मॉरल पोलीस

स्त्रियांशी संबंधित काही विशिष्ट प्रकारच्या वर्तणुकीबद्दल नापसंती दर्शवणाऱ्याचा 'मॉरल पोलीस' असा हेटाळणीयुक्त उल्लेख केला जातो. अशी हेटाळणी करणाऱ्यांत ज्यांच्या स्वार्थावर गदा येते ते व तारतम्यरहित व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे असतात. कधीकधी आपणही नकळत त्यांच्या सुरात सूर मिसळतो.

असं असलं तरी आपल्यापैकी प्रत्येकजण केव्हा ना केव्हा तरी 'मॉरल पोलीस' बनतो. कधी आपल्याला प्रिय व जवळच्या व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी, तर कधी समाजात अनाचार माजेल व त्याचा भविष्यात कधीतरी आपल्यालाही फटका बसेल या भीतीनी. अशा वेळी आपल्या विरोधाला सबळ कारण आहे हे आपल्याला समोरच्याला पटवून देता येत नाही कारण जी गोष्ट आपण थांबवू पाहातो तिचे आपल्याला घातक वाटणारे परिणाम ताबडतोब दिसून येत नसतात.

मग ज्यावेळी एकीकडे विनाशाच्या दिशेनी जाणारी प्रिय व्यक्ती वा समाज नि दुसरीकडे 'मॉरल पोलीस' म्हणून शिक्का बसण्याची भीती अशा कात्रीत आपण सापडतो, त्यावेळी आपण काय करायच? 'मॉरल पोलीस' अशी हेटाळणी होऊ नये म्हणून संबंधितांची विनाशाकडे होणारी वाटचाल हताशपणानी पाहात राहायचं? मुळीच नाही. उलट आपल्यावर काय शिक्का बसेल याची पर्वा न करता सावधानतेचा इशारा द्यायचं काम चालूच ठेवायचं. अशानी फसणारा कधीतरी भानावर यायची शक्यता असते. गैरफायदा घेणाराही आपल्यावर सतत कोणाची तरी नजर आहे हे लक्षात आल्यावर जपून वागतो, ज्यामुळे धोका टळण्याची शक्यता वाढते. अर्थात, याबाबतीत शारीरिक अत्याचाराचा अवलंब मात्र करू नये.

तुम्हाला काय वाटतं?