शब्द आटले ओठात, गेले तडे जीवाला,
अन् आस ही मनीची, कशी कळे आभाळा,
ओढ ना जगण्याची, जेव्हा वाटते मनाला,
तेव्हाच आयुष्याचे दान उरले कसे?
क्षण साठवून तुझे, जरा जगावे म्हणता,
राख सारी त्या क्षणांची, गेली उडून नभाला,
धाय मोकलून माझे, शब्द फुटले ओठात,
शुभ्र कळ्यांनी ते झेलले, तुला कळेना ते कसे?
तुझ्या माझ्या जगण्याच्या, फांद्या मिसळून गेल्या,
तुझ्या अस्पष्ट सावल्या, मला वेडावून गेल्या,
जग दाटलं भोवती, तुझा मनाला आधार,
तरी तुझ्या माझ्या नात्यात प्रश्न पडती कसे?
माझे भुईवर जिणे, क्षितिजाची ओढ तुला,
तृप्त तुझी तृष्णा झाली, तगमग होते किती जीवा ,
तुझी शीतल झुळुक, वारा तुझा छेडे मला ,
भाषा आपल्या दोघांची अशी निःशब्द कशी?