अबईच्या शेंगांची आमटी

  • अबईच्या शेंगा धुवून, चिरून
  • कोणतीही डाळ गरजेनुसार
  • १ मोठा कांदा, १ हिरवी मिरची
  • ४-५ लसुण पाकळ्या
  • हिंग, हळद, मसाला अंदाजे
  • अर्धा चमचा गरम किंवा गोडा मसाला
  • चवीनुसार मिठ
  • २, ३ कोकम किंवा लिंबाचा रस
  • थोडासा गुळ
  • फोडणीसाठी तेल
५ मिनिटे
५-६ जणांसाठी

अबब, अगबाई केवढ्या मोठ्या शेंगा ह्या संवादावरून कदाचित ह्या शेंगांना अबई हे नाव पडल असेल. गुलमोहराच्या शेंगांप्रमाणे ह्या शेंगा लांब होतात.

फोटोतील शेंगा कोवळ्या आहेत त्यामुळे त्या छोट्या आहेत.
अबईच्या शेंगांची भाजी व आमटी दोन्ही करतात.

अबईच्या अश्या प्रकारे किंवा तुम्हाला हव्या त्या शेप, साईझ मध्ये कापून घ्या.

पहिला मस्त गरम गरम तेलावर लसुण गुलाबी करा म्हणजे मस्त स्वाद येतो. आता त्यावर कांदा, मिरची घाला. मिरची ऑप्शनल आहे. मी स्वादासाठी घातली होती.

आता कांद्याला गुलाबी रंग आला की त्यात हिंग, हळद टाका, थोडे परतवून हिरव्या गार अबईच्या शेंगा घालून त्यावर मस्त लाल लाल मसाला टाका. त्यावर लगेच कोणतीही डाळ घाला. आता कलर कॉंबिनेशन न्याहाळा.

नुसत बघत बसू नका रंगसंगती, नाहीतर करपून जाईल. मी तेच केल. रंग आवडले म्हणून बघत बसले आणि भाजी खाली थोडी करपली. न्याहाळून झाले की सगळ एकजीव करा. त्यात गरजेप्रमाणे पाणी घाला. आता जरा धिर धरून डाळ आणि शेंगा शिजुद्या. सगळ शिजल की त्यात राहीलेला माल मसाला म्हणजे मिठ, कोकम किंवा लिंबुरस, गुळ गरम किंवा गोडा मसाला घाला. चांगल उकळू द्या रटरट आवाज करत. आता अबईच्या आमटीचा "अगबाई झाली तय्यार" म्हणून गॅस बंद करा. बघा झाली तय्यार तुमची अगबाई अरेच्चा अबईची आमटी.

ह्या शेंगांई नुसती कांद्यावर भाजीही करता येते. 

माझी शोधक नजर