अनोखा

सहा सात वर्षांचा होतो. अंगणात खेळता खेळता सहजच त्याच्याकडे नजर गेली. तेव्हा त्याच पहिल्यांदा दर्शन झालं. अंगणात त्या रिकाम्या जागी तो उभा राहायला शिकत होता. काही दिवसातच  तो माझ्यापेक्षा मोठा दिसायला लागला.
दिवसामागून दिवस चालले होते. आता मी मोठ्या शाळेत जायला लागलो होतो. रोज शाळेत जाता जाता त्याच्याकडे एक नजर जायची. त्याचे पाय आता भरभक्कम झाले होते.  कदाचित शेजारीच असलेल्या विहीरमध्ये त्यानं ते बुडवून ठेवले असतील. कदाचित तेच पणी पिऊन पिऊन तो इतक्या दिमाखात उभा राहिला होता. अनेक कीटकांनी , पक्षांनी त्याच्या अंगाखांद्यावर सन्सार थाटून ठेवला होता.
      पण एके दिवशी काय झालं कोणास ठाऊक?  त्याची ती हिरवीगार पान गळायला सुरुवात झाली. महिन्याभरातच त्याची सर्व भरभराट जाऊन तो एका वृद्ध माणसासारखा दिसायला लागला. काय झालेला ते माहीत नाही पण  त्या नवीन किड्यांनी त्याच्यावर जोरदार हला चढवला होता.  त्याच ते हिरवं वैभव हिरावून घेऊन ते किडे आपला मोर्चा घेऊन समोरच असलेल्या मालकांच्या घराकडे वळले. त्यांचा सर्वांनाच प्रचंड त्रास होऊ लागला. 
ह्याच्यावर उपाय करायचा ठरला. त्यालाच कापून टाकायचं नक्की केलं गेलं.  दिवस नक्की झाला.
"कोणत्याही ब्राम्हणाच्या हातून होम - हवन करावा आणि मग चं पहिला प्रहार करावा. नाहीतर साडेसाती मागे लागते." कोणीतरी खडा मारला.३
पूर्ण वाड्यामध्ये हा "बाल" ब्राम्हण सगळ्यांच्या नजरेस पडला. परत इतका भाव आपल्याला कधी मिळणार? असा विचार करून  मी तातडीनं होकार दिला. आई च्या नन्नाच्या पाढ्याला कोणीच दाद नाही दिली.
होम झाला आणि पुढे सरसावत एकानं जोरात कोयताचा घाव त्याच्या अर्धमेल्या शरीरावर घातला. त्याच्या पांढऱ्या रक्ताच्या चिरकांड्या उड्याल्या. आणि एक एक करत सर्व जण त्याच्यावर तुटून पडले. कोयता आणि कुऱ्हाडीच्या माराचा सामना तो नाही करू शकला. सगळ्यांबरोबर  मी पण मग पुढे सरसावलो. दोन तीन घाव घालून हात मोकळे करून घेतले. आईनं लगेचच मला आत बोलावून घेतलं.
काही मिनिटान्मध्येच त्याच्या बलाढ्य देहा चं रुपांतर दीड दोन फुटाच्या खुंट्यामध्ये झाले. त्याची परत वाढ होऊ नये म्हणून त्याच्या उरलेल्या भागावर ऍसिड ओतण्यात आलं!
दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना नेहमीप्रमाणे माझी नजर त्याच्याकडे गेली. पण तो तिथ होताच कुठे? होते ते फक्त त्याचे अवशेष. तेही अर्धवट जळलेले. ते बघून आपण कुठेतरी चुकलो ह्याची जाणीव झाली.
साधारण एखादा आठवडा गेला असेल. मी नेहमीप्रमाणे त्याच्याकडे एक नजर टाकली. आणि काय आश्चर्य? त्या जळक्या खोडामधून मला एक एक हिरवी पालवी दिसली.
मी बाहेरूनच ओरडलो, "आई आई, हे बघ ह्याला परत पालवी फुटलिये.. "
"अरे, उंबराच झाड म्हणजे दत्ताच स्थान असत. तुम्ही कितीही काहीही करा. ते परत येणारच." आईनं आतून उत्तर दिल. तिला आधीच माहीत असावं कदाचित.
शाखेच्या हिवाळी शिबिरात एक जण भेटला. लोकांचे हात बघून भविष्य सांगत होता.
"ओंकार, माझा पण बघ की रे हात.. " मी हात पुढे केला. त्यानं सांगायला सुरुवात केली. सांगितलेल्या पैकी काही काही गोष्टी परिचित 'वाटल्या'. आणि तो अचानक पुटपुटला.. "तुझ्या घराच्या अगदी जवळच एखादं उंबराच झाड असेल तर त्याला रोज नमस्कार करत जा. चांगलं होईल तुझं. " ऐकून मला हादरा बसला. एका साध्या झाडावर लोकांची इतकी श्रद्धा असते हे पाहून जरा वेगळंच वाटलं.
घरी आल्यावर लगेचच 'त्याला' मी तांब्याभर पाणी घातलं. त्याच्याबद्दल श्रद्धा वाटली म्हणून नाही, पण तो एक सजीव आहे म्हणून  हात जोडून त्याची माफी मागितली.
आंघोळ झाल्यावर रोज त्याला पाणी घालून त्याच्यासमोर हात जोडायचा माझा नित्यक्रम झाला.
         काही महिन्यातच त्या नाजूक पालवी चं रुपांतर परत एकदा मोठ्या फांदीमध्ये झालं. परत एकदा तो मोठ्या दिमाखानं उभा राहिला.
एव्हाना गोष्ट फक्त नमस्कारापुरती उरली नव्हती, आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीजवळ आपण आपलं मन ज्याप्रमाणे मोकळं करतो, तसा माझ्या मनातला पसारा मी त्याच्यापुढे मनातल्या मनातच मांडायला लागलो.  मग त्या माझ्या चुका असतील, कोणी दिलेली शाबासकी असेल, किंवा एखादा भावनिक प्रसंग असेल. तो पण अगदी शांतपणे सगळं ऐकून घ्यायला लागला.  का कोणास ठाऊक, पण माझ्या एकलकोंड्या मनाला एक जवळचा मित्र मिळाला होता. माझं मलाच खूप छान, प्रसन्न वाटू लागलं.
          
ह्या  गोष्टीला आता आठ - नऊ वर्ष झाली. त्याला नमस्कार करून त्याच्यासोबत मनातल्या मनातच मनसोक्त गप्पा  मारण हा अगदी नित्यक्रम झाला आहे. आणि विशेष म्हणजे तो पण त्याची पान हालवून मला प्रतिसाद देत असतो.
त्याच्यानंतर आयुष्यात अडचणी आल्या नाहीत अस नाही. पण आलेल्या सर्व अडचणींना खंबिरपणे सामोरं जाण्याची एक शक्ती, नव्हे जिद्द आणि प्रेरणा आपोआप चं मिळत गेली. मग टेन्शन परीक्षेच असो, किंवा घरातील आर्थिक परिस्थिती चं असो. सगळ्या प्रश्नांचा गुंता अगदी सहजतेने सोडवायला यायला गेला.
पूर्वी शाळेत जाताना त्याच्याकडे नजर जायची. आज पण जाते. फक्त शाळेची जागा एका प्रतिष्ठित आय .टी . कंपनी नि घेतली आहे.