पाटवड्यांची भाजी

  • डाळीचे पीठ १ ते दीड वाटी
  • सुके खोबरे, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची
  • जिरे, मोहरी, तिखट, मीठ, गोडा व गरम मसाला -१-१ लहान चमचा
  • तेल, पाणी
३० मिनिटे
३-४ जण

प्रथम बेसन एका परातीत काढून घेऊन त्यात तिखट, मीठ, हळद व चमचाभर तेल टाकून थोडे थोडे पाणी घालून कणकेप्रमाणे मळून घ्यावे.  (एकदम पाणी घालू नये. फार चिकट काम आहे). नंतर त्या उंड्याची शंकरपाळ्या प्रमाणे पोळी लाटून पोळपाटावर छोटे छोटे शंकरपाळे कापून पेपरवर पसरून ठेवावे. 

गॅसवर एका पातेलीत ४-५ वाट्या पाणी उकळायला ठेवावे. सुके खोबऱ्याचा कीस भाजून घेऊन आले- लसूण, मिरची-जिरे सहित पेस्ट बनवून घ्यावी. कढईत तेलाची फोडणी करून त्यात हे वाटण टाकावे, जरा परतल्यावर, तेल सुटू लागताच तिखट, कांदा लसूण मसाला (अथवा गरम मसाला) घालावा. नंतर उकळते पाणी त्यात ओतावे. २ चमचे धनेपूड, मसाले, मीठ घालावे. रस्सा उकळू लागला की शंकरपाळी हळूहळू त्यात सोडावीत. ५-७ मिनीटे चांगली शिजली की कोथिंबीर पेरून झाकण टाकावे.

गरम गरम पाटोड्या, लिंबाची फोड, कांद्याची चकती व फुलक्यांबरोबर वाढाव्यात.

सुरुवातीला जरी रस्सा पातळ वाटला तरी बेसनाने थोडा आळतो.

आवडत असल्यास एक कांदा भाजून वाटून लावू शकतो. टोमॅटो पण बारीक चिरून घालू शकता.

आत्या