एक पाहुणी पोरगी...

एक पाहुणी पोरगी
पाणी शेंदायला येते
आणि जराश्या उन्हानं
फूल पळसाचं होते

कसे खुणावती डोळे
कसे खुणावती हात
जणू अंधार राहतो
आजूबाजूच्या डोळ्यात

आडापुढची खिडकी
मुका हवेत सोडते
आणि पाहुण्या पोरीच्या
मनी मोहोळ फुटते

.. सारा दीस आडावर तरी भरे ना घागर
एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर..

वैभव देशमुख