सौंदर्यास्वाद

सौंदर्य कशात नसतं? सगळ्यांत असतं, अगदी दगडाधोंड्यातही. परंतु त्यासाठी
हवी सौंदर्यास्वादक दृष्टी. कलाकारी भावली की अदाकारी सुचते. त्यातूनच मग
सौंदर्य मन लावून आस्वादण्याची नजर लाभते.
अशा सौंदर्यदृष्टीमुळेच कधी वेड्यावाकड्या काष्ठातून सौष्ठवाचे शिल्प
वेड्यासारखे अवतीर्ण होते तर कधी फटकाऱ्‍यांच्या शिंतोड्यातून बिनतोड असे
चित्र कँनव्हासवर आकार घेते. कोणाला शब्दांचे सौंदर्य वाचावेसे वाटते तर
कोणाला भावलेली सुंदरता शब्दांसह वेचाविशी वाटते. असे सौंदर्यपूर्ण वेचे
वाचकांना भुलवतात, झुलवतात अन् खुलवतातही. कोणाला झाडाच्या खोडाची गोडी तर
कोणाला खुणावते फांद्यांवरची जोडी. लावण्यमयीच्या लावण्यातल्या खोडी कोणाला
वेड लावतात. तर नट नट्यांची अभिनय बेडी कोणाला विळखा घालते. जितक्या
प्रकारच्या व्यक्ती तितक्या सौंदर्यासक्ती...
सृष्टीसौंदर्याची तर बातच निराळी. तिथे दृष्टी समोर सृष्टी असते. कोणताही
आडपडदा न ठेवता निसर्ग सौंदर्याचा बिनबोभाटपणे आनंद लुटता येतो. परंतु
लुटालुटीची भाषा येणाऱ्‍या नजरा भलत्याच रंगात येऊन जातात. त्यांना वाचन
लेखन मनन अशा त्रांगड्यात गुंतण्याची गरज वाटत नाही. अशा
सौंदर्यासक्त नजरा सरळ एखाद्या कट्ट्यावर बसून मृगजळीय आकृत्यांना
कुरवाळण्यात धन्यता मानतात. ही मान्यता त्या कमनीय बांध्याकडून खोचक
नेत्रांना मिळत नसली तरी त्या नजरतिराची गुण्यता हमखास होते. अमुक इतक्या
नजरांनी आज आपल्याला न्याहाळलं. असा गुणाकार करीत ती सुंदरा मनोमन सुखावते.
घरी या सुंदरतेची माफक तारीफ झाली नाही की सौंदर्यवतीचा पारा चढतो.
'तुमचं आजकाल माझ्याकडे लक्षच नाही मुळी' या वाक्यातून ती बाहेरच्या शोधक
नजरांचं सूचन करीत असते. तिच्या मनीचे सौंदर्यप्रशंसक भाव वेळीच ओळखून 'आज
तू खूपच छान दिसतेयेस गं राणी!' अशा पठडीतले उद्गार तोंडातून बाहेर काढले
नाहीत तर पाखरू बाहेरच्या दुनियेतच फडफडणार हे ओघाने आलंच. म्हणूनच
प्रत्येकाकडे सौंदर्यदृष्टी असणं महत्त्वाचं.
सुंदरतेचे अवलोकन करतांना डोळ्यांत आश्चर्यमिश्रित भाव अन् ओठांत
स्तुतिसुमनांचा वर्षाव साठलेला असावा. दाटलेल्या अचंब्याच्या शब्दांना
मुखातून वाट करून दिली की कलाकारी किंवा अदाकारीचा थाट अफाटपणे आस्वादता
येतो. तेव्हा कोणत्याही दिलखेचक सौंदर्याचा भाट असणे केव्हाही चांगलेच...
('मिश्किली'
मधून)