आदरार्थी मैत्र...

ती सदासर्वदा चैतन्यमयी नजरेनं वावरणारी, नेहमी हसतमुख राहणारी, निर्मळशा झऱ्‍यासारख्या मुक्त स्वभावाची एक युवती.
नेहमीच खळाळता संवाद साधीत हास्यमळा फुलवण्याची तिची हातोटी जगावेगळी. तिचा मार्केटींगच्या क्षेत्रात वावर असल्यामुळे नव्हे तर प्रत्येकाला तिच्या बद्दल वाटणारा स्नेह, आपुलकी अन् विश्वास यांमुळेच तिचे दोन मोबाईल अविश्रांत रुणझुणत असतात. तिच्या बोलक्या स्वभावामुळे ती प्रत्येकाला आपलंसं करीत जाते. तिचं फ्रेन्ड सर्कलही मोठं विस्तारत जाणारं. त्यात कमी अधिक वयाच्या अनेक व्यक्ती. तिच्या बरोबरीच्या जितक्या मैत्रिणी तितकेच मित्रही. या सर्वाँशी ती मिळून मिसळून राहणार, मोकळेपणाने वागणार, बोलणार, आस्थेनं कुटुंबियांची चौकशी करणार. प्रत्येकाच्या घरातल्या व्यक्तिंना नावासहीत लक्षात ठेवण्याचं कसब तिच्याकडे आहे, त्यामुळेच तिला अनेक चांगल्या मित्र मैत्रिणी लाभल्यात.
आमची ओळख फार फार तर दोन अडीच वर्षाँपासूनची. तशी ती विशी पंचविशीतली. नव्या युवापिढीची प्रतिनिधी असावी अशी. परंतु त्यामुळे काही आमच्या मैत्रीत वयाची भिंत उभी राहिली नाही कधी. तसं जाणवलंही नाही. ती मला आदरार्थी संबोधून संवाद साधत असली तरी आपुलकीच्या नात्याने आमचं मन मोकळं संभाषण होत असतं.
'काय हो मॅडम? तुम्ही भेटेल त्याच्याशी मैत्री करता का हो?' असं विचारता 'कसं असतं माहितीये का सर..' अशी सुरुवात करीत ती तिच्या पिढीला उमजलेले तत्वज्ञान अगदी सहजतेने विशद करीत जाते- 'मैत्री शुअर असली तरी प्युअर असेल तरच मी जास्त इंटरेस्ट घेते. नाही तर कोणी अघळ पघळ बोलू लागला की पुन्हा फोन करायचा नाही. असं स्पष्टच सुनावते.'
कधी मी तिला एखादा जुना अनुभव रंजकपणे कथन केल्यास त्यावर प्रतिक्रिया देतांना 'अर्रे बापरे!' असा आश्चर्योद्गार काढीत आमच्या पिढीला सलाम करण्याची जाणही तिच्यात मुरलेली.
तिच्याशी झालेल्या संभाषणातून तिचा अविरत वाहणारा निर्मळ जीवनपट उलगडत गेला..
निरेहून दररोज अपडाऊन करीत ती पुण्यात येते; अनेक संभाषणाच्या साखळ्या जोडीत. तिचा प्रवास मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्यात सुरु होतो, अन् संपतोही तसाच. तसं पाहिलं तर पुण्यातही तिचे बरेच नातेवाईक, बराच गोतावळा. प्रत्येकाशी तिचा आपुलकीयुक्त संपर्क अजूनही टिकून आहे. कोणाचाही फोन आला तरी ती तत्परतेने घेतेच. अनेकजण आपले भलेबुरे अनुभव किंवा अडीअडचणी तिच्याशी शेअर करतात. आपल्या मनातलं हक्काने ऐकवण्याचं ठिकाण म्हणजे ती. जणू प्रत्येकानं आपले प्रॉब्लेम्स लिहून ठेवण्याचा फळा किंवा डायरीच! त्या सर्वाँना ती समजून घेते, त्यांच्या व्यथा ऐकते, तिच्या परीने सजेशन्स देत राहते. मुळात तिच्याभोवतीचं मैत्रीचं वर्तुळ बरंच मोठं असल्याने तिचं अनुभवविश्व समृद्ध आहे. म्हणूनच अनेक प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे सहजपणे उपलब्ध होतात. तिच्या फ्रेन्ड सर्कलमधील हरेकाच्या आयुष्यातल्या चढउतारांची साक्षीदार असलेली ती एकमेव मुलगी असावी. तिच्याशी एकदा जरी संवाद साधला की लगेच विश्वास निर्माण होऊ लागतो. याचे कारण तिच्या दिलखुलास अन् उत्साही संभाषण कौशल्यात दडलेलं आहे. ती इतरांना फक्त ऐकूनच घेते असे नाही, कधी कधी आपलीही कैफियत अधिक विश्वासाने मांडते.
मध्यंतरी असेच बोलता बोलता तिने तिच्या नात्यातील मुलाशी जमलेले लग्न मोडल्याचं जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझ्या काळजात क्षणभर चर्र झालं. तिनं ज्यांच्याशी हा दर्द शेअर केला असेल त्यांच्याही भावना अशाच सहानुभूतीच्या असणार यात शंका नाही. तो तिचा अर्ध्यावर मोडलेला डाव ऐकून वाटलं, इतक्या गोड स्वभावाच्या मुलीला त्यानं का बरे त्यागावं? पण त्यापाठीमागे बरीच कौटुंबिक अन् वैयक्तिक कारणं होती..
या घटनेनंतर दुसरी कोणी असती तर खचून गेली असती, पिचून गेली असती. परंतु तिचं भलं चाहणाऱ्‍या अनेक व्यक्ती या दुनियेत आहेत. त्यांच्या पाठबळावरच ती पटकन सावरू शकली.
'आयुष्यात वादळे येतच असतात सर, त्यांना का म्हणून घाबरायचं?' असा तिचा प्रसंगांपुढे उभे राहण्याचा ठाम निश्चय असतो. 'जे घडले ते पुढे काहीतरी चांगले व्हावे यासाठीच घडले.' यावर तिचा पूर्ण विश्वास. एवढा धीर तिच्यात आला कोठून? तर आपल्या पडत्या काळातही साथ देऊ शकणाऱ्‍या व्यक्तिंच्या आश्वासक मैत्रीतूनच. 'इतरांचं भलं चाहलं की आपलंही भलंच होतं असतं.' हे तिचं जीवनतत्व. त्यामुळेच ती त्या मानहानीच्या प्रसंगातून उभी राहू शकली.
आजही ती अनेक प्रश्नांवर योग्य तो सल्ला द्यायला तत्पर असते. तिच्याशी बोलत राहिलं की एक प्रकारचं स्पिरीट वा प्रेरणा आपोआप मिळत जाते. मनावरचं मळभ दूर होतं, तिच्याशी गप्पा रंगत जातात अन् एक आश्वासक चैतन्य प्रदान करतात. ताणतणावांमुळे कोसळलेल्या व्यक्तिला ती स्थिर आधार देत राहते, समजावते, कोठे चुकतंय तेही नेमकेपणाने आडपडदा न ठेवता सांगून टाकते. इतकंच नाही तर एखादा टगेखोर उगाचच फोन करुन छेडू लागला तर त्याला तिथल्या तिथेच झापूनसुद्धा काढते !
असं तिचं सर्वांगिण व्यक्तिमत्व भुरळ पाडणारं असलं तरीही ती स्वतःची लक्ष्मणरेखा कधीच ओलांडत नाही. सीमारेषा सांभाळूनच वागते आणि म्हणूनच ती जरी लहान असली तरी अनुभवाने मोठी वाटते. त्यामुळे मी तिला 'अरे-तुरे' संबोधत नाही. आदराचा परीघ छेदून 'अगं-तू गं' करीत तिच्या निकट जाण्याचा आततायीपणा करण्यास मन धजावत नाही. कारण ती परिपूर्ण आहे, तिच्या ठिकाणी स्वतंत्र आहे. ती कित्येकदा म्हणते, 'सर, मी लहान आहे. अरे-तुरे केलेलं चालेल मला. काही चुकलं तर नक्की सांगत जा. ऐकेन मी, तुम्ही मोठे आहात ना म्हणून.' परंतु इतरांना मोठे मानून त्यांचा मोठेपणा जपणाऱ्‍या व्यक्तीच मोठ्या मनाच्या असतात. तशीच ती आहे. स्वतःकडे मोठेपण न घेणारी. इतरांचा आदब राखीत संवाद साधणारी. म्हणूनच तिच्याशी जुळलेले आदरार्थी मैत्र मला फार मोलाचे वाटते. असे मैत्र प्रत्येकाने जपले पाहिजे....
तिच्या भावी संपन्न व समृद्ध आयुष्याकरिता हार्दिक शुभेच्छा!
( पूर्व प्रसिद्धी- सकाळ- मुक्तपीठ- २० सप्टें.२०१०.)