स्टेपनीची गरज

गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी
गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा
बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध
असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला
म्हणतातच की.
स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्‍या
गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे
गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक
मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून
साईडला ठेवायचे. त्याकडेला जॅक लावून गाडी वर उचलावी लागते. हरभऱ्‍याच्या
झाडावर चढवल्याइतकी! मग गाडी अंतराळात विहरत असतांनाच अलगद नटबोल्ट खोलून
मूळ चाकाऐवजी स्टेपनी रस्त्याच्या व गाडीच्या खाली चतुरतेने घ्यावी लागते.
एखाद्या फूल्लटाईट चाकाचे नटबोल्ट खोलतांना त्रास होतो खरा परंतु तो सहन
करायचाच. कारण पुढील काम मार्गी लागणार नसते. चाक बाजूला घेतलेय हे
मूळगाडीच्या या चाकाचे त्या चाकाला कळू न देण्यातच खरा मुरब्बीपणा. स्टेपनी
घेतल्याची खबर कोणालाही लागू न देता हा गनिमीकावा पार पाडावा लागतो.
तसे
पाहिले तर स्टेपनी नुसतीच बाळगून फायदा नाही, तर तिचा वेळोवेळी
काळजीपूर्वक वापर करता यायला हवा. स्टेपनी लावून सुखाचा प्रवास सुरु झाला
की गाडीला वाटते आपल्यामुळेच रस्ता जोराचा धावतोय तर स्टेपनीला मात्र कळून
चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा. म्हणून तीही सहसा
पंक्चर होण्यापासून स्वतःला जपत येते. अर्थात स्टेपनीलाही अडगळीत
राहण्यापेक्षा रोडवरची दौड केल्याचे विलक्षण समाधान लाभत असतेच म्हणा.
तिलाही चालू स्थितीत फार बरे वाटत असावे.
शेवटी काय तर एकमेकांवर
अवलंबून राहण्यात बरेच फायदे गवसतात. जसे की स्टेपनी!