जी जाता जात नाही ती 'जात'

जग ग्लोबल व्हीलेज झाले आहे. या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात तुम्ही कोठेही जा, कोणत्याही गावात जा नाहीतर शहरात जा. तूम्ही विचारा की, तूम्ही जात मानता काय? तर तो माणुस कानावर हात ठेऊन सांगेल मी कशाला जात मानू? विज्ञान आणि तत्वज्ञान सांगते की, देवानं सर्वांना सारखचं जन्माला घातलयं, कुणाला काही कमी दिलं नाही की जास्त दिलं नाही. आपण सर्व समान आहोत, वरच्या जातीच्या अन खालच्या जातीच्या माणसाला काय वेगळं दिलेलं नाय ना? असा ईरसाल सवाल करायला ही तो मागे पुढे पाहत नाही. वर आपल्यालाच तो धर्म, माणुसकी आणि जात कर्माधारीत कशी आहे? हे समजावून सांगेल.
या सामान्य माणसाला अधिक छेडले तर म्हणेल की, " रावसाहेब, या जगात एकच जात हाय! ती म्हणजे पैसा! खरं सांगू, या जगात दोनच माणसं जगून ऱ्हायले. एक तो की ज्याच हातावर पोट हाय, अन दुसरा त्यो ज्याचा पोटावर 'हात' हाय त्यो! मग आपून ना त्यातले ना हयातले म्हणून जाती बिती आपण नाही मानत सांगेल.
या सामान्य माणसाशी असाच सवाल पुढे चालू ठेवला, तर काही वेळाने तो विचारणार, तुम्हाला तुमचं नावं, नावारून काही अंदाज नाही आला तर तो आडनाव विचारेल, पण काही आडनाव अनेक जातीत असल्यानं त्याची पुन्हा गोची. ह्या गोष्टीतून धर्म तर त्याला कळतोच मग जातीचा विषय सोडून तो धर्मावर बोलत राहतो. तो म्हणतो धर्म कोणाला नाही प्रत्येकाला धर्म आहे. कुत्र्याला, घोड्याला, पाण्याला, देशाला आपला एक धर्म व गुणधर्म आहे. मग आपलाच देश निधर्मी का? त्याला आजुबाजुच भान येताच, मग स्वतःला सावरून तो म्हणतो, या निधर्मीपणामुळेच जगात आपल्या देशाचे वेगळेपण दिसते नाही का?
मग हा सामान्य माणुस विचारतो, तुम्ही कुढले राव? यातून त्याचे तुमची जात शोधण्याचे संशोधन चालुच असते. यातुनही त्याला जर जातीचा पत्ता लागला नाही तर तो विचारील तुमचे आजोबा काय काम करायचे? व्यवसायातून जात शोधणे सोपे असले तरी ग्लोब्लयझेशन मध्ये आजोबा अस्ले की प्रयत्न फसतो. उदा. आजोबा मिल मजदूर आहेत? मग काय कप्पाळ करणार त्याला... मग मात्र तो सरळ मुद्यालाच हात घालतो आणि विचारतो कि आपली जात कोणती? किंवा आपण कुणापैकी? असा साळसुद प्रश्न.
आपल्या देशात जातीविषयी नेहमी कोणीना कोणी बोलतच असतो.. मग ते जनगणना असेल नाहीतर आरक्षण असेल पण अगदी त्याविरुद्ध वागून जातीव्यव्स्था आपण कटाक्षाने पाळली आहे. जात ही सोयीची बाब आहे. जातीची आठ्वण येण्याच्या काही वेळा ठरलेल्या आहेत. घरात, रानात, शेतात वा कार्यालयात राबताना जात आठ्व्त नाही. कार्यकर्ता पक्षाचं वा मंडळाचं कार्य करतांना जात विचारत नाही पण मोबदला देतांना मात्र जात पाहीली जाते. कार्यकर्त्याला तिकीट देतांना जातीपातीच राजकारण करतात. नोकरी लागायला जात.. शिक्षणाला जात.. पोरीच्या लग्न्नाला जात.. सामाजीक प्रतिष्ठा देतांना जात.. मान सन्मान देतांना जात.. घेतानां जात... उमेदवारी देतानां जात.. मतदान करतांना जात... जर सामान्य माणुस जात मानीत नाही तर मग जन्मापासून बांड्गुळासारखे चिकटलेले हे काय आहे? थोडक्यात, या देशातून फक्त स्पृश्य वा अस्पृश्य भेद नष्ट झाला आहे. जात नव्हे? जातीभेद नव्हे?

देशात असलेल्या या भेदातून आपण अनेक पिढ्यानपिढ्या जातो अहोत.. थोडक्यात या देशात जात आहे आणि नीट लक्षात ठेवा जी जाता जात नाही ती 'जात'..... होय तीलाच म्हणतात 'जात'....