शुभ दीपावली...

ज्योतीचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वरमाऊली गोड शब्दात वर्णन करतात-

         जैसी दीपकळिका धाकुटी । बहु तेजाते प्रकटी ॥

सूर्यानं दुसरा सूर्य प्रकाशता येत नाही तसंच चंद्रानं दुसरा चंद्र उजळता नाही येत्.
दीपकळिकेची शोभाच आगळी.
तिवी बरोबरी सूर्याच्या तेजाला नाही करता येत्.
म्हणून देवासमोर दीप शोभतो.
त्याची प्रभा देवाचं नि भक्ताचं, दोघांचंही मुख उजळविते.
भगवंताच्या रूपाला गोडवा देते.
भक्तीला मांगल्यात न्हाऊन टाकते.
ज्योतीला हे पावित्र्य लाभलं कसं?

ज्योतीनं तप केलं.
ती जीवावर उदार झाली... क्षीण होऊ लागली.
विझणार... तेव्हढ्यात् भगवंत प्रसन्न झाले...
‘तुझं हे कठोर तप कशासाठी? ’ भगवंतांनी कळकळीनं आणखीन् विचारलं, ‘काय हवंय् तुला? ’
‘मला चिरंजीवपद हवंय्! ’ ज्योतीनं भगवंताच्या चरणी माथा विसावत नम्रतेनं सांगितलं.
‘तथाऽस्तु’ म्हणत भगवंत पुढं म्हणाले, ‘ये, माझ्या हृदयात तुला स्थान देतो. ’
‘तुमच्या हृदयमंदिरावर कमलेचा अधिकार आहे. ती कमलाच तिथे शोभते! ’ ज्योती उत्तरली.
भगवंतांनी स्मित केलं... त्यांना ज्योतीच्या निर्मल मनाचं कौतुक वाटलं...
‘मग कुठं राहशील? ’ तिला भगवंतांनी विचारलं.
‘भगवंता, मला संतांच्या हृदयात जागा दे... ते चिरंजीवपद मला लाभू देत्’... ज्योतीनं विनवलं.
ज्योतीच्या बोलण्यानं लक्ष्मी संतोषली. तिनं ज्योतीला वरदान दिलं,
‘तूं ज्याच्या हृदयात राहशील, तो धन्य होईल... त्याच्या वचनात मी राहीन. ’
भगवंतांना आनंद झाला.
त्यांनी ज्योतीच्या इच्छेप्रमाणे तिला संतांच्या हृदयात स्थान दिलं.
संतांचं संतपण तेजाळलं.
ज्योतीला दिलेल्या वचनाप्रमाणे लक्ष्मी संतांच्या वचनात राहू लागली.
संतांच्या इच्छेनं आर्ताला सुख लाभू लागलं.
भक्त म्हणू लागले, ‘संतम् शरणं गच्छामि ।’
संतांचा जयजयकार देवाच्या बरोबरीनं करू लागले!
***
  आम्हा साऱ्यांची हृदये इतकी निर्मल व्हावीत की तेथे नित्य वास करण्यासाठी दीपोज्योतीला जागा असावी.
साऱ्या मनोगतींना दीपावलीच्या शुभेच्छा.