वाढदिवसाच्या निमित्ताने

     आम्ही अमेरिकेत असताना माझ्या नातवाचा वाढदिवस साजरा झाला.अमेरिकेत वाढदिवस घरात क्वचितच साजरे होतात.आता तर वाढदिवस बालकच (birthday boy or girl) ठरवते की पालकानी वाढदिवस कुठे आणि कसा साजरा करावयाचा .मेनू बहुतेक पिझ्झाच असणार अर्थात केकतर असणारच.वाढदिवस साजरा करण्याची सामग्रीही सगळी बाहेरच मिळते.या बाबतीत अमेरिकन पक्के धन्देवाइक आहेत.त्यांची अर्धीअधिक अर्थव्यवस्था इकडील लहान मुलेच चालवीत असणार असे वाटते.त्यामुळे टॉयझरस(ToysR us)  वा किड्झरस(KidsRus) अशी दुकाने खेळण्यांनी  आणि मुलांनी ओसंडून वहात असतात.त्या खेळण्यांच्या दुकानात हवे ते खेळ खेळण्याचीही मुभा असते.     मुलांना इतके मोकळं रान  दिल्यावर काय बिशाद आहे पालकांची मोकळ्या हाताने बाहेर पडण्याची.

       पार्टीहाउस या नावाची अशीही दुकाने आहेत की अशा समारंभासाठी लागणारा सर्व मालमसाला ते पुरवतात फक्त आपण पैसे आणि आपली मागणी नोंदवायची.  अशा सर्वगुणसंप्न्न व्यवस्थेमुले दोनतीन फोन करून वाढदिवसाची सगळी तयारी पूर्ण झाली.

    वाढदिवसासाठी ख़ास स्थळे पण आहेत.तेथे निरनिराळे खेळ मुले खेळू शकतात.काही खेळ नाणी टाकून खेळावयाचे असतात त्यासाठी आलेल्या मुलांना नाणी किंवा टोकन्सही मिळतात,अर्थातच त्याची भरपाई उत्सवबालकाच्या पालकाच्याच खिशातून हे उघडच आहे.आमच्या नातवाचा वाढदिवस करण्याच्या स्थळाचे नाव बौन्स यूं (Bounce U)  असे होते.तेथे त्यानी तीन भाग केले होते त्यातही त्यांची धन्देवाइक दृष्टी दिसते कारण प्रत्येक भागात वेगवेगळ्या बालकाचा वाढदिवस होत असतो म्हणजे सर्व जागा तीन तास एकाच कुटुंबाच्या ताब्यात न रहाता तीन कुटुंबे क्रमाक्रमाने त्या तीन भागात फिरतात.

  त्या जागेला बौन्स यू नाव देण्याचे कारण म्हणजे त्यात पहिल्या दोन भागात निरनिराळे खेळ हवेने भरलेल्या साधनांचे असतात म्हणजे उदा: घसरगुंडी प्लास्टिक अथवा लाकडी नसून हवेने भरलेल्या उशीसारखी असते त्यावरून घसरल्यावर खाली पडणार तेही हवेने भरलेल्या मोठ्या गादीवर त्यामुळे कशाही उड्या मारल्या तरी मुलांना इजा होण्याची शक्यता नसते तरीही इथल्या मालकाने पालकाकडून अगोदरच एका करारावर सही घेऊन ठेवलेली असते की आतील भागात खेळताना इजा झाल्यास (अथवा मरण पावल्यास हो हो  करारात असेही होते) त्याची जबाबदारी मालकावर नाही हो परत कुणी दावा ठोकायला नको.

   या बोन्सीवर सर्वांनी मनसोक्त उड्या मारल्या.सगळ्या खेळाना  आतल्या बाजूने एअर कॉंप्रेसरने हवा सारखी पुरवलेली असते.हवेने भरलेल्या घसरगुंड्या,चेंडू,टायर्स गाद्या या सर्वांवर उड्या मारणे यात लहान मुलांबरोबर त्यांच्या काही बापांनी ( एकाद्या दुसर्क्ष्या आईनेही)पण भाग घेतला होता.पहिल्या विभागात ४५ मिनिटे झाल्यावर तेथील दोन तरुण पर्यवेक्षकांनी शिट्टी वाजवून दुसऱ्या भागात जाण्याची सूचना जारी केली व सर्वजणांनी दुसऱ्या विभागात प्रवेश केला की पहिल्या विभागात नव्या बालकाच्या वाढदिवसचमूने प्रवेश केला.दुसऱ्या विभागातून तिसऱ्या विभागात तासाभरानंतर प्रवेश केल्यावर तेथे टेबलावर बशांमध्ये पिझ्झ्याचे तुकडे भरून ठेवले होतेच अर्थातच उड्या मारून दमलेल्या बालकांनी लगेच त्यावर तुटुन पडायला सुरवात केली.त्यानंतर केक कापण्याचा व मेणबती फुंकून विझवण्याचा सोहळा पार पडला.प्रत्येक पालकाच्या हातातला कॅमेरा सारखा क्लिकक्लिकत होताच.आता डिजिटल कॅमेरे आल्याने एकाद्या किरकोळ समारंभाचेही हजारो फोटो निघणे काही अशक्य म्हणता येणार नाही

   या वाढदिवसामुळे आमच्या मुलाच्या व आमच्याही काळातल्या वाढदिवसाची आठवण झाली.आमच्या काळात आजच्यासारखे हम दो हमारे दो किंवा एकच असा प्रकार नव्हता त्यामुळे सगळ्या मुलांचे जन्मदिवसही आईबापांच्या लक्षात रहात होते की नाही शंकाच आहे.माझ्या वडिलांनी तर शाळेत आमची नावे घालताना त्याना जी तारीख त्यादिवशी बरी वाटली ती आमची जन्मतारीख म्हणून टाकली.त्यामागे काही विशेष विचार होता अशातला भाग नव्हता.येऊनजाऊन एक गोष्ट मात्र त्यानी बरी केली ती म्हणजे प्रत्येकाचे वय पाच सहा महिन्यांनी कमीच लावले व त्याचा मला सेवानिवृत्त होताना थोडासा फायदा झाला. बर त्याना जन्मतारखा माहीत नव्हत्या असे म्हणावे तर पुढे बरीच जुनी कागदपत्रे चाळताना आमच्या सगळ्या भावंडांच्या जन्मपत्रिका अगदी व्यवस्थित त्यानी करून ठेवलेल्या सापडल्या.पण ते अगदी मी सेवानिवृत्त होण्याच्या काळात त्यामुळे तोपर्यंत मलासुद्धा माझी जन्मतारीख निश्चित माहीत नव्हती.पण त्यातल्या त्यात दोन बहिणींच्या पाठीवर जगलेला आणि पहिला मुलगा असण्याच्या अत्युच्च पात्रतेमुळे माझी आई बरेच दिवस माझा वाढदिवस मात्र घरगुती पद्धतीने साजरा करायची पण तो तिथीनुसार त्यामुळे त्या जन्मपत्रिका सापडल्यावरच मला माझ्या जन्मतारखेचा पत्ता लागला व त्यानंतर माझी बायको मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागली.

   माझा वाढदिवस मला तेल लावून अंघोळ घालून व मला ओवाळून आई साजरा करायची व त्यादिवशी जेवणात सुधारस हे ठरलेले पक्वान्न असायचे कारण ते पटकन करायला सोपे असे.फोटो वगैरे काढायला घरात तर राहिलाच पण आमच्या सगळ्या गावात त्यावेळी फोटोग्राफरही नव्हता.येऊन जाऊन महाराजांच्या कार्यक्रमाचे किंवा शाळेतील काही समारंभाचे फोटो काढणारे एक गृहस्थ होते पण तेवढा आमचा दर्जा नव्हता.त्यावेळी फोटो बहुधा जत्रेत येणाऱ्या फोटोग्राफरकडून काढले जात.

   आमच्या मुलांच्या वेळेपर्यंत थोडीशी सुधारणा होऊन पहिल्या काही वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे फोटो स्टुडिओत जाऊन काढले गेले तरीही शक्यतो त्यांचा वाढदिवस आहे हे  कोणाला कळू न देण्याची दक्षता आम्ही घेत असू उगीचच कुणाला भूर्दंड नको.आता याचा वचपा आमची नातवंडे काढताहेत.मोठा नातू अगोदरच आंतरजालावर शोध घेऊन आपल्याला वाढदिवसानिमित्त काय हवे याची यादी तयार ठेवतो.आता त्यांचा एकच नाही तर तीन तीन वाढदिवस होतात.कारण एक प्रत्यक्ष जन्मदिवशी. सुदैवाने त्यादिवशी शक्य असेल तर शाळेत तो त्याच दिवशी साजरा होतो.त्यादिवशी त्याच्या शाळेतील मित्र मैत्रिणींना खाऊ देण्यात येतो.शाळेसही त्यादिवशी पालकाकडून काहीतरी उपटता येते.त्या दिवशी शाळेस सुट्टी असेल तर मग शाळा चालू असेल त्यादिवशी म्हणजे असा तो दुसऱ्यांदा होतो व त्याच्या इतर मित्रांना सर्वांना सोयिस्कर असेल त्यादिवशी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा.मात्र एका ठराविक वय ओलांडल्यावर त्याना   वाढदिवस करून घेण्याची हौस उरत नाही असे दिसते.

    पण हल्ली आपल्याकडे काही वर्गात वाढदिवसाचे प्रस्थ फारच वाढत चाललेले दिसते.आणि त्यांच्या चाहत्यांचाच उत्साह त्याबाबतीत दांडगा असतो त्यामुळे दररोजच निरनिराळ्या रस्त्यावर वा गल्लीबोळातून मोठमोठे फलक उभारून आपल्या लाडक्या व्यक्तीचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करण्याची जणु स्पर्धाच लागलेली असते.त्यामुळे रस्त्यावर पादचाऱ्यांनाही इतक्या थोर थोर व्यक्तींचा परिचय होतो आणि आपण इतके दिवस इतक्या महान व्यक्तिमत्वाला ओळखत नव्हतो याची लाज वाटू लागते. आमच्यासारख्या रस्त्यावर जाण्याचा कंटाळा करणाऱ्यांनाही या व्यक्तिमत्वांचा परिचय करण्यासाठी दूरदर्शनच्या पडद्यावर त्यांची व त्यांच्या चाहत्यांचीही छबी पहावयास मिळून अगदी धन्य धन्य वाटते.दुर्दैवाने अमेरिकेतील अशा थोर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा परिचय मात्र तेथील रस्त्यावर अगर तेथील दूरदर्शनवर आम्हाला काही घडला नाही आणि या बाबतीत आपला देश किती पुढारलेला आहे हे कळून ऊर अभिमानाने भरून आला.