सप्तरंगी इंद्रधनुष्य

सप्तरंगी इंद्रधनुष्य

बालपणातील एक दिवस, दुपारची 3-4 ची वेळ असावी. श्रावणातला तो ऊन - पावसाचा पाठशिवनीचा खेळ सुरू होणार होता. पाहता पाहता आकाशात काळे काळे ढग जमून आले. थोड्याच वेळात पावसाच्या टपोऱ्या थेंबाचे धरती वर आगमन झाल. विजांमुळे ढग गडगडायला लागले होते. सोसाट्याचा वारा सुरू झाला होता. लवकरच सरीवर सरी पडायला लागल्या. पावसात भिजायची फार इच्छा होत होती. पण आईच्या नजरेचा पहारा दरवाज्यावर होताच. त्यामुळरे तसल्या वातावरणात जायची काही संधीच नव्हती. पावसात भिजायचा प्रयत्न केला पण असफल ठरला. खुंटिला अडकवलेली छत्री जवळ घेतली. पण, म्हणे पाऊस थांबल्या वर बाहेर जा.
 
 एक दीड तासात पाऊस थांबला. मातीचा सुगंध वातावरणात दरवळत होता. जणू त्या निसर्गाच्या हातून थोड अत्तर जमिनीवर पडल असाव. घरट्यातल्या पक्ष्यानी पुन्हा गगनात भरारी घेतली होती. पाऊस गेल्यावर सुद्धा डोक्यावर छत्री घेऊन बाहेर पडण्याचे ते लहानपणीचे दिवस. त्या पावसाच्या पाण्यात कागदाची होडी सोडायला फार मजा वाटत होती. वातावरणात गारवा निर्माण झाला होता. थोड्या थोड्या वेळात सूर्यनारायण ढगांमध्ये लपत होते.  

सप्तरंगी इंद्रधनुष्याच गगनात आगमन झाल. घरातल्या कुणाचही लक्ष नसलेल्या त्या इंद्रधनू कडे माझ लक्ष गेल. पुस्तकात बघितलेला तो इंद्रधनू त्यावेळी प्रत्यक्ष डोळ्यानी पाहत होतो. त्या इंद्र धनुष्यात काय होत काय माहीत? पण फारच त्याच नवल. मनाला खुप खुशी होत होती. जणू त्या धनुष्याने माझ्यावर जादुच केली होती. फार सुंदर दिसत होता. मनाला भावत होत. खुप कुतूहल वाटत होत. कदाचित, त्यावेळी मी लहान असल्यामुळे वाटत असाव. तो धनुष्य बारा ही महिने आकाशात राहिला तर?
 
मी तर आनंदाने  भाराउन गेलो होतो. राहुल माझा लहानपणीचा मित्र. त्याला सुद्धा तो आकाशातला इंद्रधनुष्य दाखवावा अस वाटत होत. तो इंद्रधनुष्य  आकाशातून थोड्याच वेळात अदृश्य तर होणार नाही ना? असा विचार येत होता. पाऊस तसा थांबलाच होता. पावसाच पाणी रत्यावरून वाहत होत. माती रत्यावर जमली होती. सारा केर कचरा पाण्यानी वाहून जात होता. जणू त्या पावसात धरणी आई स्वच्छ न्हाउन निघत होती. आकाशातल्या त्या इंद्रधनुबद्दल राहुल ला सांगण्यासाठी हरिणा सारखा पळत सुटलो.

रस्त्यानी धावत धावत असताना अचानक पायात काहीतरी रुतल. हरीणा सारख धावण काही काळापुरत थांबल. पाय काही पुढे सरकत नव्हता. रत्याच्या बाजूला एका दगडावर बसलो. पायात बेला च्या झाडाचा काटा रूतला होता. एका हातानी पाय पकडून दुसऱ्या हातानी काटा काढला. पायातून लाल रक्त निघत होत. डोळ्यात पावसाच्या सरी यायला सुरवात होणार होती. पण रडण्यासाठी आवाजच निघत नव्हता. डोळे पानावले होते. हाताने डोळे पुसले. लक्ष सार त्या इंद्रधनुष्याकडे. तो अदृश्य तर होणार नाही ना? दगडाच्या बाजूला कंबर मोडीच झाड दिसल.4-5 पाने एकत्र करून त्याचा रस पायाला लावला. चालता काही येत नव्हत. पायात फार दुखत होत. पण तो इंद्रधनुष्य त्यावर मायेने फुंकर घालत होता.

एका पायाने लंगडत लंगडत राहुल ला गाठल. त्याला सुद्धा तो आकाशातला इंद्रधनुष्य दाखवला. दोघाना ही फार आनंद होत होता. त्या इंद्रधनुकडे पाहता पाहता पायाच दुखण बंदच झाल. पाण्यात टाकलेल्या मिठाच्या खड्याप्रमाणे दुखण आनंदात विरघळून गेल होत. आम्ही एकटक त्या इंद्रधनुकडे पाहत होतो. आणि थोड्याच वेळात तो इंद्रधनुष्य आकाशातून अदृश्य झाला. तितक्यातच सुर्यनारायण डोंगरा पलीकडे जायला लागले. सायंकाळला सुरवात झाली होती. आम्ही दोघेही आनंदाने आपापल्या घरी परतलो.
 
त्या इंद्रधनुष्याने अदृश्य होताना सांगितल की मानवी जीवन हे सुद्धा विविध रंगी आहे. जीवनाचे वेगवेगळे रंग आयुष्यात पाहायला मिळतील. जीवनातल्या निरनिराळ्या रंगाकडे आनंदाने बघायला सांगत होता. छोट्या –छोट्या गोष्टीच विनाकारण दुखः न करता आनंदाने जगायला सांगत होता. अजूनही तो इंद्रधनुष्य पावसाळ्यात कधी-कधी मला दिसतो. पुन्हा त्या दिवसाची आठवण करून देतो. त्याला बघून लहानपणी झालेला आनंद आणि काटा रुतलेल्या आठवणी अजूनही हृदयात तश्याच आहेत. पण अजूनही मला तो इंद्रधनुष्य तेच सांगतो. या पावसाळ्यात मिळालच तर त्या ढगांमधल्या सप्तरंगी इंद्रधनुष्याकडे बघा. तुम्हालाही तो हेच सांगेल की, "हे जीवन फार सुंदर आहे आनंदाने जगा ".