कुरडई

  • गहू २ वाट्या
  • हिंग
  • मीठ
  • पाणी
  • तेल
३० मिनिटे
२ जण

२ वाट्या गहू पाण्यात  ३ दिवस भिजत घाला. रोज एकदा पाणी बदला. ४ थ्या दिवशी मिक्सर ग्राईंडर मधून गहू वाटा. गहू वाटताना त्यात थोडे पाणी घाला. एका भांड्यामध्ये थोडे पाणी घ्या व त्यात हे वाटलेले गहू घालून सपीटाच्या चाळणीने गाळून घ्या. गाळलेले गव्हाचे पाणी एका भांड्यात जमा होईल व वर राहिलेले गव्हाचे मिश्रण परत एकदा पाणी घेउन ते चाळणीने परत चाळून घ्या. हे गव्हाचे वाटलेले मिश्रण आहे ते हाताने पिळून ते पाणी सपीटाच्या चाळणीत ओता. असे २-४ वेळा केले की जे पाणी भांड्यात जमा होईल ते एक दिवस तसेच राहू देत. नंतर दुसऱ्या दिवशी भांड्यातले वरचे पाणी काढा. खाली पांढरा शुभ्र गव्हाचा साका जमा होईल. तो साधारण लाप्शीइतका दाट असेल. साका १ वाटी असेल तर पाणी १ वाटी घ्या. एका वाटीच्या पाण्यात थोडा चवीपुरता हिंग घाला. तसेच मीठही घालून पाणी एका भांड्यात घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवा. उकळी यायच्या आत गव्हाचा एक वाटी साका त्यात घालून लगेच पटापट ढवळा. गुठळी होऊन देऊ नका. नंतर गॅस मंद आचेवर ठेवा व त्यावर झाकण ठेवा. वाफेवर चीक तयार होईल. २-३ दणदणीत वाफा द्या.

हा चीक गरम असतानाच सोऱ्यात घालून कुरडया घाला. कुरडया घालताना सोऱ्याला तेलाचा हात लावा. खाण्यासाठी हा चीक उत्तम लागतो. चीकामध्ये गोडतेल घालून खा. खूप पौष्टिक व चविष्ट आहे हा चीक.

 कुरडया कडक उन्हात वाळवा. सणासुदीला पानात डावीकडे तळण या प्रकारात कुरडई तळून ठेवा.

सौ आई