आज पाऊस पडतोय,
खूप खूप पाऊस पडतोय,
रात्रभर पडता पडता,
तुझी आठवण काढतोय.
पडणाऱ्या त्याच्या सरी,
चिंब भिजवत जातात मला,
अन् मिटल्या डोळ्यात ओल्या,
तुझा भास मला भेटत जातोय.
तुला माझ्यात अन् मला तुझ्यात,
या रेशमी सरी गुंफताना,
फक्त तुझ्यामाझ्यातलेच ओले क्षण ,
हा पाऊस विरघळवून टाकतोय.
हा पाऊस नेहमीप्रमाणे मला ,
तुझ्यासारखाच छळत जातो,
पण माझा लाडका म्हणून,
हक्काने कुरवाळूनही घेतोय.
कोमेजून गेलेल्या माझ्या प्राणाला,
तुझा श्वास जीवन देतो,
वेड्या पावसाच्या सरींनी जसा,
वांझ धरतीला अंकुर फुटतोय.
काही झालं तरी हा पडणारा,
चिंब पाऊस मला सुखावतो,
त्याच्यामुळेच तर सत्यात नाहीच,
पण कल्पनेत तू मला भेटतो.