ओल्या मातीच्या स्पर्शाने
मन छिन्न विदीर्ण होई
तर.. काळोखी पडदयाने
मी कोष गुंफुनी घेई....
कोषात गोठली रात्र
गार काळोखी स्पर्शाने
मातीच्या गंध विसराया
जळल्या गवताच्या श्वासाने...
कोषात घेऊनी निजलो
मी सावरलेले स्पंदन
स्वप्नात मोहरून आले
तू सारवलेले अंगण...
पाऊस चुकवूनी शिरले
श्रावणी ऊन पूनवेचे
कोषास भाजूनी भिनले
दु:ख तुझ्या नयनांचे....
वारयाशी झुंजून पडली
गवतावर वनराणी
कुशीत निजला वारा
गुंफुनी गवती वेणी...
क्षितिजावर गहिवरे रंग
संधेच्या असीम प्रीतीचे
प्रीतीची ओंजळ संध्या
पांगळी तुझ्या प्रीतीची.....