घड्याळ

तो आज जरा तिच्याशी भांडला,

तू सांगत नाहीस तुझ्या मनातलं मला म्हणाला,

तिला थोडं आश्चर्यच वाटलं;

बऱ्याच दिवसांनी याला तिच्याशी बोलावंस वाटलं.

तरीही तिचं चिडणं,

त्याच्या डोळ्यात डोकावणं,

असतो का तुला माझ्यासाठी वेळ,

हा त्याला अनुत्तरित करणारा प्रश्न विचारणं.

तो तरी किती बहाद्दर,

म्हणाला थांब जरा क्षणभर,

घेऊन आला एक गजराचं घड्याळ,

म्हणाला चोवीस तासांचा गजर लावलाय त्यावर.

असं घड्याळ लावून बोलायचं,

कल्पनेनेच तिला हसू आलं,

त्याचं नातं या वळणावर आलं,

म्हणून टचकन् डोळ्यात पाणीही भरलं.

तो अजूनही स्वप्नांतच दंग,

घड्याळाचा सेकंद काटा मोजत,

बोल ना गं भरभर वेळ संपेल,

असं म्हणत तासांचं गणित मांडणं.

मनात सारं दाटलं तरीही,

काय बोलायचं हे तिला न कळणं,

तेवढ्यात घड्याळाचा गजर होणं,

ती त्याच्या विचारात गुंग असताना,

संपली तुझी वेळ म्हणून त्याचं निघून जाणं.