क्षणभंगूर

खाली लिहिलेले लिखाण माझे नाही.

क्षणभंगूर

२३ जानेवारी रात्र clemson इंडियामध्ये २४ जानेवारी सकाळ, मी रात्री इ-सकाळ वाचत होते आणि अचानक ब्रेकींग न्यूज पंडित भीमसेन जोशी यांचे निधन! भारतीय संगीतातील सूर्याचा अस्त.. किराणा घराण्याच्या एका मातब्बर गायकाचा!! ज्याच्या 'मिले सुर मेरा तुम्हारा' ने अख्खा भारत एका सुरात बांधला गेला.. काळाचे कोणापुढे काहीही चालले नाही, कुठलीतरी लांबून बातमी कळावी तशी पंडितजींची बातमी कळाली तेव्हा आपण किती दूर आहोत याची परत एकदा जाणीव झाली. सवाई गंधर्व, वसंतोत्सव आणि असे अनेक राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय कार्यक्रम ज्यांच्यामुळे गाजले, अमर झाले त्या प्रत्येक कार्यक्रमाचा उल्लेख पंडितजींचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यांच्या मैफिलीतले अनुभव, त्यांच्या बरोबरचे किस्से फक्त ऐकलेत अनुभवले नाहीत आणि आता अनुभवता येणारही नाहीत..

रडणे झाले, वाईट वाटून झाले आणि मग मनात विचार आला हे आयुष्याचे हे सत्य आपण रोज जगताना विसरतो आणि अचानक समोर आले की घाबरतो पण ज्या लोकांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ओथंबून जगलाय, अख्खं आयुष्य एका गोष्टीसाठी वाहिलयं  त्यांना शेवटच्या क्षणी किती सार्थकी वाटत असेल.. जसं तुकारामाच सांगणं 'शेवटचा दिवस गोड व्हावा' आणि त्यासाठी आयुष्यभर झटणं.. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाच काय? आपला शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आपला प्रत्येक क्षण किती सांभाळून हाताळणं गरजेच आहे हे उमगतय..

क्षणभंगूर खेळाच्या मांडणीत एकच असतो सत्याचा दोरा तो गवसायला सारा संसार मांडावा लागतो, जसं 'ढीगभर कपड्यातून आपला सदरा शोधा' असा लहानपणी खेळ असतो.. किती सिंबॉलिक आहे हा खेळ!!! ज्याला मोठेपणीही हा खेळ येतो आणि सगळ्यातून आपला सदरा शोधता येतो तोच मला वाटत यशस्वी होतो.. या सदऱ्याला अध्यात्मिकतेचे, सात्त्विकतेचे काठ असतात त्याचीच कास धरून अख्खा भवसागर ओलांडता येतो.. म्हणूनच अशा घटनांनी आपल्याला एक वेगळच भान येत, क्षणभंगुरतेचं आस्तित्व समजते.. पंडितजी तर कायमच त्यांच्या गायकीतून, संगीतातून अमर राहतील.. पण हे सत्यही त्यांच्यामुळेच उमगलय..

त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली!!! आणि मनः पूर्वक आदरांजली!!

- गौरी जपे
Clemson