भरारी

तिच्यासाठी तेव्हा तो एक जवळचा, खुप जवळचा मित्र. सुखदू:खात साथ देणारा. तिला समजून घेणारा, आयुष्यातल्या कुठल्याही अडचणीत तिच्यासोबत असणारा. तिचं हक्काचं व्यासपीठ तिनंच ठरवलेल.

त्याच्यासाठी ती मैत्रीण, स्वप्नातली सहचरी, अल्लड तरुणी तर कधी समंजस प्रेयसी. खळाळत्या झऱ्यातल नितळ पाणी, तर श्रावणात हळुच डोकावणार इंद्रधनुष्य.

तिचं ते समुद्राच्या फेसाळलेल्या लांटांवर स्वार होऊन आकाशाला गवसणी घालण, त्याच भुमितीतल्या प्रमेयाबरोबर आयुष्यातल्या प्रमेयांकडे लक्ष देण.

तिच आकाशातल्या चांदण्यांना स्वत:च्या पदरात साठवणं आणि त्याचं वास्तवातल्या ठिणग्यांना तिच्यापासून दूर ठेवण.

तिने अनिमिष नेत्रानी बागडणाऱ्या फुलपाखराकडे पाहणं आणि तिच्या नकळत त्याने तिला डोळ्यांच्या पापण्यात साठवणं

पहिल प्रेम. त्याला भावलेल आणि तिला न समजलेल. पुस्तकातल्या पिंपळपानाप्रमाणे मनाच्या अरुंद कोपऱ्यात त्यान जपलेलं आणि स्वप्नपुर्तीसाठी कधीतरी तिने मागे ठेवलेल. ते अजाणत्या वयातल थोडसं अल्लड पण जीवापाड केलेल प्रेम.

त्याच्या या प्रेमाला ना अस्तित्व ना भविष्य. फक्त एका सांजसंधेला अलवारपणे सूर्यकिरणांना गुजगोष्टी सांगणाऱ्या संधीप्रकाशाच आयुष्य.

दिवसामागुनी दिवस सरताना वयाप्रमाणे आठवणी, संदर्भ, एखाद्याच आयुष्यातल महत्व, महत्वाकांक्षा सगळच बदलल तिच. ते मोरपंखी दिवस स्वतःच्या गगन भरारीपुढे तिला बालपणातले भातुकलीचे खेळ वाटायला लागले.

आयुष्याच्या एका वळणावर, तिच्या प्रवाहाविरुद्ध लढण्याला कदाचित मी नाहीच पेलवू शकणार हे सत्य त्यानं पचवण. आणि मी या सगळ्यासाठी नाहीच आहे हे तिच अनाहुतपणे त्याला सुचवण.

तिची स्वप्न, तिची भरारी त्या उंच आकाशासाठीच आहे. त्याच प्रेम एका मर्यादेपलिकडे नाही. कदाचित जमिनीवर राहुनच तिला उडताना पाहण हेच तर समर्पण त्याच्या प्रेमाच आणि त्याचही नेहमीप्रमाणे.

आकाशात भरारी घ्यायला पण जमीनीवरुनच झेपावलेली ती उंच उंच उडताना जमीनीवर हळुहळू नष्ट होत चाललेल्या ठिपक्याकडे पहायला विसरली की काय?

तो ठिपका जिथून आपला प्रवास सुरू झालाय तो मागेच सोडला का तिने? अरे हो मागेच तर सोडायच असत सगळ. पुढे पुढे जाताना मागच्याला कवटाळून बसलो तर पुढच क्षितीज कधीच हाताशी येणार नाही.

जलाशयातल्या शांत पाण्यात अचानक एखाद विवर निर्माण व्हाव पण काही काळापुरतच पुन्हा ते जलाशय शांत व्हाव एखाद्या मंद तेवणाऱ्या समईसारख अखंड प्रकाश देणार.

तसच तर सगळ आहे ना हे?? पंखात बळ आल्यावर फक्त उडायच उंच उंच. उडताना जमीनीकडे पुनः वळून बघितल तर तोल जाण्याचीच जास्त शक्यता. सगळ मागे सोडून आल्यावर त्याचा विचार सुद्धा करायचा नाही
तेवतच राहायच समईप्रमाणे.

विस्मृती आहे म्हणून तर डोक्यात विचारांच जाळ विणायला कोळ्याला वाव नाही. काळाप्रमाणे विचार, आणि प्रायॉरिटीज पण बदलतात. हेच अंतीम सत्य असेल का भरारी घेणाऱ्याच?