निश्चय.. भिजल्या मनाचा...!!!

".... सुधा ए सुधा, नाश्ता दे! अगं, आणि किती वेळा सांगायचं की जरासं लवकर उठत जा, बघ रोजची  धावपळ आजही होतेय, मला आठ वाजता घराबाहेर पडायला हवं असतं, रोज अर्धा तास उशिराने  निघतो"

"अहो आले हो, डबा भरत होत्ये तुमचा आणि मनिष चा, त्याला कॉलेज  ला आज लवकर जायचय म्हणे, campus  interview आहे त्याचा...... रागिणी, अगं आटोपलास का? ये तू ही, बस पाहू नाश्ता करायला, दादा आणि बाबांसोबत..... "

"सुधा, अगं आधी मला दे वाढून, केलंस काय आज नाश्त्यासाठी? "

"पोहे केलेत गरमा -गरम, पोरही आलेत पाहा, या रे वाढते, छान ओलं खोबरं आणि कोथिंबीर  आहे सोबतीला... घ्या बरं सारे.... "

"बाबा, आज मला सोडा ना कॉलेजला, उशीर नको व्हायला मला..... मी गाडी चालवीन, तुम्ही जरा बसा निवांत..... "

"मनिष, तू पण ना कोड्यात टाकतोस बघ!!   आधीच उशीर झालाय मला निघायला, अन तुझा इंटरव्युव्ह  ही महत्त्वाचा आहे.... पण ठीक, हरकत नाही बेटा, नाश्ता करून घेउयात मग निघू आपण... सोडेन मी तुला कॉलेजला"

"अहो, मी म्हणत होते, सीमा वहिनींना दवाखान्यात  हलवलय म्हणे, जरा भेट घ्याल का दुपारी जाऊन, तुमच्या ऑफिस च्या जवळच आहे तो दवाखाना.... "

"अगं सुधा, आधीच उशिराने पोहोचायचं ऑफिसला, अन त्यात दुपारी बाहेर पडायचं?... बघतो बघतो, कसं जमेल ते पाहतो! बरं मला  पोहे वाढ थोडे अजून,   छान झालेत फार! अन रागिणी बेटा, तुझा अभ्यास कसा चालू आहे? कालही उशिरा आलीस, आजही उशिरा उठलीस, कधी बोलावं कळत नाही तुम्हा मुलांशी!!!  

"बाबा, कित्ती अभ्यास आहे, इंजिनीअरिंग सोपं आहे का? आणि हे तिसरं वर्ष, सबमिशन्स  आलेत ना डोक्यावर, म्हणून मैत्रिणीकडे गेले होते काल, उशीर झाला मग घरी यायला, रात्री पण दोन पर्यंत जागले, म्हणून आज सकाळी उशीर झाला उठायला, आणि मी करते हो नीट अभ्यास, तुम्ही नका काळजी करू... आई, माझ्या पोह्यांवर कोथिंबीर दे ना अजून..... " 

"बरं बेटा, कर चांगला अभ्यास! चल सुधा, मी आणि मनिष निघतो... तू पण खाउन घे.... मनिष आटोप पटकन!   अरे, गाडीची चावी आतल्या खोलीतच राहिली वाटत, आण  बरं" 

"अगं बाई, तुमची पाण्याची बाटली राहिलीच भरायची, आलेच हं"

"कित्ती धांदल, सुधा...? "

"दादा, तुला बेस्ट लक... आज इंटरव्युव्ह मध्ये धम्माल उडवून दे,   पहिल्या वहिल्या इंटरव्युव्ह मध्येच, नोकरी मिळवून ये...!! "    

"ओहो, thanks रागिणी... बाबा चला... "

"अहो, ही घ्या पाण्याची बाटली, दुपारी जाऊन या हं दवाखान्यात सीमा वहिनींना बरं वाटेल तुम्ही आल्याचं पाहून, मनिष हातावर दही घे, यशस्वी हो, नोकरी तुलाच मिळेल बघ...... गाडी सावकाश चालव रे बाळा.... " 

"हो आई, काळजी नको करूस, दारावरची बेल वाजली बघ.... थांब मी पाहतो कोण आलाय इतक्या सकाळी?? "

"अरे दादा, माझी मैत्रिण येणार होती... बघ आली असेल तर पाठव आत.... माझा पोहे खाणच संपलं नाही अजून..... "

"कोण आपण.... कोण हवय? "

"ते, पराग देशपांडे, इथेच राहतात काय? "

"हो, मी मुलगा त्यांचा, बोला काय काम होतं? "

"हा बुके पाठवला आहे, सावंत साहेबांनी! काल पराग साहेबांच्या निवृत्ती च्या कार्यक्रमाला ते हजार राहू शकले नाहीत म्हणून...... "

मी तो बुके घेतला, दरवाजा लाऊन घेतला.... आणि स्तब्ध झालो.... आई- बाबा रागिणी साऱ्यांची स्थिती  माझ्या सारखीच!!

आणि, मघासपासून अगदी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारं आमचं घर, घड्याळीतले सेल संपल्यागत शांत झालं.....

उदास मनाने बाबा मटकन सोफ्यावर बसले, पाठोपाठ आईही!!.....  

"सुधा, अगं कळलंच नाही गं, आज पासून ऑफिस नाही ते.... रोजच्यासारखा उठलो... तुझी पण धावपळ केली बघ.... आता तुला जरा निवांतपणा मिळेल गं.... माझ्या बरोबरीनं धावायचीस रोज....

बाबांचा पडलेला आवाज ऐकून मला कसनुसं झालं...

खरच, काल बाबा ऑफिस मधून निवृत्त झाले..... गेल्या अनेक वर्षांचा आई बाबांचा दैनंदिन कार्यक्रम मात्र कायम राहिला होता...

तीच सकाळची धावपळ!! मला आणि रागिणीला विचारपूस करणारे बाबा, आणि मायेने खाऊ घालणारी आई....

कित्ती भिनलं होतं जीवनात हे सगळं....

म्हणूनच  आज मी बाबांच्या मनातला कल्लोळ समजू शकत होतो.... त्यांच्यासारखा सतत कार्यशील राहणारा माणूस, निवृत्तीच्या नंतरच्या आयुष्याला जरा बिथरला होता....

आमच्या घराचा-बाबा- हे एकमेव "कर्ता" होते, त्याचं अनभिक्त राज्य होतं या घरावर !!

आमचं घर उभं करायला त्यांनी आजवर कित्तीतरी खस्ता खाल्ल्या होत्या! कण- कण करून, पैसा जमवत हे घर उभं केलं त्यांनी... आम्हाला एक हक्काचं- टुमदार घर दिलं- छानसं- आईच्या स्वप्नातलं घर!!   माझ्या दोन्ही आत्यांची लग्ने त्यांनी तालेवार घराण्यात  लाऊन दिली होती, कधी त्यांना काही कमी पडू दिला नव्हतं.... आम्हा भावंडांच्या  उच्च शिक्षणासाठी  प्रसंगी कर्ज देखील काढलं होतं.....

मला आठवतं तसं, अगदी दिवाळसणाला देखील कधी  त्यांना मी स्वतःसाठी काही खरेदी करताना पाहिलं नव्हतं - पण; मला, रागिणीला, आईला त्यांनी कधीही कुठल्याही सुखापासून वंचित ठेवलं नव्हतं... शेजारी-पाजारी, मित्रमंडळी, नातेवाईक ह्या साऱ्यामध्ये ते अगदी "कर्तुत्ववान अन यशस्वी" व्यक्ती म्हणून प्रिय होते!! आता  हा सारा सन्मान हरवेल, अशी भीती तर त्यांना वाटली नसेल ना?? - माझ्या ह्या विचाराने मीच चमकलो.....

आई नेहमीप्रमाणे मदतीला आली... "अहो, खरच, आता थांबुयात के जरासे आपणही... माझा मुलगा नोकरीला लागतो आहे, मुलगी छान इंजिनीअर  होत्ये आहे....   त्यांच्या पाठीशी राहू... थोडासा आराम करावाच ना?... इतकी वर्षे धावलात, आम्हाला सुखाचं आयुष्य दिलंत... आराम करायला हवाच आता... "

"हो बाबा, अहो आम्ही आहोत ना लढाईला सज्ज.... आई, आज मी नोकरी मिळवूनच दाखवीन, आणि सांगतो पहिला पगार येताच  तुला आणि बाबांना कुठेतरी फिरायला घेऊन जाईन.... "

"ओये दादा, वर्षभर थांब रे, मग मी कमावेन अन तुझं लग्न लाऊन देईन..... अश्शी  वाहिनी शोधेन ना, नाकी नऊ यायला पाहिजेत तुझ्या.... "

"हो क्का  ढमाई?    ... पाहूच बरं..... "

मग हसू पसरलं घरात-  नेहमीसारखं.... प्रसन्न! आणि आमच्या दंग्यांमध्ये आई बाबा पण सहभागी झाले.....

बाबांच्या चेहऱ्यावरचा समाधानी हास्य पाहिलं आणि सुखावलो...

बाबांची धावपळ थांबेल जरा आता, आई पण जरा विसावेल.... साऱ्या  प्रसंगाने आईचे डोळे हलके पाणावलेले जाणवले... माझं मनही भिजलं होतं...

भिजल्या मनानेच  सगळ्यांचा  निरोप घेतला, आणि घरातून बाहेर पडलो... इंटरव्युव्हसाठी!!

आई बाबांनी आता आराम करावा असा आतून वाटत होतं.... खूप कष्ट घेतले आहेत त्यांनी आमच्यासाठी आजवर... आता वेळ आमची आहे...

त्या दोघांनाही  खूप सुखी ठेवायचं, बाबांना निवृत्ती नंतरचं आरामदायी आयुष्य द्यायचं, त्यांचा सन्मान आबाधित ठेवायचा.....

आणि त्यांचं "कर्तेपण" अखंडित ठेवायचं..... असा निश्चय करतच गाडी सुरू केली....