जीवन एक महामार्ग

जीवनमार्ग असो वा वाहतूकमार्ग चढ आणि उतार
ठरलेलेच. कधी कधी इतकी धोकादायक वळणे येतात की मनाला उत्तम ब्रेक असेल तरच
कवटी शाबूत राहते. अन्यथा वाहनही बेकाबू होऊन सर्व सर्व ब्रेक अप होण्याचा
संभव असतो.
अंधारी बोगदे पार केल्याशिवाय सुखाचा प्रकाश संभवत नाही.
कधी कधी तर इतका गुळमुळीत अन् मोकळा ढाकळा महामार्ग गवसतो की स्पीडचं थ्रिल
अनुभवावंसं वाटतं. परंतु मध्येच येणाऱ्‍या ब्रेकरमुळे मनाला, तनाला अन्
वाहनालाही वेसण बसल्याने थ्रिलचं किल मध्ये रुपांतर होत नाही. काही मार्ग
निसरडे व ओलसर लागतात. अशाठिकाणी कोणताही सैलसरपणा अंगावर चमडी ठेवत नसतो.
वळणदार घाटरस्त्याने झोकदार वळण घ्यायचे मनात घाटत असते. अशा अनाकलनीय
घाटमाथ्यावर जात्याच भुलैय्या निर्माण झालेला असतो. त्या वळणभूलीचा अंमल
आपल्या चालनावर न झाला म्हणजे मिळवली. नाहीतर त्या भूलीमुळे काळझूल
पांघरणारी दरी पुढे खुणावत असतेच. तरी बरे महामार्गावर जागोजागी मार्गदर्शक
खुणा दिशादर्शन करीत असतात. त्यायोगे रस्त्याचं सहज सुंदर दर्शन होत
राहतं. नियम मोडले की रस्त्यानं हातपाय तोडलेच म्हणून समजा. आणि ज्यावेळी
वेगवान प्रेमालापाची बात वेग घेते तेव्हा घाताचं सावट अपघात करून जातं.
चढाओढीची संगत नेहमीच रंगत नाही, कोणाला तरी माघार घेऊन काळवेळेचं गणित
साधावं लागतं. भरधाव येणाऱ्‍याला साईडनेच जाऊ द्यावं लागतं. हरक्षणी
मृत्युचे सापळे दबा धरून असतात. तेव्हा घरून चिंतलेलं सुयश पाठीशी पुरतं.
धोपट मार्गाने गेलात तर इच्छित खोपटही आढळत नाही. मग मळलेल्या
रस्त्यालासुद्धा पांथस्ताची किंमत वाटत नाही.
कधी कधी राजमार्ग भेटला तरी तो खाचखळग्यांचा साक्षीदार असतो. राजेपद
विभूषित करण्यासाठी एक तर काटेरी मुकूट तरी परिधान करावा लागतो किंवा
काट्यांवरून मार्गक्रमणा करावी लागते. जीवनमार्गातील अडथळे पार करुन जे
राजेपद प्राप्त होते ते महामार्गावरचे विलोभनीय शहर असते. अन् अशा शहराच्या
शोधार्थ प्रत्येकाला चालायचे असते. तेव्हाच जीवन एक महामार्ग बनतो...

('मिश्किली' मधून..)