मायबाप सरकार
अनामिकः साहेब, ४ वाजले, चहापाणी घेणारं?
(प्रश्न करणाऱ्या अनामिकाकडे मी पाहीले. )
मी:काय काम आहे?
अनामिकः साहेब, मला दारिद्र्यरेषेखालचा नायतर शेतमजुर असल्याचा दाखला द्या! मी ज्येष्ठ नागरीक हाय!!!
मी: पण, तुम्ही तर चांगले 'यंग' दिसता? शिवाय तुम्ही तुमच्याकडे पाहील्यावर वाटतं नाही की तुम्ही शेतमजुर असालं? चांगले जमीनदार दिसता... आणि दारिद्र्यरेषेखालचा दाखला तुम्हाला दिला तर बाकी सगळेच लोकं दारिद्र्यरेषेखाली येतील.
अनामिकः द्या की... सायब.. चहापाण्याचं पाहू की... हवं तर 'बसू' आपण ऑफिस सुटल्यावर...
मी:अहो, पण तुम्हाला तरुणपणात म्हतारं आणि जमीन असून भूमिहीन, मध्यमवर्गीय असून दारिद्र्यरेषेखाली यायची गरजच काय?
अनामिकःमध्यम वर्गाची 'आम आदमी' त गणना होत नाही सायब......
मी: म्हणजे...?
अनामिकः अहो, कोणचीबी योजना घ्या... ती दारिद्र्यरेषेखालील, भूमीहीन शेतमजुर, कर्जबाजारी शेतकरी नायतर ज्येष्ठनागरीक ह्यांच्यासाठीच अस्ते... एसटी साठीचा हा जुना ज्येष्ठनागरीकाचा दाखला हाय ना, त्यामुळे अर्ध्या तिकीटात फिरतोय.. आता नवीन पेन्शन योजना लागू करण्यासाठी..
मी: योजना यायच्या आधीच तुम्ही तयारीला लागलात.. अशा योजना गरीबांसाठी असतात. त्यांना मग फायदा मिळत नाही.
अनामिकः साहेब, नोकरदार, जमिनदार नावाला बगा.. त्यापरीस म्हतारं, जमिनदार, कर्जदारं हे बरं
मी: कशापायी? (थक्क होऊन)
अनामिकः तुमाला म्हणून सांगतो, माज्या आई बापाला श्रावणबाळ योजनेचे बाराशे मिळतात.. तसा मग निराधार झालो त्यामुळे संजय गांधी योजनेचे बी पैसे मी घ्येतो.. बाय्को सडक योजनेचे घ्येते.. आता चॉघबी म्हतारे मगं एस टी अर्ध्यात.. रेल्वे ३५ किमी फुकट नायतर ती बी अर्ध्यात.. म्या कर्ज काढून बी फेडलं नाय.. त्यामुळं माफ.. बायकोचं अन माझं दोन पोरां मागं आप्रेशन केलं.. त्याचं बी पैसं मिळालं... मगं त्ये तिनीबी पैसे एफडीत.. एफ्डीत बी ज्येष्ठ नागरीक म्हणून ईट्रेस्ट ज्यादा...
मी:अन पोरा बाळाचं...? (न राहून.. नकळत.. )
अनामिकः त्यांचं शिक्शान फुकट.. दारिद्र्यरेषेखाली म्हणून बुकं गणवेश फुकट.. शाळतं खिचडी अन दूध फुकट.. दवाखानाबी फुकट.. अन कोणी नडलाच तर "माहीतीचा अधिकार" बी फुकट...
साहेब, म्या पोरांच अपंगाचं सर्टीफीकेट बी काडलयं.. एकवेळ डिग्रीच्या सर्टीफीकीटाचा उपेग नाय.. पण ह्याचा हाय.. अन, मला सांगा ना अजून काय लागत जगायला.. मायबाप सरकार फुकटात घरं देणारं हाय.. रेशनवर डाळी अन धान्य स्वस्त आणि मस्त हाय.. शिवाय कालच कोर्टानं सांगित्लं सडण्यापेक्षा गरिबांना वाटा फुकट... आता वर्षाचं धान्यं भरतो बगा..
मी: तुम्ही खुपच अगोदर कामाला लागता राव?
अनामिकः सर्टीफीकीट गोळा करण्याशिवाय माला दुसरं काम काय? माय बाप सरकार हाय काळजी घ्यायला..
मी: आता कळलं सरकारला " मायबाप " का म्हणतात? (मी पुटपुटलो)
अनामिकः मगं येताय ना चहाला..?
पवन शिंदे...