फिरायला चला..

पूर्वी दोन पायांच्या गाडीने मानवाचा प्रवास व्हायचा. त्याला जमेल तितके
प्रांत त्यानं ओलांडले. चिनी प्रवासी ह्युआन ए त्सांग आपल्या पाठीवरील अवजड
ओझे सांभाळीत आशियाभर फिरला, तेव्हा कोठे भारताचं नालंदा साऱ्‍या जगाला
कळून चुकलं. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावून अख्ख्या जगावर सत्ता गाजवू शकेल अशा
अपरिचित भूमीचा परिचय जुन्या दुनियेला करुन दिला. वास्को द गामा चुकून
भारतात टपकला व इथल्या मसाल्याचं वेड जगभर पोचवून गेला. परिणामी आपल्याच
मस्तीत जगणं सुंदर करीत जाणाऱ्‍या तमाम भारतीयांना पारतंत्र्याची चव चाखावी
लागली ...
पूर्वी मर्यादित स्वरुपाच्या दळणवळणांच्या साधनांमुळे
अनेक प्रवासी पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत. किंवा अपुऱ्‍या
सुविधांमुळे अनेक नामांकित सौदागर देखील भलतीकडेच भरकटले गेले. सिंदबादच्या
सफरी या त्यांपैकीच एक उदाहरण...
तर आता बस, मोटारी, रेल्वे, जहाजे,
विमाने (अंतरिक्ष यान सुद्धा) अशी अनेक प्रवासी साधने उपलब्ध झाल्याने
पर्यटन क्षेत्राला जगाचा कोना कोपरा ओळखीचा झालाय.
सद्यस्थितीत कितीतरी
कंपन्या टुरिझमच्या क्षेत्रात उतरल्यात. प्रवाशांना दैवत मानून यथायोग्य व
उत्तमोत्तम सेवा पुरवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. त्यात ते यशस्वी
होतातही. त्यांच्या पानभर येणाऱ्‍या जाहिराती प्रवाशाला स्वस्थ बसू देतील
तर शपथ!
मुळात मानव प्राण्याला नविन्याचे जन्मजात आकर्षण. नव्या
प्रदेशाला पाहणे, जाणून घेणे, अचंबित होऊन जाणे ही तर खरी प्रवासामागील
प्रेरणा. काही वेळा नेहमीच्या रहाटगाड्यातून निवांतपणा, हवापाणी बदल किँवा
कुटुंबियांशी अधिक मोकळेपणाची जवळीक साधण्याच्या हेतूने देखील पर्यटनाकडे
आपण वळतो.
जरा फेरफटका मारला की शरिरासोबतच मनही ताजेतवाने होत असते. हा
अनुभव सर्वांच्याच परिचयाचा असावा. शिवाय एखाद्या रम्य स्थळाला भेट देऊन
आल्यावर तेथे काय काय गमती जमती पाहिल्या, कशाप्रकारे ट्रीप एँजॉय केली हे
इतरांना 'सचित्र' कथन करण्यात जी मौज आहे ती कोणत्याच कथाकथनात नाही. या
अनुभवांच्या आदान प्रदानात एखादा महिना देखील त्याच मूड मध्ये फिरायला
जातो. म्हणूनच प्रत्येकाने जरासा वेळ (व पैसाही) बाजूला काढून वर्षातून
एकदा तरी आठेक दिवसांचे पर्यटन केलेच पाहिजे...
नुसते फिरतच बसायचे नाही
तर प्रत्येक ठिकाणची वैशिष्ट्य पूर्ण छायाचित्रे देखील अवश्य घ्यायचीच.
पुढील वेळी कधीही तो अल्बम चाळू लागता आपण त्याच त्या पर्यटन स्थळांना
फुकटची भेट देऊन येऊ शकतो. हा अनुभवसुद्धा हमखास चेतनादायी ठरतो.
म्हणूनच
म्हणतो, फिरायला चला.. फिरायला चला.