सारेचि देखिले वैभव ... (बाबा महाराज आर्वीकर)

सारेची देखिले वैभव सुखाचे। भोगिल्या आशेचे अनुभवे ॥धृ॥

उत्तम वाहनी हिंडलो स्वैर। भरविला दरबार वैभवाचा ॥१॥

वस्त्र मूल्यवान पायतळी माझ्या। वैभवाचा राजा अनुभविला ॥२॥

श्रीमंती नुरली जगामाजी कोठे। राजेपण दिठे मज पाहता ॥३॥

गज अश्वरथ झुलविले दारी। साक्ष हरिद्वारी अजुनी आहे ॥४॥

सेवकांचे तांडे चाले मागेपुढे। पाही चहुकडे वैभवासी ॥५॥

जेथे जावे तेथे मानची मिळे हो। विजय पताका फडके माझी ॥६॥

दरिद्रीही आम्ही सुखविले फार। नदीनाले डोंगर अनवाणी ॥७॥

उघड्या अंगाने फिरलो सर्वत्र। वैभवाला परत पाठविले ॥८॥

गिरीकंदराशी शिरलो भुयारी। घोर वनांतरी फिरलो आम्ही ॥९॥

मैत्री श्वापदांची प्रेमे आम्ही केली। एकांती देखिली माझी मूर्ती ॥१०॥

भिक्षा दारोदार कराया हिंडलो। स्वानंदे भरलो माझ्या अंगे ॥११॥

नाही भीती आम्हा सुख सामग्रीची। ठेव समाधानाची बापे दिली ॥१२॥

साता दिवसांचे पडले उपवास। तरी ना सायास घडले काही ॥१३॥

तीन दिवसांची शिळी भाकरी ती। आनंदा भरती आणावया ॥१४॥

लंगोटीही आम्हा नव्हती एकदा। हर्षानी सदा झाके अंग ॥१५॥

दारिद्र्याचा राजा वैभवाचा स्वामी। अहर्निश स्वामी भरलो ऐसा ॥१६॥

एकटा चाललो महापुरांतरी। शिवालयांतरी ओमकारीच्या ॥१७॥

रत्नांचा मुकुट महंत म्हणोनी। घातला वृंदावनी सार्या संती ॥१८॥

तैसेची सुखाने पादत्राण डोई। ठेविले मी पाही जनार्दन ॥१९॥

पायी तुडविला बर्फाचा डोंगर। धनाचे ढिगार ठायी ठायी ॥२०॥

- प. पू. बाबा महाराज आर्वीकर

(पुढे चालू ...)