तीन बेडूक

तीन बेडूक
एकदा एका कोरड्या विहीरीत तीन बेडूक पडले. विहीर बरीच खोल होती. त्यामुळे उड्या मारून किंवा चढून वर येणे शक्य वाटत नव्हते. विहीरीत खाण्यासाठी काही खास दिसत नव्हते. थोड्या फार माशा, किडे, काही हिरवे कोंभ वगैरे असावेत. त्यातल्या हुशार बेडकांनी लगेच सर्व परिस्थीती ताडली. जर खाद्यपदार्थांमध्ये सर्वांचा वाटा पडला, तर लवकरच उपासमारीची पाळी येणार! हुशार बेडूक मठ्ठ बेडकाला म्हणाले "तू असे कर.... तू सर्वात बारीक आहेस. उंच उंच उड्या मारून विहीरीबाहेर पडण्याचा प्रयत्न कर. जर कसोशीने प्रयत्न केला, तर तुला बाहेर नक्कीच पडता येईल. मग तू बाहेरून आमच्यासाठी मदत पाठवू शकतोस. "
मठ्ठ बेडूक उंच उड्या मरून वर जाण्याचा प्रयत्न करू लागले. हुशार बेडूक मोठमोठ्याने ओरडून त्याला प्रोत्साहन देऊ लागले. "हा हा! शाबास पठ्ठे, आणखीन जोरात.. " इकडे ओरडता ओरडता हुशार बेडकांचे विहीरीत असलेले अन्न खाणे सुरूच होते. हुशार बेडूक थोड्याच वेळात टम्म फुगले. मठ्ठ बेडूक दमून निपचीत पडले. हुशार बेडकांचे ओरडणे ऐकून एक साप तेथे आला. टम्म फुगलेल्या बेडकांना पहून लगेच त्याने ते बेडूक मटकावले. नंतर दमून निपचीत पडलेले मठ्ठ बेडूक देखील गिळंकृत करून तो साप तेथून दुसऱ्या भक्षाच्या शोधात निघून गेला.
बोध-
१) प्रॉडक्टीव कामे करणारे लोक एखाद दुसरेच असतात. बाकीचे फक्त गाजावाजा करणारे असतात.
२) प्रॉडक्टीव भासणारी कामे वास्तवात प्रॉडक्टीवच असतील असे नाही.
३) होणाऱ्या आणि न होणाऱ्या कामांचा गाजावाजा करून छोटे समूह लठ्ठ झाले की मोठे समूह त्यांना आपल्यात सामावून घेतात. (ऍक्वीजीशन)