अलविदा त्या रुम मालकांना

कॉलेजलाईफच्या धसमुसळ्या वयात बारा महिन्यांत बारा घरे बदलून झाली असतील.
बारा घरची बाराप्रकारची मालक मंडळी तेव्हा भेटली. ते भाड्याचं घर असल्याने
कधीही खाली करावं लागेल, अशा धारधार तलवारीची नेहमीच डोक्यावर दहीहंडी
असायची. ऍडव्हान्स भाडं दिलं की रूम आपली, म्हणायला आपली. आमच्या रूमवर
आमच्यापेक्षा मालकाचाच बारीक डोळा असायचा.
पंखा कमी स्पीडवर ठेवत जा, रात्री दहानंतर लाईट वापरू नका, झोपतांना सगळे
दिवे बंद करा, पाण्याचा नळ चालूच ठेऊ नका, भिंतींना नवे खिळे ठोकलेले
चालणार नाहीत, रुम आठवड्यातून एकदा पुसावीच लागेल, टॉयलेटला हप्त्यातून
एकदा ब्रश मारावाच लागेल, खिडक्यांना दोरे बांधून कपडे वाळत घालता येणार
नाहीत, रुमवर ऐऱ्‍यागैऱ्‍या मित्रांना आणायचं नाही, रात्र रात्र जागून
गप्पा हाणायच्या नाहीत, दिवसादेखील जोरजोरात हसत खिदळत बसायचं नाही,
अपेयपान केल्याचे निदर्शनास येताच त्याचक्षणी सामान बाहेर फेकून दिले
जाईल... अशा अनेक अटी व नियम सांगणारे मालकलोक आम्हांला भेटले. त्यांच्या
त्या कंडिशन्स आम्ही बाडबिस्ताऱ्‍यात गुंडाळून ठेवत कित्येक रुमा बदलल्या !
नवीन रुम घेतली की आमचा संसार सुरु... इन मिन वस्तू तीन. कपड्या-पुस्तकांची
सूटकेस, एक बादली अन् अंथराय-पांघरायची वळकटी. बस्स. सगळाच सुटसुटीत मामला
! एकाच खेपेत आपलं बिऱ्‍हाड पाठीवर लादून आम्ही रातोरात अनेक रुमा बदलल्या
आहेत...
पहिले काही दिवस नव्या मालकमजकुराच्या अटींच्या फैरी झेलाव्या लागत.
त्यांच्या शोधक नजरांच्या हेरगिरीचे बाण घायाळ करीत. 'हे करू नका, ते करू
नका, अमूक चालणार नाही, तमूक चालणार नाही' अशा नन्नाच्या पाढ्याखाली दबून
राहावं लागे. एकदा का भीड चेपली की आम्हां भाडेकरुंना मालकाच्या नियमावलीची
चीड आलीच म्हणून समजा! ते नियम कशाप्रकारे तोडता येतील? यावरच आमची गुप्त
खलबते चालत. मालक विरुद्ध भाडेकरू असा तो सूप्त संघर्ष उडे. आपण फुकट राहतो
की काय इथे? हे आमचं तत्वज्ञान आम्हांला स्वस्थ बसू देईल तर शपथ !
त्यामुळे महिनाभराचं आधीच दिलेलं भाडं पूर्णपणे वसूल करण्यासाठी आमची धडपड
चालायची. म्हणूनच की काय आमचं कोणत्याच मालकमहाशयाबरोबर सूत जुळलं नाही...
तशी आम्ही संडी पोरं. रोज अंडी खाणारी, कॉलेजला कधीमधी दांडी मारणारी. त्या
सुट्टीच्या दिवशी दिवसभर रुमवर लोळत पडायचं अन् रात्रभर रुमच्या पुढील
चौकात ढांगटींग करीत जागायचं. हे आमचं रुटीन. मग दुसऱ्‍या दिवशी नळाचं पाणी
गेल्यावरच जाग यायची. तेव्हा रिकामी बादली हलवित, ब्रश अन् पेस्टचा फेस
दोन्हीही सांभाळून 'बादलीभर पाणी देता काहो काका,' अशी निर्लज्ज भीक
मालकमहोदयाकडे मागावी लागे. ते 'बेणं' शानं असेल तर मुकाट्याने 'पिँपातून
पाणी काढून घे' म्हणायचं अन् येडं असेल तर आमच्या नाकावर धाडकन दार आपटून
आतमध्ये नाष्टा झोडीत बसायचं. त्या दिवशी पारोशा अंगाने प्रत्येक
क्लासमेटला, आज मी कशी बिनपाण्याची अंघोळ केली हे सांगून गंडवतांना मोठी
मौज वाटायची !
एक तारीख जवळ आली की आमची खिसे चाचपणी सुरु व्हायची. कारण महिन्याच्या
पहिल्याच दिवशी मालक रुमपुढे हजर. जोरात 'अलख निरंजन' करणार. त्यांचं दान
त्यांच्या हातात पडलं नाही तर रामप्रहरी जुंपायची. हे टाळण्यासाठी म्हणून
मग आदल्या दिवसापर्यँत काँट्री करुन भाड्याचा आकडा कसाबसा गाठला की हुश्शऽ
करायचं. कारण मन्थएण्डला बहुतेकांचे खिसे उताणे पडलेले असायचे. भाड्याची
रक्कम गोळा व्हावी याकरिता 'एक कट दोन हाफ' किँवा 'वन बाय टू' अशी चहाची
तडजोड करण्यातही वेगळ्याच शेअरिंगचा अनुभव मिळायचा...
काही मालक मात्र फार कनवाळू अन् भल्या मनाचे भेटले. आम्ही कितीही दंगामस्ती
केली तरी ते निमूटपणे ऐकत बसायचे. एकदा आम्ही रात्रभर गोंधळ घातला. तरीही
ते डाराडूर झोपलेले! आम्हांला वाटलं म्हातारा म्हातारी झोपेच्या गोळ्या
खाऊन कायमचे निजले की काय? परंतु छट्! त्यांचे डोळे जरी गच्च बंद होते तरी
कान टक्क उघडे असल्याचं सकाळच्या त्यांच्या टीपण्णीवरुन लक्षात आलं आणि
आम्ही रात्रीच्या गप्पा आठवून नको इतके ओशाळलो! त्यांचीही वेगळीच करुण
कहाणी होती. त्यांना अपत्यच नव्हतं म्हणून ते आमचा धिंगाणा एँजॉय करायचे.
हे कळल्यावर आम्हांला गलबलल्यासारखं झालं. आम्ही शहाण्या पोरांसारखे वागू
लागलो. शांत शांत राहू लागलो. एकदा त्यांनी विचारलं, 'रुममध्ये कुणी नसतं
का हल्ली? नाही, म्हटलं पूर्वीसारखा गोंगाट नसतो आता म्हणून विचारलं.'
त्यानंतर आम्ही आणखीनच गप्प झालो. काहीच विरोध नसल्यामुळे आमच्या
आरडाओरड्याला काहीच महत्व नसायचं. अशा मवाळ मालकापुढे आमचं जहालपण अक्षरशः
गळून पडलं. अखेर त्यांनाच ही शांतता सहन न झाल्याने त्यांनी रुम खाली
करण्याचे फर्मान सोडले. पडत्या फळाची आज्ञा घेत आम्ही आमचं बिऱ्‍हाड हलवलं.
आमची रुम 'चांगला गोँधळ' घालणाऱ्‍या ग्रुपला मिळाली!
अनायासे त्या ग्रुपची रिकामी रुम आम्ही घेतली. त्या रुमचा मालक महाकजाग अन्
भांडकुदळ होता म्हणे. आम्हांलाही तेच हवं होतं. दोन्हीकडून ढाल-तलवारींचा
खणखणाट होत राहिला तरच लढाईला रंग चढत असतो. त्यामुळेच ती रुम आम्ही खूपदा
गाजवली. तो मालक आमचा भरवसा नसल्याने सहसा कधीच घर सोडून कोठे जायचा नाही.
मात्र एकदा सुट्टीत सहकुटुंब मूळगावी गेला. जातांना 'घराकडे लक्ष द्या रे
पोरांनो' म्हणून गेला. मग आम्ही डोळ्यांत तेल घालून कसं कसं 'लक्ष्य' साध्य
केलं हे काय सांगायलाच पाहिजे?
मालकसाहेब गावाहून परतले अन् पाहतात तो काय? गेटवरच्या झाडावर एकही नारळ
नाही, कंपाऊंडच्या आतील चिकुच्या झाडाखाली अर्ध्याकच्च्या चिकुंचा सडाच
पडलेला. अंगणभर पालापाचोळा.. आणि घर? घराचं दार नुसतंच लोटलेलं, कुलूप
तुटलेलं! घरातील प्रत्येक सामानासुमानावर ते मनसोक्त वापरल्याच्या खाणाखुणा
उमटलेल्या. पोलिसांत तक्रार करायला ते निघालेच होते, आम्हीच थोपवलं.
म्हणालो, 'तुम्ही घातलेल्या जाचक अटी आम्ही तोडल्या. काय म्हणणंय तुमचं?'
मालकाला अशा कोंडीत पकडून खिंड लढवायला भाग पाडल्यावर सुमारे दोन तास
शाब्दिक धुमश्चक्री चालू राहिली. त्यावेळी वादविवाद स्पर्धेसारखा आमचा कस
लागला होता. आमच्यासारख्या इरसालकार्ट्याँना त्याचवेळी रूम खाली करावी
लागली हे सांगायला नकोच...
नवी रूम मिळेपर्यंत इतरांच्या रुममध्ये चोरीछिपे राहावं लागे. (आमचा एक
मित्र तर असाच याच्या त्याच्या रुममध्ये राहून आख्खी कॉलेज लाईफ पास आऊट
झाला होता !)
परंतु खरं सांगायचं म्हणजे असे भांडकुदळ मालकच खूप काही शिकवून गेले. 'अरे
तुम्ही अजून अंड्यातले संडे आहात.जगाचे दंडे अजून तुम्हांला माहीत नाहीत.
अरे पोरांनो, घर बांधतांना किती यातायात करावी लागते हे तुम्हांला माहीत
नाही रे अजून..' असा त्यांचा समजावणीचा सूर असे...
आणि आज जेव्हा स्वतःच्या घराचा पाया खोडून घेतांना, पिलर भरतांना, स्लॅब
टाकतांना आकड्यांची जी जुळवाजुळव करावी लागते तेव्हा तीच कजाग मंडळी
डोळ्यांपुढे तरळून जातात. त्यांनी त्यावेळी सांगितलेलं काही खोटं नव्हतं,
हे पटायला लागतं. खोल्या बदलणं सोप्पंय पण बांधणं अवघड हे कळून चुकतं. मग
वाटू लागतं की च्यायला आपण इतक्या खोल्या बदलून मालकलोकांना उगाचच उचकावलं
बरं का. आपण त्यावेळी चुकलोच. नाहीतर काय?
( पूर्वप्रसिद्धी- "ऑक्सिजन"-लोकमत ०३-०९-२०१०.)