डेलावेअरचे खेकडे आणि स्थलांतरित पक्षी - एक अन्नसाखळी

माझ्या मुलीबरोबर मी बॉर्डर्स या पुस्तकांच्या दुकानात प्रवेश केला आणि आम्ही दोघी एका टेबलवर आपापल्या पुस्तकामध्ये रममाण होऊन गेलो. नेहमी हे असच होतं पुस्तकांच्या दुकानात प्रवेश, मी कॉफी घेते आणि मग एका टेबलवर आम्हा दोघींची २ वेगवेगळी विश्व साकार होऊ लागतात. जिवंत, अतिशय मोहमयी, आम्हाला हरवून टाकणारी. त्यात खंड पडतो तो फक्त एक पुस्तक बदलून दुसरं घेण्याकरता.
आज मी जरा बदल म्हणून कविता किंवा स्वयंसुधारणा (सेल्फ-इंप्रूव्हमेंट) ही नेहमीच्या विषयांची पुस्तकं न घेता माझ्या मुलीकरता म्हणून काही मिळत आहेत का हे बघत होते. मला माहीत नव्हत एक अतिशय सुंदर, शब्दांनी चित्र रेखाटणारे आणि चित्रांतून कविता बोलणारे असे पुस्तक मला मिळणार आहे. सहज म्हणून मी "हॉरसशू क्रॅबस अँड शू बर्डस" हे पुस्तक चाळू लागले. पहिलं जाणवलं ते हे की पानापानावर समुद्राच्या पोटातील गूढरम्य सृष्टी चित्रकाराने त्याच्या समर्थ कुंचल्याच्या फटकाऱ्यातून उभी केलेली आहे.
पुस्तकाची सुरुवातच खिळवून टाकणारी आणि उत्सुकता ताणणारी आहे. "वसंतातील दाट धुक्याने आच्छादलेल्या चांदण्या रात्री, डेलावेअरच्या खाडीमध्ये खोल समुद्रतळातून एक पुरातन जीव आपला प्रवास सुरू करतो आहे.... कोण आहे हा प्राणी? " आणि मग प्रत्येक पानागणिक आपल्याला नवी, अद्भुत माहिती मिळत जाते त्या प्राण्याबद्दल. त्याचा जीवनपट, त्याचे जीवनचक्र (लाइफ-सायकल) आपल्या समोर उलगडत जाते आणि आपण हॉरसशू खेकड्याच्या प्रेमात कधी पडतो ते आपल्याला कळतही नाही. परत हे सर्व वाचत असताना पुस्तकात विविध मोहमयी आकृतिबंध इतस्ततः पाहून हा खेकडा अगदी डोळ्यासमोर साकार होतो. त्याला असलेले १० पाद, एखाद्या कोळ्यासारखं त्याचं चालणं, त्याची हिरव्या मोत्यांसारखी अंडी, त्याचं पाण्यात उलटं पडून पोहणं सारं काही डोळ्यासमोर उभं राहतं.
जसजसा वाचक गुंतून पुढे पुढे वाचत जातो तसतसा त्याला या खेकड्याचे पर्यावरणातील विशिष्ट स्थान (नीश) कळते. दक्षिण अमेरिकेतून जेव्हा रेड नॉट पक्षी आणि तत्सम अनेक दुर्मिळ पक्षी जेव्हा स्थलांतर करून येत असतात तेव्हा डेलावेअर खाडीमध्ये घरट्यात हॉरसशू खेकड्याची मादी असंख्य अंडी घालत असते. हे रेड नॉट पक्षी जेव्हा डेलावेअर खाडीमध्ये विश्रांतीकरता उतरतात तेव्हा हीच अंडी समुद्राच्या लाटांनी किनाऱ्यावर पसरतात. आणि पक्षांकरता मेजवानी ठरतात. पक्षांना हे अतोनात सोईस्कर ठरते कारण स्थलांतर करून आल्याने या पक्षांमध्ये एवढे त्राणच उरलेले नसते की ते मासे पकडून खाऊ शकतील अथवा कवचधारी प्राण्यांचे कवच फोडू शकतील. अशा रीतीने निसर्गच साक्षात या पक्षांची काळजी वाहत असतो.
या खेकड्यांचे हे पर्यावरणातील स्थान आता कुठे माणसाला कळते आहे. आतापर्यंत मानव यांना कापून माशाच्या गळाला आमिष म्हणून लावत असे. त्यामुळे खेकड्यांचे अस्तित्व धोक्यात आले होते. पक्षी, या खेकड्यांवर अवलंबून असलेल्या पक्षांचे अस्तिवदेखील धोक्यात येऊ पाहत होते.
मला हे पुस्तक खूप आवडले. यामागील कारण कदाचित हे असेल की डेलावेअर हे मला "घर" वाटते. आम्ही खूप फिरलो- कॅलिफोर्निआ, डेलावेअर, पेससिल्व्हेनिआ, व्हरमोंट, टेक्सास पण स्थैर्य आणि आनंद डेलावेअरला लाभला. हे पुस्तक "डेलावेअर" विषयी असल्याने येथील "लोकल" या भागात सापडते. पुस्तक वाचनीय आहेच. ज्यांना निसर्गप्रेम आहे त्यांच्यासाठी मी जरूर शिफारस करेन.