आज बरेच दिवसांनी मनोगतवर लिहिण्याचा योग येतोय. तसं म्हटलं तर हा माझा
दुसराच लेख, पण मध्ये जरी लिहायची इच्छा झाली तरी लिहायला काही वेळ नाही
मिळाला. आज इकडे अमेरिकेत येऊन ६ महीने झाले. पाठी वळून बघताना ह्या ६
महिन्यांत कित्येक गोष्टी घडून गेल्या ह्याचा विचार केला तर मोजता येणार
नाहीत. पण, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी झाली ती म्हणजे माझी स्वतःचीच
माझ्याशी ओळख. तसं म्हटलं तर, २१ वर्षांच्या आयुष्यात तसे काय फार मोठे
अनुभव येणार आहेत आणि ते पण माझ्यासारख्या मध्यम वर्गीय मुंबईच्या मुलाला?
तसं म्हणता मी आतापर्यंत अगदी बाकीच्या मुलांसारखा इंजिनियर झालो आणि इकडे
आलो. असं म्हणायला हरकत नाही की इकडे येऊनच खरंतर माझ्या खऱ्या आयुष्याला
सुरुवात झाली. रोजच्या कामांचा काही अनुभव नाही आणि मुख्य म्हणजे
स्वतःलासुद्धा सांभाळायची बुद्धी नाही. नवीन देश, नवीन लोकं, नवीन वातावरण
सगळंच नवीन. पुरता गोंधळून गेलो होतो. स्वयंपाकापासून भांडी घासण्यापर्यंत
सगळं करावं लागत होतं आणि ह्याचं वाईट पण वाटत होतं की काय भारतातलं सुंदर
आयुष्य सोडून आलो. मनात हा पण विचार आला की आपण घेतलेला निर्णय तर योग्य
आहे ना? मनातले स्वतःबद्दलचे सगळे भ्रम दूर झाले. आयुष्यात करण्यासारख्या
गोष्टी बरोबरच बऱ्याच न-करण्यासारख्या गोष्टी करणंसुद्धा किती महत्त्वाचं
आहे हे लक्षात आलं. स्वतःच्या वागणुकीतल्या चांगल्या वाईट गोष्टी कळल्या,
स्वतःच्या देशाची किंमत इकडे आल्यावर कळली. ज्या गोष्टी मला येणार नाहीत
असं वाटायचं त्याच गोष्टी मी अगदी सराईत पणे करू लागलो. मला माझ्याशीच
संवाद साधण्याची संधी मिळाली. माझ्यातल्या चुकीच्या सवयी, माझ्या
वागणुकीतले पैलू, दुसऱ्याबरोबर राहताना करावी लागणारी ऍडजेस्टमेंट, एक
दुसऱ्याला सांभाळून राहण्याची वृत्ती मला कळून चुकली. आई-बाबांबरोबर
राहण्याचे सगळे फायदे कळले. अगदी योग्य शब्दांत सांगायचं झालंच तर, मोकळ्या
नवीन जगांत खरे टक्केटोणपे खाल्ले आणि मग खरं शहाणपण आलं. आतापर्यंत
वाटायचं की आपली वागणूक किती योग्य आहे, पण तो माझा गैरसमज दूर झाला आणि
ह्या जगात उभं राहण्यासाठी किती फाइट करावी लागते, ते अनुभवलं. अर्थात हे
सगळं करताना आई बाबांचा आधार सतत होताच. मला असं वाटतं की माझ्या
वयाचा प्रत्येक विद्यार्थी एकदातरी ह्या परिस्थितीतून गेला
पाहिजे, प्रत्येकाला स्वतःला समजण्याचा हा गोल्डन चान्स मिळालांच पाहिजे.
कारण त्या शिवाय स्वतःच्या मर्यादा कोणीही नाही ओळखू शकणार, आणि तो किंवा
ती जितकं चांगलं करू शकतात ते तितकं चांगलं करू शकणार नाहीत.
स्वतःला तयार करायचा प्रयत्न करतोय........