चित्रपट परीक्षण: रामायण -द एपिक ! पैसा वसुल !!

~~ रामायण ~~
मला वाटतं की लहान थोरांपासून ज्यांना बोलता वाचता येत असा एकही माणूस नसेल ज्याला 'रामायण' माहीत नाही. तोच तोच विषय पुन्हा पुन्हा येऊन देखील आणि त्यावर अनेक चित्रपट/सिरियल्स बनवल्या जाऊन देखील चेतन देसाई ने हवा तसा परिणाम साधला आहे. !
संगीत दिलखेचक नसले तरीही त्याचा योग्य वापर करण्यात यश आले आहे, ऍनिमेशन सुपर्ब आहे, मी स्वतः जवळ जवळ ४ ऍनिमेटेड रामायण पाहिले आहेत -- त्यातले सर्वात सुंदर - "रामायण- द लिजेंड ऑफ प्रिन्स राम" च्या तुलनेत आजचा सिनेमा थोडा कमी पडतो, अर्थात रावणासाठी अमरिश पुरी ने दिलेला तो आवाज अजरामर आहे --- त्याच्या जवळपास सुद्धा आशुतोष राणा पोचू शकला नाही हे खरे... ! परंतु भारतीय ऍनिमेशन चे प्रयत्न नक्कीच वाखाणण्यांजोगे आहेत !!
चित्रपटाचे कथानक वेगळे काय सांगू ? सर्वांना माहीतच आहे परंतु काही बाबी आवडल्या त्या आवर्जून सांगाव्या वाटत आहेत -
१) राम वनवासात जाताना दशरथाची दुर्दैवी अवस्था उत्तम मांडली आहे -- (त्यातच ह्या 'अयोध्या खटल्या'च्या पार्श्वभूमीवर)--दशरथाचा --> "राम... मत जाओ राम.. . ये राजपाठ तुम्हारा अपना है... अयोध्या तुम्हारी है राम... मत जाओ" हा डायलॉग ला आपसूक मनात अभिमान निर्माण होतो.
२) ऊर्मिला राजवाड्याच्या सौंधातून लक्ष्मण/राम/सीतेला निरोप देते तेव्हा तिच्या डोळ्यातला अश्रू, आणि त्याच अश्रूंचा पुढे नाव वल्हवतानाचा उडालेला थेंब - ह्या ऍनिमेशन ला १०० मार्क्स !!
३) रामाचा वनप्रवास अयोध्या ते  दंडाकारण्य, पंचवटी, सीतेचा शोध घेण्याचे रस्ते ही मार्गक्रमणीका मॅप च्या साह्याने उत्तम दाखवली आहे.
४) सगळीकडून रावणाचे दूत पक्षांमार्फत खलिता पाठवून संपर्कात असतात- तो खलिता पक्षी कॅच करतो.. तोंडात पकडतो ते ऍनिमेशन मस्त आहे
५) हनुमान प्रचंड (अगदी HUGE) पीळदार दाखवला आहे --बघूनच आपोआप मनोमन हात जोडले जातात.
६) माकडांचे गाणे 'हम से है खुशियाँ' मस्त आहे-- लहान मुलांना आवडेल नक्कीच !!
७) रावणाच्या राजसभेत प्रत्येक आसनावर रावणाचे अंतर्मन (इथे ट्रिक पक्की जमलीये.. )  त्याला सूचना/सला देताना पाहून भारी वाटतं !! आणि प्रत्येक वेळी रावण सभेत "हम....-- राक्षस है" !! ची आरोळी देऊन जोष वाढवत असतो !!
८) सर्वांत अंतिम युद्धामध्ये जेव्हा रावण युध्धभूमीवर येतो आणि मंत्रोच्चार करत स्वतःचे एकाचे हजार - दश हजार - शत हजार प्रती रावण (थोडक्यात CLONE )बनवून हल्ले करतो ते खूप आवडले.. !
मुद्देसूद उत्तम बांधणी, फापटपसारा नाही, आणि पुढे काय होणार हे माहीत असूनही खुर्चीत खिळवून ठेवायची खुबी जमल्यामुळे ह्या चित्रपटावर खर्च केलेले पैसे वसूल होतात.
लहानग्यांना आवडेल. मोठ्यांतल्या लहानग्यांना सुद्धा.... 
वेळ मिळाल्यास नक्की बघा... !! चित्रपटाचे गुणांकन  ४/५ करायला हरकत नाही.
--
आशुतोष दीक्षित.