पुणेरी आजोळ-३

एका दिवाळीला आम्ही पुण्याला जायला निघालो.
'दिवाळीला पुन्यात लै मज्जा येती नव्हं?' मी मागचे दुर्लभानुभव पूर्णपणे
विसरलोच होतो.
'हो. पण मागच्या वेळेसारखा गोंधळ घालायचा नाही काय?' आईने बजावलं.
'न्हाई घालायचो. आक्शी देवावानी बसन.'
'हं. आता ते किल्ला तयार करतील, तोच बघायचा. काय?'
'किल्ला बनिवणार? मंग तं बगायाच पायजेल त्येंचं गौंडीकाम.' पुण्याची पोरं
किल्ला कसा बांधित असतील? तो केवढा मोठा असेल? त्याची भिंत किती जाडजूड
असेल? अशा उत्सुकतेपोटी मला ती बस खूपच संथगतीने चाललीय असे वाटत होते.
मामाचे घर आले तसे मी आजुबाजूला मोठे चिरे, सिमेंट, वाळू दिसतीय का याचा
शोध घेत होतो. पण सगळीकडे सामसूम होती. अखेर मी वाचा फोडलीच, 'मामा किल्ला
कवा बांदायचा?' तो हसू लागला.
'किल्ला बांधायचा नसतो काही, तयार करायचा असतो.' मामेभावाने माहिती दिली.
बांधणे की तयार करणे? माझ्या विचारांची गल्लत झाली. मी गप्प बसून जे घडेल
ते पहायचं ठरवलं.
दुसऱ्‍या दिवशी चाळीतल्या पोरांची लगबग सुरु झाली. नंबर एकच्या रूमजवळचा
कोपरा किल्ल्यासाठी सर्वाँना पसंत पडला. मग छोटे मोठे दगड, विटांचे तुकडे
कोपऱ्‍यात जमा होऊन त्याचा त्रिकोणी ढीग तयार झाला. त्यानंतर दोन मोठ्या
मुलांनी पलिकडच्या शेतातील दोन पोती माती सायकलवर वाहून आणली. त्याचं आळं
करून चिखल तयार होऊ लागला. इथपर्यँत माझी हाताची घडी तोंडावर बोट होतं.
परंतु चिखल माझी आवडती गोष्ट असल्याने आता त्या दगडांच्या ढीगावर चिखलगोळे
थापायला सर्वाँत पुढे मीच होतो.
'च्यायला किल्ला तय्यार करायचं काय आवगड न्हाई बॉ.' रप्पकन एक गोळा दगड
विटांवर मारीत मी म्हणालो. त्याचे शिंतोडे इतरांच्या अंगावर उडाल्यावर ते
ओरडले- 'अरे हळूच. अंगावर उडतंय की. नाहीतर तूच कर किल्ला' असं म्हणत ते
बाजूला सरले.
'बरं बाबांनु तुमीच थापा चिकुल' मीच माघार घेतली.
'एक काम करतु बर का रं. फक्कड गंपती बनिवतो. किल्ल्यावं ठेवाया व्हईल'
माझ्या या वक्तव्यावर मोठा हशा उसळला. मी गोरामोरा झालो.
'अरे बाबा, किल्ल्यावर गणपती कशाला ठेवायचा? इथे कुठे मंदिर आहे?'
'आमच्याकडं डोंग्रावरतीच देवळं अस्तात बब्बा.' मी ठासून सांगितल्यावर
पुन्हा खसखस पिकली.
'आमच्याकडं डोंगरावर किल्लेच असतात बब्बा' एकानं माझी तंतोतंत नक्कल केली
अन् पोरांनी पुन्हा फिदीफिदी करून घेतलं.
'अरे मित्रा, किल्ल्यावर शिवाजी महाराजांना ठेवायचं असतं.' एकानं मला
समजावून सांगितलं.
'मंग शिवाजीला खुर्ची कुटं ठेवायची?' यावरही पोरांनी हसूनच घेतलं.
'शिवाजी खुर्चीवर बसत नाहीत काही. सिंहासनावर आरूढ होत असतात.' मोठ्या
मुलानं माझी कानउघाडणी केली. मग मात्र मी चुप्प बसून चिखलाच्या गोळ्याला
आकार देत बसलो. बराच वेळ त्यांचा किल्ला बांधून होता. अचानक कोणाचं तरी
माझ्याकडे लक्ष गेलं.
'अर्रे व्वा! किती छान खेळणी बनवलीत बघा ना ह्यानं'
'वाव! मस्तच. सुंदर खेळणी केलीत.'
'आरं ये पोरांनु, ह्यी काई खेळणी न्हाईये. दिसत न्हाय काय? ह्यो कुतरा
हाये, ह्यो कोंबडा आन ह्ये गाढाव.' पुन्हा हशा झाला.
'हास्ता कामून? ह्ये समदं किल्ल्यावरती ठिवायचं.'
'वेडा रे वेडा. कुत्रं किल्ल्यावर कधी असतं का?'
'असतं की. आमच्याकडं डोंगरावर मगर सुद्धा असते बब्बा. हाऽ हाऽ हाऽ' एकानं
पुन्हा माझी नक्कल केली. मी चिडलो. तणतणत घरात शिरलो. ह्यांना गावठी इंगाच
दाखवायचा असं ठरवून टाकलं...
सकाळी पहाटे लवकर उठून मी किल्ला गाठला. कोणी पाहत नाही ना याची खात्री
करून माझं काम फत्ते केलं अन् काही घडलेच नाही अशा अविर्भावात पुन्हा घरी
येऊन झोपलो.
सकाळी सवंगडी जमले. फटाके उडवणं सुरु झालं. मी बाजूलाच थांबून त्यांची
पळापळी पाहत राहिलो. थोड्यावेळाने कोणाचं लक्ष नाही असा अंदाज घेऊन मी वात
पेटवून दिली. सुर्र सुर्र करीत ती अपेक्षित ठिकाणी पोचली अन् धडाम आवाज
होऊन किल्ला भुईसपाट झाला. जो तो घाबरून घरात पळाला होता. काय झालं कळत
नव्हतं. 'किल्ला कोसळला’, 'गड पडला’, अशी ऐतिहासिक वाक्ये ती पोरं
माझ्याकडे पाहून मोठ्याने एकमेकांना सांगत होती.
असला गनिमीकावा किंवा असलं मोगली कारस्थान माझ्या व्यतिरिक्त कोणीच करू
शकणार नव्हतं म्हणून सर्वांनी माझ्याशी कट्टी घेतली. मला जरा वाईट वाटलंच.
परंतु माझी नक्कल करून ते सर्वजण हसल्यामुळेच मी हा डाव टाकला होता.
त्या दिवशीच दुसऱ्या मामाकडे जायचं असल्यामुळे पुढे त्या किल्ल्याची
किल्लेदारी कोणी शिरावर घेऊन पूर्ण केली हे पाहायला मी हजर नव्हतो....