एखादी संध्याकाळ अशीच;
तुझ्या आठवांना घेउन येणारी;
आशेच्या पायऱ्यांवरून माझा;
नकळत कडेलोट करणारी.
माझ्या स्वप्नांच्या पायघड्या;
अस्तित्वापासून वंचिलेल्या;
माझ्या मनाच्या गर्तेत;
खोल कुठेतरी रुतलेल्या.
तुला समजून घ्यायचं ठरताना;
तुझं क्षितिजाच्या पलीकडे जाणं;
तुळशीपुढे ठेवलेल्या दीव्यामध्ये;
माझं मन जळत राहणं.
आता थकायला होतं;
रोखून धरलेलं सांडायला होतं;
चुकलेल्या वाटांवर;
तुझ्या मिठीत विसावासं वाटतं.
अशीच एखादी संध्याकाळ;
पुन्हापुन्हा मला छळत राहते;
तु माझ्यापासून दुर जाताना;
सगळे दुवेच पुसत जाते.