म्हातारबाँचा दिवस...

आजकाल आमचे म्हातारबॉ भलतेच खुश असतात. कारण त्यांचे दिवटे चिरंजीव म्हणजे आम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेलो असून आम्हांमुळे म्हातारबाँच्या कितीतरी आगंतुकांना बांडगुळासारखे हक्काचे शोषण करुन घेण्याची नामी संधी त्यायोगे मिळालीय. खायचं, प्यायचं अन् ह्याचं जुळव, त्याचं मोड अशी लावालावी करीत गावोगाव उंडारायचं. हेच त्यांचं ज्येष्ठ काम उरलंय. त्यांची साठी उलटली तेव्हा आम्हांला वाटलं त्यांच्या हाती काठी येईल पण छे! म्हातारबाँनी अनेक सवलतीच्या पासांची ताटीच बांधली...
यष्टी, रिल्वे यांचे तर अर्ध्या तिकिटाचे पास आहेतच. शिवाय अमूक राज्यातल्या तमूक ठिकाणच्या विश्रामगृहांची मोफत रहिवास कुपने देखील आहेत. जन्मभर त्यांच्या पायांना भिंगरी होती. आता या ज्येष्ठांसाठीच्या पासेसमुळे त्यांचे पाय घरात दिसतच नाहीत! एकंदर काय तर आमचे म्हातारबॉ या वयातही चुस्त तंदुरुस्त असल्याने आपली पर्यटनाची जन्मजात हौस पुरवून घेत आहेत...
असे हिंडण्या फिरण्याचे दिवस फार थोड्या ज्येष्ठांच्या नशिबी येत असतील. त्याबाबतीत आमचे म्हातारबॉ फारच नशीबवान निघाले म्हणायचे. तरीही आमचा त्यांना कसलाच त्रास नसतो, जाच नसतो, काचही नसतो. 'आलात? या, चाललात? जा.' असा आमचा मनमोकळा स्वभाव. कारण आम्हांला माहितीये की एकदा का त्यांचे पाय थकले की त्यांची भ्रमंती संपणार आहे. त्यावेळी त्यांना आपली अत्यंतिक गरज लागेल, सद्या नाही. म्हणून ते आज जे हलते फिरते वावरताहेत, त्यात आपली आडकाठी कशाला? त्यांच्या सांजसंध्येचे उरलेले काही दिवस त्यांनी त्यांना आवडतील त्या पद्धतीने व्यतित करावेत अशी आमची सदिच्छा असते.
एक ऑक्टोबरला जागतिक वृद्धत्व दिन साजरा करतात. खरे तर वय झाल्याने मुक्तिचे वेध लागलेले असतांना ते ज्येष्ठपद उत्सवणे फारसे उचित ठरत नाही. परंतु यामागील उद्देश हा की आज याघडीला निवृत्त झालेले अनेक ज्येष्ठ लोक या जगात एकलकोंडे वावरतात, अस्थिरपणात, असहाय अवस्थेत जगतात. याला कारण घटलेला मृत्युदर व विभक्त कुटुंब पद्धती. अनेक आजारांवर प्रभावी व संयुक्तिक उपचार उपलब्ध असल्याने तडकाफडकी सहसा कोणी वयोवृद्ध जगाला त्यागू शकलेला नाही. म्हणून ज्येष्ठांची वृद्धसंख्या वाढलीय. असो.
अशा पिकल्या पानांना घरात मानाचं स्थान मिळण्याऐवजी त्यांच्या तोंडालाच पाने पुसली गेल्याची अनेक उदाहरणे वृद्धाश्रमांतून आसवे गाळतांना आढळतील. या ज्येष्ठांनी अनेक उन्हाळे सोसलेले असतात. परंतु त्यांच्या अनुभवांच्या पाऊस धारांत चिंब भिजून अनोखा प्रवास जाणून घेण्याऐवजी आपण त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवून पुन्हा टळटळीत उन्हात ढकलून देतो आहोत. अरेरे!
अशा जुन्या जाणत्या खोडांना बिलगून राहिले तरच कोवळ्या धुमाऱ्‍यांना कोंब फुटत असतात. त्यांच्या या उतार वयात आपल्या सारख्या यंग जनरेशनची त्यांना साथ मिळाली तर त्यांच्या आयुष्याचे उत्तररंग आपल्याला जवळून अनुभवता तर येतीलच शिवाय ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो त्यांच्याप्रति सद्भावना देखील दाटून येतील. ज्यांनी आपल्याला अंगावर खेळवलं, वाढवलं, जगण्यालायक बनवलं त्यांना त्यांच्या पडत्या काळात आपणच सांभाळून घ्यायचं नाही तर कुणी?
तेव्हा अशा ज्येष्ठ चिऱ्‍यांची तटबंदी ढासळू न देता त्या बुरजांच्या छायेत राहून त्यांच्या उंचच उंच अन् भव्यदिव्य बांधकामाला नेहमीच कुर्निसात करीत गेलो, तरच समस्त ज्येष्ठांप्रति कृतज्ञता, आदरभाव, शुभेच्छा-सदिच्छा व्यक्त केल्याचे समाधान आपल्याला लाभेल..