बूमरँग

'आई, ह्या प्रश्नाचं उत्तर सांग ना'
'अरे, एकदा मन लावून धडा नीट वाचला की सगळ्या प्रश्नांची उत्तरं  सापडतात.'
'मिळाली आई, सगळ्या प्रश्नांची उत्तरं.'
गुड, व्हेरी गुड!'

 
'हॅलो, लॉग इन झाले, आता पुढे काय करू? '
'अगं, आई, स्क्रीनवर नीट बघ. पुढे काय-काय करायचं ते सगंळ्ळं तिथे येतं जातं, तसं तसं करतं जायचं.'
'हॅलो, आलं - आलं. माझं तिकीट आलं.'
'व्हेरी गुड मॉम!'

'कारे, आठवड्यावरच आली युनिट टेस्ट. सांगितलं नाहीस.'

'आई, अजून तू त्या मुलांची मुलाखत अजून पाठवली नाहीस मेल आलाय त्या मासिकवाल्यांचा.'

'अगं किती वेळ लागतो गुणाकार करायला अगं तुला पंधराचा पाढा येतो ना! मग, एकदम पंधरानेच गुणायचं हे काय तुमचं फाईव्ह सेवन झा थर्टी फाईव....... हे बघ पंधरा साते पाचोदरसे हाच्चे आले दहा.......अरे हो, फिफ्टीन सेवन झा  हंड्रेड न फाईव.........'
'हे अगदी सोप्प आहे!'

हे काय आई, कित्ती वेळ झाला लिहिते आहेस, मला प्रोजेक्टच काम करायचंय ना! हे काय करते, एकदा हे पेज उघडते, एकदा ते, दोन्ही पेजेस एकदम उघड ना ह्या पेजवरून तुला माहिती घ्यायची आहे ना, मग त्या पेजला छोटं करून साईडला ठेव आणि इथे लिही.'
'अगं हे अगदी सोप्प झालं!'

'अगं, मला आज इतकी कामं आहेत ना! बाहेर चाललीच आहेस ना, तर येतेवेळी धोब्याकडून कपडे घेऊन ये ना प्लीज.'

'आई, कंप्युटरवर काम करतेच आहेस ना, डेस्कटॉपवर प्रोजेक्ट आहे ना त्याला पेन ड्राईवमध्ये कॉपी करून ठेव ना प्लीज प्लीज प्लीऽऽऽऽज, मी जरा  मैत्रिणीकडे जाऊन येते. '

'अगं सारखं काय भटकणं, आज ह्या मैत्रिणीचा वाढदिवस, उद्या काय पिकनिक,,,,, अभ्यास-बिभ्यास काही आहे का नाही, घरात जरा पाय टिकत नाही, आईला कामात मदत तर दूरचीच गोष्ट.'

'आई, तुला नाही असं वाटतं की हे जरा अती होतंय, आज काय मनिषाच्या मुलाच्या लग्नाची हळद, उद्या काय लग्न, परवा काय किटी पार्टी..... कित्ती दिवस झाले तू नवीन काही खायला केलंच नाहीये. '

'माझी कामं झाली आहेत. चल, मराठीचे निबंध लिहायचे आहेत ना'

'हॅलो आई, आत्ता मला वेळ आहे. टीम व्ह्युवरवर लॉग इन हो. वॉव मॉम! बरंच काय काय केलं आहेस. गुड कीप इट अप मॉम!'

हॉउ टू टाल्क सो किडस विल लिसन, हॉउ टू लिसन सो किडस विल टॉल्क ह्या पुस्तकात लिहिलेलं शंभर टक्के खरंय त्याचबरोबर हॉउ टु बीहेव सो किडस विल कॉपी, हॉउ टु कॉपी सो किड्स विल बीहेव हेही तितकंच खरंय.