मौनाची भाषांतरे करण्यात कितीही मतमतांतरे उद्भवत असली तरी मौनाची ढाल
वापरणे कधीही हितकर ठरत असते. काही व्यक्तिंना वारंवार शाब्दिक वार
करण्याची मोकाट सवय जडते. तिच्या सान्निध्यात येणारी व्यक्ती ती ते वार
झेलून खचून जाते, पिचून जाते. एकतर्फी होणाऱ्या या युद्धात हार निश्चितच
वार झेलणाराची, हे ठरलेले. परंतु जर मौनाची ढाल पुढे करून वार कर्णपटलावर
झेलत राहिल्यास फैरीवर फैरी झाडणारी व्यक्ती जरा संभ्रमित होऊन गप्प होते.
तिला वाटते आपण फारच असंबद्ध ओरडत आहोत की काय?
समोरून प्रतिसाद मिळाला तरच कोणत्याही कृतीला हुरूप येतो. व्यक्ती सुस्वरूप
असेल अन् त्यातही अनुरुप वागत असेल तर अशा भानगडी सहसा सार्वजनिक होत
नसतात. मात्र वादविवादाच्या गोष्टी पेपरातही छापून येतात. छापून आलं म्हणजे
ते भांडण कसंच लपून राहत नसतं. परंतु मौनाची ढाल घेऊन लढवली गेलेली
कितीतरी प्रकरणे चार भिंतीआडच दडपून निजतात. फार फार तर शेजारीपाजारी
एकमेकांच्या कर्णभित्तींशी कुजबुजतील- 'बया/बाबा लई कजाग आन भांडकुदळ
हाये.'
कोणी आमचा ठोस मुद्दा खोडून काढला तर गुद्द्यावर येणारं हे प्रकरण आम्ही
मौनाच्या ढालीनिशी परतावून लावतो.
कोणी उगाचच रस्त्यात गाठून फुकटचा सल्ला मिळवू पाहतात. त्याठिकाणीसुद्धा ही
ढाल कामी येते.
कोणी धटींगण 'हे आसं कामून?' गरजत दमात घ्यायला बघतो. मग आम्हीही नुसते
बघून घेतो, बघतच राहतो. म्हणजे मौनाची ढाल पांघरतो. वरून कितीही शाब्दिक
ठोके पडले तरी आत आम्ही सुरक्षित राहून हसू शकतो.
ढालीचा खरा फायदा दारी होण्याऐवजी घरीच जास्त होतो. अनेक नवरोबांच्या बायका
नेहमी नवनव्या टकळीवर जुन्याच सूताची कताई करून घेत असतात. त्यांच्या
ठेवणीतल्या शब्दांचे धारदार वार कधी नऊवारी तर कधी सहावारी मापाचे असतात.
हे वार झेलून काही नवरे बहिरोबा बनतात. तर काही मुंजोबा. जिभेचीच मुंज
करण्याची आपत्ती त्यांच्यावर ओढावलेली असते किंवा ऐकून न ऐकल्यासारखा चेहरा
करण्याचा अभिनय त्यांना आता छानपैकी जमू लागलेला असतो. खरे रणधीर नवरोबा
तेच की जे आपल्या तळपत्या समशेरीसमोर मौनाची ढाल धिराने धरून धाराशायी
होण्याचं नाट्य रंगवतात. अशा कठीण समयी तलवारच आपोआप म्यान होऊन जाते असा
शंभर नंबरी अनुभव सांगणारे कैक भेटतील.
म्हणूनच मौनाची ढाल नवरोबांचा बालन् बाल बचावित आलीय...
काय, खरे आहे की नाही?
('मिश्किली' मधून)