एकच प्रार्थना श्री गणेशाकडे

"देवा, मला चांगली शक्ती, युक्ती, बुद्धी दे. खूप मोठं, धनवान कर. दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची शक्ती दे. माझी ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा, स्फूर्ती दे. सर्वांना सुखी ठेव...   "
आईनं लहानपणापासून मनावर बिंबवलेली आणि त्याच्यात माझ्या मनाच्या ३-४ ओळी टाकून तयार केलेली ही प्रार्थना मनाशी बांधून मी आणि आई दगडूशेठ हलवाई गणपती  आणि मंडई गणपतीला तोरण बांधायला निघालो.

वाटेतच रोह्या पवार भेटला. नारळाच्या तोरणाच्या स्टाल वर निवांत जांभई देत बसला होता.
रोह्या हा बुरूड गल्ली मधलाच एक. अभ्यासात अतिशय कच्चा गडी. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे   सातवी आठवी  मध्येच शिक्षण सोडून वडिलांनी कुठेतरी कामाला लावला.
"काय रोह्या, आज पहाटे साडेचारालाच लावलं का टेबल?" मीच सुरुवात केली.
"न्हाय, रत्रिभर चलूच हाय! ".. एक मस्त आळस ठोकत तो बोलला.
"बरं बरं , आलोच दगडूशेठ ला तोरण बांधून, आपल्यासाठी पण एक तोरण तयार ठेव.. " एवढे बोलून आम्ही निघालो.
....
पहाटे चे पावणेपाच झाले होते. मंडई मध्ये रोजच्याप्रमाणे ऊसाचे ट्रक लागले होते. काही मजूर ट्रक मधले ऊस काढून आत नेऊन ठेवत होते.
त्या मजुरांमध्ये एक तरुण मुलगी पण आपल्या खांद्यांवरून दहा पंधरा किलोचे ते ऊसाचे गठ्ठे उचलून आत नेऊन ठेवत होती.
हे चित्र पाहून स्वतः:चीच लाज वाटली. ९-१० तास आरामात स्पंज च्या खुर्चीत बसून थोडं फार डोकं चालावयाचं आणि अमाप पगार घरी घेऊन जायचा. दोन वेळच्या जेवणासाठी लोक काय काय करतात हे बघून वाईट वाटलं...
नक्की कोण चुकतंय म्हणून त्या वीस - बाविशीतल्या तरुणीला आपल्या ईछांची होळी करून इतके कष्ट सोसावे लागत आहेत?
.....
हुतात्मा बाबूगेनू मंडळाचा गणपती  थाटात विराजमान झाला होता. त्याला वाहिलेला "हजाराच्या" नोटांचा हार अगदी मस्त उठून दिसत होता. विसर्जनानंतर त्या हाराच काय होणार कुणास ठावूक?
मांडवाच्या समोरच कमळ - केवडा विकणार्यान्ची लगबग चालू होती. कोणी कुठे एखादी स्त्री आपल्या लहानग्या, झोपलेल्या बाळाला मांडीवर घेऊन कमळ विकत होती तर कोणी कुठे आजीबाई केवडा विकण्यामध्ये दंग झाल्या होत्या . आपलं दहा दिवसांच छोटंसं दुकान थाटण्यासाठी प्रत्येकाचीच रस्त्यावरती जागा बळकावण्यासाठी धडपड चालली होती.

एका टेबलावरून तोरण घेतलं आणि आम्ही  रांगेत जाऊन थांबलो.
कोण्या अनाथाश्रमातल्या लहान लहान मुलांना एका आजोबांनी गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणायला आणलं होत.  सगळे जण रस्त्यावर बाजूला ओळीत बसले होते. गुरुजी सांगतील त्या प्रमाणे ती सगळी मुले त्यांच्या मागून सूर लावत होती.
"अरे बोलू नका. शांतं ताठ बसा बरं. डोळे मिटा." एका आवर्तनानंतर त्या कार्यमग्न गुरुजींनी मुलांना ओरड ठोकली.
.....
रांग हळू हळू पुढे सरकत होती. आम्ही महालाच्या आवारात प्रवेश केला. आता बाप्पा अगदी मस्त दिसत होते. त्यांच्या त्या लोभस अवताराकडे पाहून आपोआप माझे हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले. 
मंदिराच्या आवारात बरीच जोडपी अभिषेक करायला बसली होती. त्यांना बसायला छान सजवलेले पाट होते. आरती झाली आणि अभिषेक संपला. त्यातल्या काही जणांनी गणपतीचे फोटो काढण्यास सुरुवात केली.
दोन जोडप्यांनी तर बाप्पा ला "celebrity" च करून टाकलं. गणपती बरोबर दोघांच्या मध्ये दिसेल अशी पोझ देऊन त्यांनी बरेच फोटो काढून घेतले.
तेवढ्यात आमचा नंबर आला आणि त्या माणसानं माझ्या हातांमधलं तोरण घेऊन त्या मन प्रसन्न करणाऱ्या श्रीगणेशाच्या पायावर वाहिले.
मिळालेल्या दहा - पंधरा सेकंदातच मी माझी प्रार्थना श्रींच्या चरणी अर्पण करून टाकली.
.......
"हे देवा, त्या रोह्या पवार ला चांगली शक्ती, युक्ती, बुद्धी दे. त्याला खूप धनवान आणि मोठं कर. त्या खाबाडकष्ट करणाऱ्या मुलीला प्रचंड शक्ती दे. तिला स्वाभिमानानं , मनमोकळेपणानं जगू दे. त्या केवड्या विकणाऱ्या स्त्री च्या आयुष्यात स्थैर्य, शांती आणि समाधान येऊ दे. त्या अनाथ मुलांचं भविष्य उज्ज्वल कर. त्यांना छान शिकव आणि समृद्ध कर.
या सर्वांना जगण्याची जिद्द दे.  अन्याय, दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढण्यास सामर्थ्य दे. हे जीवन किती सुंदर आहे हे समजण्यासाठी एक संधी दे. त्यांच्या सुकलेल्या ध्येयफुलान्ना परत एकदा टवटवीत कर..."
मनातली प्रार्थना संपण्याआधीच मी गर्दीमुळे बराच बाहेर आलो होतो.
......
डोळे पुसत मी तोरण घेतलं त्या टेबलापाशी आलो.
"तोरणाचे किती द्यायचे  काका?" 
"पासष्ट रुपये"
पैसे देऊन आम्ही  मंडई गणपती जवळ आलो . रोह्या कडूनच तोरण घेतले.
शारदा गणेशाला जास्त गर्दी नव्हती. शांतं वातावरण होत. अतिशय ऐटीत, झोपाळ्यावर विराजमान झालेल्या त्या गणेशाकडे मी तिच प्रार्थना केली.
"काय रोह्या ? किती झाले तोरणाचे ?"
"राहू द्या हो शिक्षक..  " रोह्या मान खाली घालत बोलला.
"किती झाले ते पटकन सांग हा रोहित" ह्या वेळेस आईनं जरा आवाज चढवला.
"द्या पन्नास रुपये."
मी पटकन पन्नास ची नोट त्याच्या हातात टेकवली आणि घरचा रस्ता पकडला.

'दगडूशेठ जवळच्या त्या तोरण वाल्यानं  पासष्ट रुपये घेऊन आपल्याकडून जास्त पैसे वसूल केले की रोह्या नि ओळख लक्षात ठेवून मुद्दामच कमी पैसे घेतले' हे कोड काही मला अजूनपर्यंत उमगले नाही.