स्त्रियांचे वर्चस्व

आमच्या नदीकाठाला लागून एक झोपडपट्टी आहे. आडवी तिडवी वाढलेली, कोणाची
भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी. याच वस्तीत एक 'अफलातून' जमात
राहते. ह्या जमातीत पूर्णपणे स्त्रियांचं राज्य आहे, त्यांचीच हुकूमत
चालते, त्या म्हणतील ती पूर्वदिशा मानली जाते. पुरुषाला दुय्यम लेखलं जातं.
त्याच्यावर अधिकार गाजवला जातो!
घरातली म्हणजे झोपडीतली छोटी मोठी कामे तोच करतो. पोरं सांभाळणे, धान्य
निवडणे, दळून आणणे, धुणी धुणे, भांडी घासणे, पोरांचं आवरणे (त्यात शी शू
आलेच.) इ. इ. (स्वयंपाक तेवढाच काय तो स्त्रिया करतात.)
बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच. त्या जर मध्यमवयीन किंवा वयस्कर
असतील तर त्यांच्या कमरेला पैशांची हातभर लांबीची चंची असते. जर तरुण
स्त्रिया असतील तर त्यांच्या कंचुकीत नोटांची तिजोरी असते. बिडीकाडीचं
व्यसन सहसा पुरुषांना नसतं. चुकून असेल तर लाचारासारखे बायलीकडे
व्यसनपूर्तिसाठी पैसे मागावे लागतात. त्याची बायको त्याला दुसऱ्‍या
दिवसापर्यंत तंगवते. ज्यावेळी तो तिला हवं तसं वागेल, तिला पाहिजे ते पूर्ण
करील तेव्हाच तो बक्षिसीचा हकदार बनू शकतो. त्या अक्षरशः नवऱ्‍याला राबवून
घेतात. मटण मच्छीचा स्वयंपाक करायला लावतात. ते सामिषान्न पोटभर खाऊन
आत्मा थंड झाला की त्या त्यांच्या तिजोरीतून नोटांची बंडले बाहेर काढतात.
त्यातील दहा वीसची नोट नवऱ्‍याच्या अंगावर भिरकावतात.
इतकेच काय त्यांच्या हुकूमाची तामिली वेळेत झाली नाही तर प्रसंगी त्याला
एखाद्या जाडसर सोट्याने यथेच्छ बदडून काढतात!
तुम्ही म्हणाल हे काय भलतंच सांगताय? परंतु हे सत्य आहे. कित्येक
नवरोबांच्या डोक्यातील फाटलेल्या जखमा मी स्वतः रात्री उठून शिवलेल्या
आहेत. असे पेशंट 'रात्रीच' का येतात या बद्दल माझी जिज्ञासा चाळवली. अनेक
पेशंट्सकडून, जाणकारांकडून मोठ्या 'खुबीने' कारणांचा शोध घेतला असता वेगळेच
विश्व समोर उभे ठाकले...
या जमातीच्या बायका विलक्षण बेफिकीर वृत्तीच्या, हुकूमशाही गाजवणाऱ्‍या,
तितक्याच धष्टपुष्ट अशा. गुंड मवाली ज्याप्रमाणे वागतात अगदी तश्शाच या
स्त्रियांच्या चालीरिती. ह्यांचा धंदाच दोन नंबरचा. म्हणजे गावठी दारू,
गांजा, ताडी विकणे वगैरे. त्यामुळे गुंडाड लोकांचा झोपडीत सदासर्वकाळ वावर,
नशेबाजांचा अविरत राबता. कधी कधी पोलिसांची अचानक रेड पडते तेव्हा माल
लपविण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागते. खूपच अंगावर बेतू लागलं की बायका
पोरासोरांना घेऊन पळून जातात, पोलिसांच्या हाती लागतो तिचा बिचारा नवरा.
महिना पंधरा दिवसांनी तो सुटतोही. परंतु बाईला त्याचं काही सोयरसूतक नसतं.
एकूण काय तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी नवऱ्‍याला केवळ शय्यासोबतीसाठी जवळ
ठेवलेलं असतं. हे फार भयानक वाटणार वास्तव आहे. नवऱ्‍याच्या बायकोवरील
अत्याचाराच्या अनेक बातम्या राकानेच्या रकाने भरून येत असतात. परंतु येथील
पुरुष कोणाकडे दाद मागणार?
आपल्या भोवतीचे मवाली जसे शर्टची बटणे खुल्ली ठेऊन मग्रुरीत चालतात,
त्याप्रमाणे ह्या बायकांचे पदर कधीच छाती झाकण्याकामी उपयोगी येत नाहीत.
पदराची गुंडाळी करून ती टंच उरोजांच्या घळईतून खांद्यावर टाकण्यातच त्या
धन्यता मानतात. अशी छाती पुढे काढून चालणे त्यांना कसे पटते कोणास ठाऊक?
काही बायका इतक्या व्यसनी की पहिल्या धारेचा माल चाखल्याशिवाय त्यांना
गल्ल्यावर बसता येत नाही. काही बायका ताडीही पितात, काही अफू चरस गांजा
यांच्या आहारी गेलेल्या आहेत. गांजाची सिगार ओढणे ही तर सर्रास आढळणारे
व्यसन. सिगारीतली निम्मी अधिक तंबाखू काढून घेऊन त्यात गांजा भरून ओढला
जातो. त्या धूराच्या दाट दमट दर्पानेच तो गांजा असल्याचे लक्षात येते. अशी
नशा बायकांच्या डोक्याबाहेर गेली की त्यांचं टाळकं सरकतं अन् नवऱ्‍याचं
रक्ताळतं. जणू काय ते त्यांचे गुलाम आहेत, अशी वागणूक नवरोबांना मिळत असते.
काही बाया जितक्या नखरेल तितक्याच चवचालही असतात. दारावर अनेक प्रकारची
गिऱ्‍हाईकं 'रुंजी' घालत राहतात. त्यातील एखाद्याशी तिची यारी होते.
दिवसाढवळ्या त्यांचे जमत जाते आणि त्यावेळी त्यांचे चाललेले ते खेळ उघड्या
डोळ्यांनी पाहण्याचं दुर्भाग्य नवरा नामक प्राण्याच्या भाळी लिहिलेलं
असतं...
( 'मिश्किली' मधून)