मृगजळ

दूरदेशी फिरताना जेव्हा नवलाईची हौस फिटलेली असते
कर्तृत्वाच्या अश्वमेधावर पळताना घरचे अंगण दूरावलेले असते
कमावले काय, गमावले काय, आयुष्याचे सगळे गणितच चुकलेले असते
तेव्हा कळते की ज्याच्या मागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते

इथल्या माझ्या राजवाड्यात माझ्याशिवाय आता कुणीच बोलत नाही
उशिरा उठल्याबद्दलचा आईचा ओरडा आता दूरूनही ऐकू येत नाही
मिळवलेल्या यशाबद्दल बाबांची शाबासकी आता पाठीवर पडत नसते
तेव्हा कळते की ज्याच्या मागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते

रस्त्यावरच्या गर्दीत मिसळताना, मन मात्र एकाकी होउन जाईल
तेव्हाच समोरून आपल्या मित्रांची छबी हलकेच ओझरून जाईल
वळून पाहिले तर अनोळखी गर्दी आपापल्या वाटेला लागली असते
तेव्हा कळते की ज्याच्या मागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते

काल पाहिले होते तिला खिडकीत आपले ओले केस वाळवत असताना
माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्यावर खास ठेवणीतले खट्याळ हसू फेकताना
तिच्या आठवणीने डोळ्यांसोबत आता मन ही भरून आलेले असते
तेव्हा कळते की ज्याच्या मागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते

आता क्षणभर ही थांबू नये, तडक घरी निघावे ही इच्छा जोर धरू लागली असते
पण जबाबदारीच्या सबबीखाली नियतीने परतीची तारिखच गायब केलेली असते
द्रुदैवाने कॅलेंडरची पाने पलटण्याशिवाय तरी आपल्या हातात काय असते
तेव्हा कळते की ज्याच्या मागे धावत होतो ते एक फक्त आणि फक्त ....मृगजळ असते