गटारी आमुशा

आखाड सरल्याची खूण म्हणजे गटारी आमुशा. अर्थात आषाढ मासाची अंतिम तिथी.
खेडोपाडी या आमावस्येला भलतेच महत्त्व असते. श्रावणात मांस-मच्छी-दारू
सबकुछ वर्ज्य असल्याने जे काही खायचे प्यायचे ते या शेवटाच्या दिवसापर्यँतच
अशी रूढी रुळलेली दिसते.
सगळ्यांसाठी दिवस ठरवून दिलेत. मातृदिन,
पितृदिन, मैत्रीदिन एवढेच काय स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन अशा कितीतरी
दिवसांची दिनदिन दिवाळी वर्षभर सुरु असते. मग आपलाही एखादा हक्काचा दिवस का
नसावा? अशी शंका घेऊन समस्त देवदासांनी एकत्र येऊन ही गटारी आमुशाची योजना
उचलून धरली असावी. आणि नित्यनेमाने ते ती पाळत आले असावेत. असो.
तर
सांगायचा मुद्दा असा की आषाढ महिना मोठा विसंगतीपूर्ण व विरोधाभासाने
व्यतित केला जातो. आषाढ महिन्याचा सुरुवातीचा पंधरवडा
टाळ-मृदंग-पालखी-वारी-एकादशी अशा भक्तिरसात चिँब न्हालेला असतो. तर शेवटाचा
पक्ष अनेक ग्रामदेवतेला सामिष नैवेद्य दाखवण्यात, अपेयपान पिण्यात जातो.
त्यानिमित्ताने घरोघरी कोँबडे-बकरे कापले जाते. या मांसभक्षणाचा अधिकृत
समारोप गटारीच्या दिवशी असल्याने मांसबाजारात, मच्छीमार्केटमध्ये व
मद्याच्या दुकानात कोटीँची उलाढाल होत असते...
तंगडी खाताना बाटली
रिचवून लंगडी घालता आली की गटारी साजरी झाली म्हणायचं. आजा, पणजा, चुलता,
बाप, पोरगं, पुतण्या, भाचा या सर्वांनी एकत्र बसून वा समोरासमोर गिलासावर
गिलास टाकण्याची मुभा या दिवसाने दिलीय. त्यामुळे गल्लोगल्ली, घरोघरी या
दिवशी पेताड-खाताडांचं राज्य असतं.
याची तयारी आठ दिवस आधीच चाललेली
असते. गावठी दारू गाळणाऱ्‍यांच्या भट्ट्या अविरत ढणाणत असतात. भूमिगत हौद
कित्येक लिटर सरमाडी सामावून ठेवतात. या दिवशीचा माल कडक गाळण्याकडे कटाक्ष
असतो. एकदा का माल तयार झाला की तो काळ्या हत्तींमधून ठरलेल्या ठिकाणी
पोचवण्याची गडबड उडते आणि ही पहिल्या धारेची चाखण्यास तळीरामांची तिथे
झुंबड उडते. स्वस्तात मस्तपैकी वरची तार लावून देणाऱ्‍या या हातभट्टीचं
व्यसन मोलमजुरी करणाऱ्‍यांत खूप असतं. त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे मोठी
पर्वणीच. ही लोकं गटारीत या दिवशी लोळण्याइतपत नाही परंतु धुळीत
घोळण्याएवढी नक्कीच पितात. आजकाल गटार नावाची सोय निर्मल ग्राम योजनेने
नामशेष केली आहे. म्हणून आता ह्या आमुशाला धुलवडी सारखी धुळेरी आमुशा असंच
म्हणावं लागेल. कारण रस्त्याकडेला पूर्वीसारखी काळ्याकुट्ट रबडीची गटार
नसल्याने उलथेपालथे झालेले टांगेकरी धुळीत बरळणेच पसंद करतांना खेडोपाडी
दिसून येतात...
शहरांतून गटारी साजरी होत नाही असं नाही. फरक इतकाच की
खेड्यांच्या तुलनेत त्यांचा उत्सव जरा बेताबेतानेच रंगतो. ढाबे, परमिट
रुम्स, बियर बार अशा ठिकाणी शौकिनांची गर्दी उसळते. मात्र त्यांचं खाणं
पिणं अगदी तोलून मापून. म्हणजे सिक्स्टी, नाईन्टी फार फार तर एक क्वार्टर
या सदरात ते पिणं मोजलं जातं. हातपार लडखडत असतांनाही 'आयेम ओके. आयेम
ओके.' म्हणता आलं की बस्स. पुढचा पेग नाकारण्याची वेळ आलेली असते. आणि
बैठकीत जमलेले जिगरी ड्रिँकर देखील तशी परवानगी देत असतात. सर्वांनाच
रोरावणारी ट्राफीक चुकवित सहीसलामत घरी जायचे असते ही त्यामागील सदिच्छा!
खाणंही जरा मापातच चालतं. म्हणजे एक फुल्ल चिकन हंडी मागवली की बारा
पिसेसच्या उपर त्यात खडे नसतात. एक फुल्ल चिकन तंदूरी आली की आठ
तंगड्यांपेक्षा एकही जादा तंगडी प्लेटमध्ये दिसत नाही. त्यामुळे गटारी
आमुशा साजरी झालीय की नाही हे स्वतः त्या व्यक्तिशिवाय इतरांना समजून येत
नसतं. शहरातील नशेबाज या दिवशी हमखास झिंगतात. कारण म्हणतात ना पिनेवालों
को पीने का बहाना चाहिये... त्यात या दिवसाची आणखी एक भर!