी पार्ट्या अन् कोठे ही आपली
म्हातारी कोतारी माणसं? प्रत्येक भारतीय 'फादर'चा डे शेवटी असा तसाच जाणार
की काय? हाही प्रश्न उभा ठाकतो.
बाकी आम्हांला आमच्या बापजाद्यांविषयी
नितांत आदर आहेच म्हणा. त्यांनी आम्हांला फक्त काटेकोर शिस्तच लावली असे
नाही तर जगात चालायचं कसं, वागायचं कसं हेही शिकवलं. प्रत्येक गोष्ट
मूळापासून समजावून दिली. म्हणून त्यांच्या बद्दल असणारी आपुलकी अशा फादर्स
डे नामक भपकेबाजीच्या माध्यमातून व्यक्त करायलाच हवी हे मात्र पटत नाही.
अर्थात्
बापाचा दिवस साजरा करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी
फादर्स डे च्या निमित्ताने आम्हीही आता जोरात ओरडू शकतोच की, 'बापमाणसांचा
विजय असो!'