सोनलीकोंडला आम्ही सकाळी ८ वा पोहचलो. आंबिवली गणी आदिवासी वाडीवर चालत जायला तेथून रस्ता होता. गावातील एका घराच्या अंगणात आम्ही दुचाकी उभी केली. गावकऱ्यांनी दाखवल्यानुसार आम्ही गणीचा रस्ता धरला. माझा मित्र सामाजिक कार्यकर्ता होता, त्यांनी आणि मी गणीवर जाण्याचा बेत आखला. सकाळी बिस्किटे व चहा एवढ्याच आहारावर मी घरच्या बाहेर पडलो. गणीला जाण्याचा मार्ग काट्याकुट्यातून, डोंगरातून होता. पहिल्याच पाऊलवाटेवर सापाचे दर्शन झाले. वाटेवर मोरांची पीसे पडलेली दिसत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यांने थोडं जरी चालले तरी अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पाया खालचा सुका पालापाचोळा करर्कर वाजत होता. जंगलात गावकऱ्यांनी गुरे मोकाट सोडलेली होती. मित्रा सोबत गप्पा सुरू असल्यांने चालणे पटकन होत होते. घामामुळे मी शर्टही काढून टाकला. डोंगर चढून झाल्यावर आम्ही एकदम पठारावर पोहचलो. आणि एकदाच आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन झाले. तेथील एका मोठ्या वृक्षाच्या गर्द सावलीत बसून आम्ही थोडी विश्रांती घेतली, पठारावर वाहाणारा वारा अंगावर घेतला.
आणि तिथून गणीचं जीवनमान पाहिले.
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणारा भारत महासत्ता बनू पाहत आहे. महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे; परंतु इतक्या वर्षांनंतरही महाड तालुक्यातील आंबिवली गणी या आदिवासी वाडीवर कोणत्याही मूलभूत सुविधा न पोहचलेल्या नाहीत. रस्ता, वीज, शाळा, घरकुले अशा सोईंपासून दूर असणारी ही वाडी सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्रासाठी एक धक्काच आहे. हे मला स्पष्ट जाणवले. या माझ्या भटकंतीत मला जे जाणवले ते येथे मांडतोय.
. सरकारच्या आदिवासींसाठी अनेक योजना आहेत; परंतु आंबिवली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या गणी ही आदिवासीवाडी या योजनांपासून शेकडो कोस दूर आहे. दुर्गम भागात वसलेल्या या वाडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता सोडाच; पण कच्चा रस्ताही नाही. चोचिंदे व सोनाली कोंड या दोन ठिकाणांहून वाडीवर जाता येते. वाडीवर जाणारी वाट डोंगराळ, निसरडी आहे. थोडासा जरी पाय सरकला तरी खाली घसरण्याची भीती आहे. दगड व काट्याकुट्यांतून जाणाऱ्या या वाटेवर भरपूर सापही आहेत. डोंगरातील या वाडीवर जाण्यासाठी एक तास पायी प्रवास करावा लागतो. याच वाटेवरून आदिवासी, त्यांच्या महिला व लहान मुले ये-जा करतात. शहरातील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतात; परंतु या वाडीला साधा कच्चा रस्ताही नाही.
. एक वृद्धा लाकडाच्या मोळ्या बांधत होती. झोपड्यांत लहान मुलं, आदिवासी महिला ओल्या काजुबिया सोलत होत्या, उदरनिर्वाहासाठी कैऱ्या, काजूच्या बिया, लाकूडफाटा गोळा करून, तो महाडच्या बाजारपेठेत विकायला आणला जातो. प्रचंड मेहनतीनंतर चार पैसे त्यांच्या हाती लागतात. या वाडीवर 12 कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यांची आठवी पिढी येथे राहत असल्याचे समजले. वाडीवर सरकारी योजनेतील एकही घरकुल नाही. गवताचे मंडप तयार करून, कुडामेढ्याच्या घरात आदिवासी राहत आहेत. काहींनी तर चक्क उघड्यावर आपला संसार थाटलेला आहे. इंदिरा आवास योजना त्यांच्यापर्यंत पोचलेलीच नाही. गावोगावी, वस्तीवस्तीवर शाळा हे सरकारचे धोरण; पण या वाडीवर शाळा नाही. मुलांसाठी अंगणवाडी अथवा प्राथमिक शाळा नाही. पायथ्याशी असणाऱ्या चोचिंदे व सोनाली कोंड या शाळांमध्ये लहान मुले चालत येऊ शकत नाहीत.
वाडीवरील काही मुले रत्नागिरी जिल्ह्यातील लाटवण व महाडमधील रेवतळे येथे शिकतात; परंतु तेथूनही काही पळून येतात. मुलींना शिक्षणच नाही. वाडीवरील मुलींचे शिक्षण झालेले नाही. पाच मुले शाळेतून बाहेर पडलेली आहेत. शिक्षण नसल्याने पुढच्या पिढीची प्रगतीही थांबलेली आहे. मुलामुलींची लग्न लवकर केली जातात. तालुक्यात 100 टक्के विद्युतीकरण झाल्याचा दावा "महावितरण' करीत असली तरी या वाडीवर कायम अंधार असतो. वीज सोडाच; परंतु विजेचे खांबही वाडीच्या जवळपास नाहीत. पाण्याची सोय एक किलोमीटर अंतरावर. तेथून पाऊलवाटेने त्यांना पाणी आणावे लागते. लहान मुलं डोक्यावरून पाणी आणतांना मी पाहिले. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटल्यावर आदिवासींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. डोंगराळ पठार असल्याने पावसाळी येथे शेती अथवा आंबा, काजू लागवडही होऊ शकते; परंतु शेती अवजारे, बैलजोडी, बियाणे, लागवडीसाठी मदत या सोई-सुविधा आदिवासींपर्यंत पोचत नाहीत. सरकारी अधिकारी वाडीवर कधी जात नसल्याने आदिवासींच्या अडचणी व गरजा यांची सरकारदरबारी दखल घेतली जात नाही.
वाडीवरची सारीच परिस्थिती भायावह अशी होती. माझ्या मित्राने वाडीवर आदिवासी कुटुंबाच्या नोंदी व इतर सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले. तब्बल ३ तासानंतर आम्ही वाडीवरून खाली उतरलो. परततांना आदिवासीं बांधवांनी दिलेल्या कैऱ्या आमच्या सोबत होत्या. स्वत:विक्रीसाठी ठेवलेल्या कैऱ्यातील काही कैऱ्या त्यांनी आम्हाला फुकट दिल्या. आग्रह करुनही त्यांनी पैसे घेतले नाही. रस्ता, वीज, शाळा, घरकुले कोणत्याही मूलभूत सुविधा न पोहचलेल्या या वाडीवर इतकी माणुसकी मात्र पोहचली होती.