ताण ...

"विनू अरे उन्हाळ्यात पुन्हा लावू ना केबल"

"आई प्लीज, अग मी फक्त डिस्कवरीच बघतो"

"हो, पण आता तुझा अभ्यास वाढला की नाही ? "

"पण म्हणून डिस्कवरी नाही बघायचं, टेबल-टेनिस नाही खेळायचं, मासिकं नाही वाचायची"

"असा रे काय करतोस ? मागच्या वर्षी तो ऋषी फक्त २ मार्कांनी मागे होता तुझ्या. "

"असू दे"

"असू दे काय ? पहिला नंबर गमवायचा आहे का ? "

".... "

"चल हे दूध घे अन जा ट्युशनला"

"शाळा, ट्युशन, क्लासेस, .... मला कंटाळा आला आहे... "

"काय रे कशाचा कंटाळा आला आहे? "

"बाबा, तुम्ही तरी सांगा ना आईला, प्लीज"

"तुझ्या डिस्कवरीचं ना ? "

"हो"

"मीच बंद केलंय कनेक्शन"

"पण मग मला काही करमणूकच नाही"

"शाळा सुरू असताना कशाला हवी करमणूक? मी ८ वीत असताना .... "

"बस झालं तुमचं पुराण"

"पुराण ? म्हणजे माझी मेहनत तुला फालतू वाटते ? अरे कधी पहिला नंबर सोडला नव्हता मी, म्हणून आज इतका यशस्वी आहे मी. आज हा पैसा दिसतोय ना ती माझी मेहनत आहे, तुझ्यासारखा टीव्ही पाहत अन टेनिस खेळत बसत नव्हतो मी"

"पैसा काय चाटायचा आहे ? "

"विन्या ....... खूप बोललास.... तुझी जीभ जरा जास्तच चालायला लागलीय. "

"हो ? मग हासडून टाका एकदाची"

"विन्या......."

"अहो, प्लीज मारू नका त्याला"

"तूच त्याला शेफारून ठेवलंय"

"तू जा रे ट्युशनला"

"जातो... पण मला डिस्कवरी नाही मिळालं तर .. "

"आता बघतोच मी कसा बघतो तू टीव्ही ते... "

******************************************************

"अहो... "

"उं... "

"अहो उठा ना ... चार वाजले.. "

"ए तू मूर्ख आहेस का ? चार वाजता मला काय उठवतेस ? मला नाही तुझ्या लाडक्या लेकाला अभ्यास करायचा आहे, त्याला उठव. मला झोपू दे"

"अहो म्हणूनच उठवतेय"

"काय कटकट आहे, काय झालं?"

"अहो तो दार उघडत नाही आहे. "

"हा नं जरा जास्तच करायला लागला आहे. मी बघतो असा कसा उठत नाही ते... "

"ए विन्या, ऊठ... दार उघड... "

"विनू दार उघड रे ... "

"विन्या ........ आता उठतोस की दार तोडू मी ? "

"अहो... ही किल्ली... "

"हं .......... आतून चिटकणी लावलीय लेकानं, थांब जरा, मी धक्का दिला की लगेच उघडेल बघ... "

"विन्या ........ ए ऊठ ... तोंडावर पाणी मार त्याच्या... "

"अहो, हा उठत का नाहीय ? विनू... ए बाळा, अरे ऊठ ना...."

"अहो काय झालं"

"नाडी चालू आहे, पण ... "

"अहो जरा खालच्या मजल्यावरच्या डॉ. शिंदेंना बोलावता का ? "

***************************************************************

"डॉ. शिंदे, मी शरद जाधव, ३०२ मधून बोलतोय.... हो ... माझा मुलगा .... अहो तो उठतच नाहीय हो ... हा प्लीज ... नाही अँब्युलन्स कशाला, माझ्याकडे गाडी आहे... तुम्ही येता का प्लीज ... "

****************************************************************

"डॉक्टर ... "

"काळजी करू नका ... पण झोपेच्या गोळ्या त्याच्या हाती कश्या लागल्या ? "

"माहिती नाही हो ... "

"मुलांवर जबरदस्ती कशाला करताय मि. जाधव ? ताणायचं किती याला काही मर्यादा ? "

"हो पण... आजकालच्या काँपिटिशन ... "

"पण मुलगाच नाही राहिला तर कसली काँपिटिशन अन कसलं काय ? "

"आय ऍम सॉरी डॉक्टर... "

"सॉरी मला नाही, त्याला म्हणा .... आणि मला वाटते, तुमचा मुलगा अभ्यासात कमी पडत नाही तर मग कशाला त्याचा आनंद हिरावून घेताय ? बाकी तुम्ही समजदार आहात .."

"हो ... आम्ही त्याला भेटू शकतो.. "

"हो पण .... त्याला झोपू द्या... उठवू नका "

*******************************************************************

"अरे विनय, ये ये .... काय म्हणतोस ? कसं वाटतंय आता ? "

"एकदम छान... काका तुम्ही होतात म्हणून वाचलो मी ... "

"अरे काहीतरीच काय ? बाबा काय म्हणतात ? डीस्कवरी सुरू झालं का ?"

" हो आणि टेबल टेनिससुद्धा ... आता ते रागवत नाही... पण तुम्हाला केलेलं प्रॉमिस मी पाळणार हा ... पहिला नंबर नाही सोडणार ... "

"शाब्बास !!! "

"आणि काका, एक स्पेशल थँक्यू ... "

"आता हे कशाबद्दल ? "

"त्या जायफळासाठी ...  "