मराठीमायाच्या बुरुजावरुन...

मराठीमायाच्या बुरुजावरून...

माझ्या घरावर माझे प्रेम आहे, माझ्या गल्ली - गावावर माझे प्रेम आहे. मला माझ्या राज्य आणि देशाबद्दल प्रेम आणि अभिमान आहे. अशी 'वसुधैव कुटुंबकम' माझी भावना आहे. या भावनेची मी जेव्हा वास्तवाशी तुलना करतो. तेव्हा माझं मन आतून आक्रंदन करत कुढत राहतं. मी हे सगळं द्वंद्व जगत राहतो आणि उघडेपणे 'जय महाराष्ट्रा' चा घोष करत राहतो.

रस्त्याने माझी गाडी खाचखळग्यातून जात असते. मी वर्तमानपत्रांतून शांघाय व्हायची स्वप्नं पाहत राहतो. (ज्यांना शांघायची स्वप्नं दाखविली जातात त्यापैकी ९९ टक्के जनता शांघाय पाहू शकत नाही किंवा त्यांना शांघायबद्दल माहिती नसते म्हणून या बाता खपतात)खिडकीतून बाहेर पाहताना रेशनसाठी व सार्वजनिक नळावरती लागलेल्या भर उन्हातील रांगा पाहतो व माझ्या गाडीतील एअरकंडीशनला धन्यवाद देतो. एफएमवरती मॉलमध्ये चाललेल्या 'सेल'ची आमिषे ऐकत असतो तर कधी तर कधी उगाच उठवलेल्या गॉसिप, टीआरपी वाढवण्यासाठी पेटवलेले रान ऐकत असतो. मागची गाडी कर्कश्शपणे पुढे जाण्यासाठी हॉर्न वाजवत असते. मला कळत नाही, पुढे एवढा ट्रॅफिक असताना हा माझ्या गाडीवरून उडत कसा पुढे जाणार आहे? बाजूला सायलेंट झोनचा बोर्ड अवाक होऊन पाहत असतो. त्यातच रिक्षा आपल्या क्षमतेचा विचार न करता रेटत चाललेली असते.

एक तरुण आपल्या मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी नागमोडी पद्धतीने हेल्मेट न घालता  मोटरसायकलवर सुसाट चाललेला असतो. दोन ट्रक समांतर धावत एकमेकांवर कुरघोडी करत असतात. माझी नजर पेपरमधल्या बातमीवर खिळलेली असते - ब्लॅकबेरी टेक्नॉलॉजीने ट्रॅफिकवरती नियंत्रण. "

चौकात बुगुबुगुच्या आवाजाकडे माझे लक्ष जाते. तीन नागडी उघडी मुले व चौथे पोटात असलेली आई हातातील बुगुबुगुच्या आवाजावर कसरती करत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी लाचार आई मुलांना गर्दीत हात पसरवायला भाग पाडत असते. पेपरमध्ये बातमी असते. - गेल्या वर्षभरात महिला व बाल कल्याण योजनेवरी १०० कोटी खर्च.

गाडी शहरातील मॉल संस्कृती व उंच बिल्डींग आणि विदारक झोपडपट्टीला मागे टाकून शहरापासून ३० -४० किलोमीटर असते. गावातील महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसतात. पेपरमध्ये बातमी असते. गावे टँकरमुक्त, अमुक एक जल व पाणी पुरवठा योजनेत ५० कोटींचा भ्रष्टाचार. बाजूच्या चहाच्या टपरीवरती दोन लहान मुलं अंगात फक्त बनियन घालून भांडी विसळताना व साफ करताना दिसतात. पेपरमध्ये बातमी असते. - बाल मजूर कायद्याची कठोर व काटेकोर अंमलबजावणी. पुढच्या वळणावर उघड्यावर शिजवलेल्या खिचडीचा आस्वाद मुले उघड्यावर घेत होती. पेपरमध्ये बातमी होती. सरकारच्या अल्पोपहार खिचडी योजनेला चांगला प्रतिसाद. पान उलटतो तोच कोपऱ्यात बातमी '२० मुले सार्वजनिक रुग्णालयात. अल्पोपहार योजनेतील खिचडीमुळे विषबाधा.

एफएम रेडिओवर बातम्या सुरू असतात. महिला अत्याचाराविरुद्ध कडक कायद्याची अंमलबजावणी. दोषींवर कठोर कारवाई, पेपरमध्ये पोलीस ठाण्यात स्त्रीवर बलात्कार, गाडीत बलात्कार, महिलेचे अपहरण याबद्दलची रकानेच्या रकाने भरून वर्णने असतात.

शिणलेल्या मनाला ग्लानी आल्यासारखं झालं. ग्लानीतच चक्क स्वप्नवत दिसायला लागलं. स्वप्नवत दिसायला लागलं. स्वच्छ, सुंदर, चकचकीत रस्त्यावरून माझी गाडी धावतेय, रस्त्यावर अजिबात गर्द्दी नाही, ठिकठिकाणी चौक किंवा रहदारीची वर्तुळे, दुतर्फा हिरवी डेरेदार झाडे, गाड्या हॉर्न अजिबात न वाजवता शिस्तीत चालल्या आहेत. माझी गाडी स्वच्छ, सुंदर समुद्र किनारी कोकणात गेली आहे. पर्यटनाच्या एवढ्या सोयी आणि पर्याय बघून इंद्र नगरीत पोहचल्यासारखा मी आनंदित झालोय. कुठेही रांगा नाहीत, सगळीकडे शिस्त, बहुमजली इमारती व घरे दिसत आहेत. मागेल त्याला काम मिळत आहे. कुठेही भांडण व वाद नाहीत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर सु़खसमाधान ओसंडून वाहत आहे. कुणाच्याच चेहऱ्यावर सुखसमाधान ओसंडून वाहत आहे. कुणाच्याच चेहऱ्यावर चिंतेची छटा नाही. सगळीकडे 'सुजलाम सुफलाम' असे चित्र आहे. दुसरी राज्ये व राष्ट्रे आपण पुढील २० वर्षात महाराष्ट्रासारखी प्रगती करुया म्हणून जनतेला उदाहरणे देत आहेत. अशा स्वप्नवत अवस्थेतच मी माझ्या मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये कधी पोहोचलो ते कळलेच नाही. संध्याकाळसुद्धा अशा स्वप्नवत अवस्थेत गेली. प्रवासामुळे थकल्याने मी गाढ झोपून गेलो. खडबडून जागा झालो तेव्हा सर्व अंग घामाने डबडबलेले आहे. मी वेटरसाठी बेल वाजवतो, बेल वाजत नाही म्हणून हाका मारतो, वेटर आल्यावर मी त्याच्यावर ओरडतो, "अहो, एसी लावता येत नाही तर साधा पंखा चालू ठेवता येत नाही का? वेटर उत्त्तरतो. "सांगणारा कोणाला, इथे आठ आठ तास लोडशेडींग असते, वेळेवरती जनरेटरसाठी डि़झेल मिळत नाही आणि साहेब, आंघोळीला पाणी नाही. इथे पाण्याची तीव्र टंचाई आहे, आणि तोच बाहेर १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त्त मुले 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, ' या गाण्याचा सराव करताना दिसत आहे.

आता मी स्वतःशीच विचार करू लागलोय. आज पन्नास वर्षे झाली तरी मराठीसाठी भांडायला लागतंय. साधे सरळ गणित आहे, मातृभाषेत सगळ्या गोष्टी, व्यवहार चालत असतील  तर ते कळायला खूपच सोपे जाते. भाषेचं एवढं साधं गणित असूनही त्याभोवती सोयीचे राजकारण  व राडे! राजाकीय नेते (सत्त्त्ताधारी आणि सत्त्तेवर नसलेले  आपल्या पक्षाचा व स्वत:च्या स्वार्थाचा मुद्दा रेटत असतात. विरोधकांनी सरकारचा केलेला अमुक तमुक निषेध म्हणजे काय तर पेपरमध्ये आलेली बातमी! प्रत्यक्षात काय? राजकीय परिपक्वता व समाजाची नेमकी काय गरज आहे. हे जाणून न घेता व अशिक्षितांच्या मतांवर निवडून येऊन लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाहीचा पाहिजे तसा वापर करणे हेच यांचं राज्य करण्याच कौशल्य! आज मिडीया जेवढ्या बेजबाबदारपणे वागतो, लिहितो, ते बघितलं की त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ का म्हणायचं, याचा प्रश्न पडतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमे टीआरपी व ब्रेकींग न्यूजच्या मागे असल्यामुळे संजय दत्त्तची जेलमधून सुटका, अमुक एकाने एवढ्या करोडला फसवले व जामिनावर सुटका, आयेशा - शोएब सानिया लग्न, रियालिटी शोज यामध्ये अडकली आहेत व अडकून राहणार आहेत. त्यांनी समाजातील खऱ्या गोष्टींचा शोध घेऊन समाजाभिमुख बातम्या दिल्या पाहिजेत. माणसाच्या विस्मरण शक्तीवर विश्वास ठेऊन टीआरपीसाठी वापर न करता एखाद्या घटनेचा पूर्ण पाठपुरावा करून बातम्या दिल्या पाहिजेत. सतत रियालिटी शोज वर भरणा न देता समाज प्रबोधनासाठी कार्यक्रम हवेत. आम्ही हे बदलेल म्हणून आशेवर जगत असतो. इथे प्रकर्षाने ना. स. इनामदारांच्या 'शहेनशहा' मधील उताऱ्याची आठवण होते. हे वर्णन कादंबरीत वेगळ्या अर्थाने आहे. परंतु सद्यस्थितीला ते तंतोतंत लागू पडते.

''जेव्हा या जिंदगीचा आम्ही विचार करतो तेव्हा आयुष्य म्हणजे एक प्रचंड फसवणूक आहे असं वाटू लागतं आमच्या दिलात खुदानं जी आशा ठेवली आहे तीच आमची फसवणूक करते. आशेच्या आधारानं माणूस स्वतःचीच फसवणूक करीत आहोत. त्याला उगीचच वाटत असतं की आजचा दिवस वाईट गेला तरी उद्या तरी निदान आपल्या मनातील आशा सफल झाल्याचे पहायला मिळेल, पण उद्याचा दिवस मावळतो ती वेगळी निराशा पदरात टाकूनच.... "

दुवा क्र. १

यशवंत चौघुले.

दुवा क्र. १