जय नावाचा इतिहास जो
सारे जेत्यांचेच लिखाण आहे
पराजितांना अधर्मी ठरवून
उंच विजेत्यांचे निशाण आहे
राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी
वचन गुरुंचे महान आहे
एका अंगठ्याच्या कर्जापायी
गुरुधर्म तो गहाण आहे
सूताघरी सूर्यपुत्र दानी
वंचनाच नियतीचे दान आहे
धर्माची चौकशी करतो ईश्वर
उरी भावाचाच बाण आहे
जरी सुयोधन अंधपुत्र तू
राजपदीही अपमान आहे
सत्तालोभ धर्माधर्म कधी
कमरेखालीच प्रहार आहे
कर्मयोगाची करुनी भलामण
हरला गुरुचाच प्राण आहे
सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे
चिरंजीव विराण आहे
पराजितांना अधर्मी ठरवून
उंच विजेत्यांचे निशाण आहे.....