तुझ्या उंबऱ्याची माती

तसं पाहिलं तर सत्शील व्यक्तिंनी उंबरा ओलांडू नये असे म्हणतात. त्यामानाने तुझा उंबरा फारच मोलाचा. जणू एखादी लक्ष्मणरेखाच. ती ओलांडली की माणसाने सद्गुणांना सोडले असे मानतात. वर्षअखेरीस तुझ्या उंबऱ्‍याच्या अलिकडे अगणित सद्गुणांची भली मोठी रास साठलेली असते. ती आम्हां 'अ'शीलवंतांना खुणावते. त्या राशीने भारीत झालेली मूठभर माती जरी मिळाली तरी उंबऱ्‍या पलिकडे जाऊन केलेल्या कुकर्मांचे प्रायश्चित्त मिळाल्यासारखे वाटते. ती दिव्य मृत्तिका आम्ही ढोल ताशे बडवित वाजत गाजत तुझ्याच वस्तीतून आमच्या ग्रीनलाईटच्या दुनियेत आणतो. अन् त्या सद्गुणांच्या मातीची भावना आमच्या गाऱ्‍याला देऊन माँ दुर्गेची भव्य मूर्ति साकारतो...
अशा सद्गुणरुपी देवतेची पुजाअर्चा मोठ्या धुमधडाक्यात होते. कारण आम्ही आमचे दुर्गुण तुझ्या उंबऱ्‍यापलिकडेच तुझ्या शेजेवर उतरवून आलेलो असतो. आणि आता आमच्या जोडलेल्या हातांपुढे उभी असते ती उत्तमाची सगुण देवता.
काय ही शुद्धतेसाठीची परंपरा अन् काय ही कुकृत्य झाकण्यासाठी योजिलेली रूढी!
तू मात्र आयुष्यभर आमचे दुर्गुण झेलतेस, आमच्याच दुष्कृत्यांसवे जगू पाहतेस, आमच्या पापांना अंगावर अन् अंगातही मिरवतेस. आम्ही मात्र सर्व काही करुन नामानिराळे राहण्याकरिता तुझा उंबरा खणतो. परंतु गेले वर्षभर रात्री अपरात्री, या ना त्या कारणाने, कधी कधी दिवसाढवळ्यासुद्धा चारपाच टाळक्यांसह झिजवलेला तुझा उंबरा आम्हांला तेव्हा कणभरही आठवत नाही.
तू आम्हांला खडसावशील देखील. 'आताच का बरे वाजत गाजत येता?' असेही विचारशील. 'आमच्या नरकयातना दूर करण्याच्या कोणत्या योजना तुम्ही आणल्यात?' असाही तुझा रास्त सवाल असेल. 'आम्हांला वर्षभर तुच्छ लेखून वापर करुन घेता, आम्ही का म्हणून तुमचा मनमानी अन्याय सोसावा?' असेही तू विचारशील व उंबऱ्‍याची मृत्तिका देण्यास विरोध करशील.
थातूर मातूर उत्तरे अन् आश्वासने देण्यात तर आम्ही माहीरच असतो. काहीतरी गोड गुळचट हवाला देऊन आम्ही तुझा उंबरा खणण्यात यशस्वी होतो. कारण तूही हतबल असतेस, अन् आम्हीही अगतिक! आम्हांला हवी असते आमच्याच सद्गुणांनी रंगलेली तुझ्या उंबऱ्‍याची मूठभर माती..