तुझी वाट बघता बघता..........

तुझी वाट बघता बघता, नेहमी मला हे असेच होते
प्रहरावर प्रहर उलटून जातात ,अन दिवसाची रात्र होते

तुझ्या येण्याची चाहुल, रातराणी हलकेच सांगून जाते
आठवणीने तुझ्या चंद्र शहारतो ,अन चांदणीही मोहरून जाते

नकळत कुठुनसा अल्लड वारा ,मग ओठी गीत तुझे गुणगुणत येतो
उगाचच रिकामटेकडा सैरावैरा पळून, मात्र उरी घालमेल वाढवून जातो

आठवत नाही पण बराच वेळ ,मी  एकाकी निशःब्द नुसता बसलेला असतो
वेड्यापरी इथे येण्याऱ्या सगळ्या वाटांवरी ,तुझ्या पाऊलखुणा शोधत असतो

रात्र चढता चढत जाते, मात्र तु काही येत नाही
तुला न भेटता निघण्यास हे पाऊलही धजत नाही

तु न आलेली पाहून चांदणीही आता हिरमुसली आहे
तिची ती घालमेल पाहून पहाटही वेशीवर विसावली आहे

दर रात्री या थडग्यावर बसून वाट मी तुझी पाहतो आहे
"आतातरी भेटून जा सोडव मला"आर्त विनवणी करतो आहे

तुझी वाट बघता बघता अजून एक रात्र विझून जाते
तुझी वाट बघता बघता नेहमी मला हे असेच होते............