काळेवाडीचा पुणेरी पाहुणचार(?)

पाचचा गजर झाला आणि नानगुडे पाटील उठले. अंघोळ करून त्यांनी हनुमान चालीसा वाचली आणि अभ्यास चालू केला. साडेसात-आठच्या सुमारास अभ्या उठला. थोड्या वेळ गॅलरी मध्ये जाऊन त्याने आजूबाजूला नजर टाकली. (का म्हणून विचारू नका.) हळूहळू काळेवाडी आघाडी जागी झाली. (तशी ती चोवीस तास जागी असते कारण जहापन्हा पहाटे कधीतरी झोपतात.)
मग नऊ वाजता बंगाना जाग आली. बंगानी थोडा वेळ पडल्या पडल्या विचार केला आणि मग पंख्याकडे नजर टाकली. (ती त्यांची खासियत आहे.) शेवटी बंगानी आता उठायला पाहिजे असा निर्णय घेतला. बंगांनी अंघोळ उरकून घेतली व खोलीला कडी लावून आतमध्ये रामरक्षा वाचायला चालू केली. (आतमध्ये मी रामरक्षा वाचतो असा बंगांचा दावा आहे. खरे खोटे माहीत नाही.)
सगळ्यात शेवटी म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर, लोकांची अर्धी कामे झाल्यावर अभ्याची जिम उरकल्यानंतर नानगुडे पाटलांचा अभ्यास करून व ऑर्कुट-फेसबुकसहित सर्व बघून झाल्यानंतर, बंगांचे सगळे पेपर वाचून झाल्यानंतर जहापन्हा उठले. तोपर्यंत १२:३० झाले होते. जहापन्हानी आरशात बघत केस ठीकठाक करून आपण माणसात आलोय याची खात्री करून घेतली. त्यानंतर जहापन्हा बाहेर येऊन पेपर वाचत बसले. पाच-दहा मिनिटानंतर अभ्याची करडी नजर जहापन्हावर पडली. आणि जहापन्हा समजले की सगळी मंडळी जेवणासाठी थांबली आहेत. जहापन्हानी पेपर सोडला आणि दात घासण्याचा ब्रश हातात घेतला.
जेवण करत असताना अभ्याच्या मोबाईल वर तबला वाजला (तबल्याची रिंगटोन हो...) अभ्याने फोन उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या प्रयत्नात यूपीएससी-प्रिलिम पास व्हावी तसा आनंद झाला. त्याच कारणही तसं खासच होत. सदाशिव पुणेकर हा आमचा एक नंबरचा चिकट मित्र. कधी स्वतःच्या पैशाने चहा म्हणून पाजला नाही. उलट बिल द्यायची वेळ आली आहे हे त्याला अंतर्ज्ञानाने अचूक समजत (पुणेकरांना सगळ्या गोष्टीच उपजतच ज्ञान असत म्हणा..पुणे तिथे काय उणे) आणि हा फोन आल्याचा बहाणा करून बरोबर सटकतो. तर ह्या सदाशिव पुणेकरानं आम्हाला चक्क घरी जेवायला बोलावलं होत. घोरपडी का काय असलाच प्राण्याच नाव असलेल्या ठिकाणी त्याने नवीन घर घेतलं होत.
दुसऱ्या दिवशी काळेवाडी आघाडीचे सदस्य खुशीतच होते. आज संध्याकाळीच जेवणाचं निमंत्रण होत. दुपारच्या जेवणात मावशींना फक्त वरण भात सांगण्यात आला. संध्याकाळी पाच वाजता काळेवाडीचे चार सदस्य - अभ्या, बंग, जहापन्हा आणि नानगुडे पाटील हे घोरपडीला जाण्यास निघाले. नानगुडेनची सफारी गाडी काळेवाडी च्या दिमतीला असल्यामुळे कसे जायचे हा प्रश्न नव्हता. प्रथम आम्हाला कोथरूडला जायचे होते. कारण काळेवाडीचा माजी सदस्य भाऊ(उर्फ मराठवाड्याचा मार्क्स) सध्या तिथे राहतो. तोही आमच्या सोबत येणार होता.कोथरूडवरून भाऊला घेऊन आमची स्वारी घोरपडीला निघाली. कॅम्पात पोहोचेपर्यंत प्रवास सुरळीत झाला. तिथे मात्र एका वळणावर आल्यावर डावीकडे जायचे की उजवी कडे असा पेच पडला. तिथे भाऊने मार्क्सची टू क्लास थिअरी मांडली.  डाव्या बाजूला झोपडपट्टी होती त्यामुळे उजव्या बाजूला कॅपिटॅलिस्ट क्लास राहत असावा असा निष्कर्ष भाऊने काढला. पण आमचा मित्र मध्यमवर्गात मोडत असल्या मुले व मार्क्सच्या तत्त्वज्ञानात मध्यम वर्गाला स्थान नसल्यामुळे भाऊला हि थिअरी मागे घ्यावी लागली.
आपण पुण्यात फार वर्षे राहतो त्यामुळे कुणाला पत्ता विचाराने हे कमीपणाचे लक्षण आहे अस मानून आम्ही कॅम्पात डावी उजवी वळण घेत राहिलो. अर्ध्या तासानंतर अस लक्ष्यात आलं की आपण पुन्हा त्याच ठिकाणी परत आलो आहोत.
थोड्या वेळाने जहापन्हांच्या अस लक्ष्यात आलं की बंग हे घोरपडीला एकदा जाऊन आले आहेत. बंग कुठे आहेत याच्या शोध घेतल्यानंतर अस लक्ष्यात आलं की बंग हे गाडीच्या मागच्या सीट वर निवांत झोपले आहेत. पण गाडी थांबल्यामुळे तेही खडबडून उठले. बंगानी दिशादर्शनाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मात्र आमची स्वारी सुरक्षितपणे घोरपडीला इच्छितस्थळी जाऊन पोहचली.
घराच्या परिसरात गाडी पार्क करून काळेवाडीचे सदस्य उतरले. तोपर्यंत संध्याकाळचे साडेसहा झाले होते. समोरच्या रस्त्यावरून जाणारी सौंदर्यस्थळे जहापन्हानी अचूक हेरली व त्यावर भाऊशी तपशीलवार चर्चा चालू केली. नानगुडे पाटलांनी चालता चालता 'या बिल्डिंग चे गेट जर थोडे मोठे असते तर आपल्याला ट्रक आणता आला असता यावर अभ्याशी वाद घालायला चालू केला. त्यावर बंगांनी 'आपण ट्रक घेऊन कशाला येणार असा प्रतिप्रश्न करून नानगुडेना निरुत्तर केलं.
घरी पोहचल्यावर आमच्या मित्राने आमचे मोठ्या प्रेमाने(? बहुतेक) स्वागत केलं. थोड्यावेळाने आम्हाला त्याने घर दाखवायला चालू केलं.नवीन घर घेतलेल्या लोकांना भेटताना तुम्हाला हे ऐकून घ्यावंच लागेल ते म्हणजे : 'आपला बिल्डर कसा दुष्ट आहे आणि तरीपण आपण त्याला कस गंडवलं . मग रेट कसा कमी केला, घर स्वस्तात कस मिळाल... पार्किंग स्पेस कशी मिळाली ... हाच मजला कसा बेस्ट आहे वगैरे वगैरे . सदशिवाने पण गॅलरी कशी स्पेशस आहे , किचनध्ये कशी छान हवा येते वगैरे तांत्रिक बाबी सांगितल्या. शेवटी एकदाचे घर बघण्याचे सोपस्कार पार पाडून आम्ही हॉलमध्ये येऊन बसलो.
मग काकूंनी आम्हाला 'पोहे खाणार का ? अस विचारलं.
पहिल्यांदा लगेच होय कस म्हणायचं या रीतिरिवाजानुसार आम्ही 'नको-नको -कशाला' अस करू लागलो.(अर्थात पोहे खाल्ल्यानंतर जेवण कमी जाईल हा सुज्ञ विचार त्यामागे होताच) तरीही पोहे खायला हरकत नाही अस एकंदर आमचं मत बनत चाललं होत. पण एवढ्यात सदाशिव पटकन म्हणाला
'अरे पोहे नाही अर्धा कप चहा तरी घ्या'.
त्यावर भाऊने चपळाई दाखवत 'हो चहा चालेल' अस म्हणून होकार देऊन टाकला. आणि थोड्या वेळात आमच्यासाठी अर्धा अर्धा कप चहा आला.(यालाच कदाचित हाफ टी डिप्लोमसी म्हणत असावेत!!!!)
चहासोबत गप्पा मारता मारता साडेसात होऊन गेले. सर्व मंडळींचे लक्ष नाही म्हटले तरी किचन कडे होतेच. थोड्या वेळाने आमचा मित्र आलोच हं एका मिनिटात म्हणून आत गायब झाला. पाच-दहा मिनिटे अशीच गेल्यावर मात्र आतून फोडणीच्या आवाजापाठोपाठ फोडणीचा वासही दरवळला. मग मंडळी थोडी रिलॅक्स झाली. भाऊ ला कोपऱ्यात ठेवलेली काही पुस्तके दिसली आणि भाऊ ती चाळण्यात मग्न झाला. अभ्या व जहापन्हा गॅलरीत जाऊन रस्त्यावरच्या लोकांना न्याहाळू लागले. बंगानी बाजूचा पुणे टाइम्स उचलून वाचायला (? की बघायला) चालू केला. तर नानगुडे पाटलांना कुठेतरी कोपऱ्यात एका सुडौल शरीरयष्टीचा फोटो दिसला(पुरुषाचा.. उगीच नसत्या कल्पना नको) व तो पाहण्यात ते दंग झाले.
आठ वाजून गेले. हा मित्र हि आतच गायब होता. आता मंडळींच्या पोझिशनही बदलल्या होत्या. नानगुडे पाटील पुस्तक वाचक होते तर बंग बॉडी बिल्डरला बघण्यात दंग झाले. भाऊ गॅलरीत पळाला तर अभ्या आणि जहापन्हा नुसतेच शून्यात नजर लावून बसले होते. टीव्हीवरच्या मराठी मालिकांचे स्वर आतून ऐकू येऊ लागले होते. 'चला आता जेवायला घ्या' हे उत्साहवर्धक शब्द ऐकायला सर्व जण अधीर झाले होते. साडेआठला सदाशिव बाहेर आला(अरे वाह). अरे सॉरी बरका 'फोनवर बोलत होतो' - इति सदाशिव. 'बरं माझे ट्रेकचे फोटो दाखवतो तुम्हाला'. आमच्या मित्राला कुठेतरी डोंगरावर कानाकोपऱ्यात अडचणीच्या जागी चढून जायची व आपण तिथे गेलो होतो हे दाखवण्यासाठी तिथले फोटो काढायची आवड होती (त्यालाच काही लोक ट्रेक असंही म्हणतात). तर हे ट्रेक चे फोटो दाखवण्याचा कार्यक्रम बराच वेळ लांबला. आम्ही पण 'अरे वा' 'छानच' ' मस्त आहे' 'सहीच' अस काहीतरी उगीच बोलायचं म्हणून बोलत होतो. आता टीव्हीवर मराठी मालिकांच्या जागी सासबहुच्या हिंदी सीरियलl लागल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आम्हाला मग लक्षात आलं की आपली काहीतरी गफलत झाली आहे. थोड्या वेळाने मग आता परिस्थितीचा अंदाज घ्यायचा म्हणून जहापन्हानी एक खडा टाकून पाहिला.
'बराच उशीर झाला आहे आम्हाला निघायला' - जहापन्हा
'हो माझ्या लक्षातच आलं नाही.. उगीच तुम्हाला फोटो दाखवत थांबवून ठेवलं, या पुन्हा असेच निवांत' - इति सदाशिव
आता मात्र सगळ्या मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे झाले झाले. अभ्यानेच फोन वर निमंत्रण स्वीकारले होते त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्याने चेहऱ्यावर आता बाहेर जाऊन काय असेल ते सेटल करू असा भाव आणला. मग निरोप घेऊन आम्ही बाहेर निघालो. निघता निघता काकू म्हणाल्या 'जेवायला थांबला असता तर बरं झालं असत..'
कदाचित 'जेवायला' याच्यापुढचे शब्द जहापन्हा नि ऐकले नसावेत ते तसेच पादत्राणासहित आत जायला निघाले पण नानगुडे पाटलांनी बाका प्रसंग ओळखून त्यांना मागे खेचले.
काळेवाडीचे सदस्य मग आपल्या कार्यालयात परत आले आणि रात्री खिचडी भात करून त्यांनी आपली भूक भागवली.
मित्रांनो या अनुभवातून आघाडी बरीच शहाणी झाली आहे. आघाडी ने असे बाके प्रसंग इतर लोकांवर ओढवतील याची सामाजिक जाणीव (याबाबतीत काळेवाडी नेहमी आघाडीवर असते म्हणूनच 'काळेवाडी आघाडी' असे नाव आहे ) ठेवून काही नियमावली तयार केली आहे.
१. कोणत्याही पुणेकराचा तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देणारा फोन/ईमेल/अन्य आल्यास स्वतःला चिमटा काढून आपण स्वप्न तर पाहत नाही ना याची खात्री करावी. समोर कोणी असल्यास त्याला चिमटा काढायला सांगणे उत्तम...
२. इतके केल्यानंतर पुन्हा जाताना एकवार फोन करून त्याच वर्षाच्या दिवशीचे निमंत्रण आहे का हे पडताळावे.
३. कुणाही पुणेकराच्या घरी गेल्यानंतर काही हवे का म्हणून विचारले तर पटकन हो म्हणावे अन्यथा पाणी सुद्धा मिळणे दुरापास्त होईल.
विशेष सूचना - वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्यातील पात्रे मात्र वास्तव जगातील आहेत. तसेच या लेखामुळे कोणत्याही पुणेकराच्या व प्राणी संघटनेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याला काळेवाडी आघाडी जबाबदार असणार नाही. तसेच याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
सर्व हक्क सुरक्षित@काळेवाडी आघाडी
आघाडीशी येथे संपर्क साधा : दुवा क्र. १