शिक्षकांची परवड

मास्तर उंद्या तुमच्या नावानं बैलपोळा हाय म्हंत्यात नव्हं?' असं आम्ही
आमच्या गुरुजींना बेधडक विचारु शकत होतो. आता काळ बदलला. शाळा हायटेक
झाल्या. चुरगाळलेल्या पायजम्यातले मास्तर कडक इस्त्रीचे सर झाले. पोरंही
बदलली. ओबिडिएन्ट झाली. टीचर्स डे मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. ती
हक्काची सुट्टीदेखील कार्यक्रमांच्या रेलचेलीत लुप्त होऊ लागली. मुले
आपापल्या आवडत्या सरांना मॅडमना फुले देत जातात. ते हसून स्विकारण्यापलिकडे
ते काय करु शकतात? एका डोळ्यात हसू दुसऱ्‍यात आसू घेऊन बिचारे गुरुजन आला
दिन ढकलतांना आढळतात.
पेपरवरच्या फुल्यांची जागा स्टार्सनी घेतली. तरी नवीन येणाऱ्‍या गुरुजींचे
स्टार्स काही बदलणार नाहीतसे दिसते.
नाहीतरी आमच्या बालपणी अशीच परिस्थिती होती. मधला काही सुवर्णकाळ सोडला तर
आजचा शिक्षकही तितकाच पिचलेला आढळेल. पूर्वी आम्हांला शिकवणारा एकुलता एक
शिक्षक इतका दीन होता की आपलाही दिन साजरा करण्याइतकी त्याची दिन दिन
दिवाळी होत नसायची. तो दिवाळखोरीतच मातीचे खोरे ओढतांना दिसायचा. शिडशिडीत
अंगाच्या त्या मास्तराला महिना सरून गेल्यावर कडकडीत पगार भेटायचा, अन् तो
उधारीची बिले चुकती करण्यातच संपायचा. त्यामुळे कायम खिशात कडकी.
त्यानंतर मास्तरलोक लोकसंख्येच्या प्रमाणात वाढले. त्यांची कॉलेजेस
ठिकठिकाणी उगवू लागली. त्यांच्याही जोरदार संघटना जमल्या. तुटपुंज्या
वेतनाचा जगजाहीर निषेध झाल्यावर राज्यकर्त्यांना गुरुवर्यांच्या शक्तिची
कल्पना येऊन सूत्रे फिरली. राजकारण मास्तरांनाही कळले अन् त्यांचे
नशीबसुद्धा फळफळले. इतके की मास्तरकी सारखा दुसरा समृद्ध जोडधंदा त्याकाळी
उरलेला नव्हता, एवढी पगारवाढ प्रत्येक वेतन आयोगाने देऊन टाकली. तो
आतबट्याचा व्यवहार आजही राज्याच्या तिजोरीवर एवढा परिणाम करतो की गेली आठ
वर्षे शासनाने अनेक रिक्त जागा तोट्याच्या भयास्तव भरल्याच नाहीत. तरीही
गुरुजी तयार करणारी टाकसाळ दरवर्षी कित्येक गुरुजींना जन्माला घालतेच
आहे...
जागा कमी उमेद्वार जास्त. असं व्यस्त प्रमाण झाल्यावर शासनाने पुन्हा
तोकड्या पगाराच्या कुबड्या मास्तरांहाती दिल्यात. त्यांना शिक्षणाचा 'सेवक'
म्हणून गौरविले. चपराशा इतकी आमदनी त्यांना देऊ केली. फक्त दीड ते तीन
हजारांत ह्या नव्या सरांनी भागवायचं कसं?
या शिक्षक दिनानिमित्त हा कळीचा प्रश्न चर्चिला जावा.
एवढी फाटकी जिंदगी सोसूनही हे गुरुवर्य प्रत्येक पोराची जिंदगी शिवून
देण्याचं कार्य इमाने इतबारे करताहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
म्हणूनच सर्व शिक्षक बंधूभगिनींना शिक्षकदिनाच्या मनापासून हार्दिक
शुभेच्छा!