जाडीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळे बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटणार होते. रात्री बाराला तिला प्रत्येकाचा फोन गेला होताच. तरीपण प्रत्येकाच्याच मनात 'उद्या सगळे परत एकदा एकत्र भेटणार' अशी एक उत्सुकता लागून राहिली होती.
टॉपर आणि मी एक मस्त केक आणला. 'ब्लेक फॉरेस्ट' आणि 'पैनापल' हे नेहमीचेच फ्लेवर झालेले. कॉलेज मध्ये असताना आयटी कंपनी केक ची स्पॉन्सर नव्हती. पण ह्या वेळेस मात्र परिस्थिती बदलली होती. त्यामुळे जरा वेगळा, मस्त, महागतला केक घेतला. त्याच्यावर गुलाबाच्या फुलाची सुंदर नक्षी काढली होती.
'न' ठरल्याप्रमाणे सकाळी १२ ला सगळे जाडीच्या घरी जमलो.जाडी नी केक चा बॉक्स उघडला.
"वाs s व ! , काय मस्त केक आणलाय !" तिनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
"हो ना, खरंच खूप सुंदर आहे केक .." जाडीच्या आई आणि बाबांनी ह्या वेळेस दाद दिली."मग? मस्त च असणार.... भू.क. नी आणलाय ! " - इक्या छपरी नी एक टोमणा मारला.
"हा, म्हणजे टॉपर पण होती त्याच्याबरोबर केक घेताना " - माझी एक खडूस नजर त्याच्यावर पडल्यावर त्यानं लगेच शब्दांची सारवासारव केली. आज्या मात्र झालेल्या विनोदाचा माझ्या तोंडाकडे बघून मस्तपणे आस्वाद घेत होता. आणि नेहमीप्रमाणे माझ्या हातावर टाळी पडली.
पाश्चिमात्य पद्धतीनं मेणबत्त्या फुंकर मारून विझवल्या गेल्या आणि जाडी नी केक कापला. पूंडी आणि टॉपर नी तिला केकचा तुकडा भरवला.. खरं तर तिच्या तोंडाला केक फासायची सगळ्यांचीच इच्छा होती. पण बाबा बघत होते.. त्यामुळे दोघींनी हात आवरता घेतला आणि फक्त औपचारिकता पूर्ण केली.
तोंडाला केक लावला नाही तर मग तो वाढदिवस कसला ? हे माझं मत होतं. माझ्या वाढदिवसाला माझ्या नाकानं जास्ती केक खाल्ला होता हे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आलं.माझी पाळी आल्यावर मी पण केकचा तुकडा हातात घेतला आणि तिला भरवला. कसं कोणास ठाऊक, जाडीच्या तोंडापेक्षा तिच्या नाकानंच जास्ती केक खाल्ला.
"मग जाडे, चोवीस पूर्ण आणि पंचवीस सुरू ना ? म्हणजे यंदाच्या वर्षी बार नक्कीच उडणार .." मी एक टोमणा मारला. उपस्थितांनी जोरात हसून दाद दिली.
पण खरं सांगायचं तर तिच्या वाढदिवसाच्या आनंदापेक्षा माझ्या मनात एक वेगळंच दु:ख सलत होतं.
'परत आयुष्यात असं एकत्र येऊन 'सेलिब्रेट' करता येणारेका? पुढच्या वाढदिवसाला परत 'फक्त आम्ही सहा' जण एकत्र येऊन असाच दंगा घालू का? एकमेकांना टोमणे, चिडवणे हे प्रकार तेव्हापण होतील का? ह्या पोरींचे नवरे कसे असतील? ते सहजासहजी आमच्यात मिक्स होतील का? त्यांना चालेल का आम्ही असे भेटलेलो? आम्ही केलेली मजा त्यांना 'फालतूपणा ' तर नाही ना वाटणार ?'
ह्या गोष्टींवर अनेकदा विचार करून झाला होता. सर्व प्रश्नांचं 'नकारात्मक' उत्तर असणार आहे, हे पण एव्हाना माहीत झालं होतं.
पोटभर केक खाल्ला आणि नंतर जेवायला बाहेर पडलो. खरं तर मांसाहारी खाऊन अनेक दिवसांचा उपवास सोडायची माझी इच्छा होती. पण ह्या गोष्टीला माझ्याशिवाय इतर कोणाचाच कल मिळाला नाही आणि आम्ही सगळे परत एकदा "प्युअर वेज" मध्ये जेवायला गेलो.
सगळे जेवायला बसलो . इकडच्या तिकडच्या गप्पा रंगायला लागल्या. चेष्टा मस्करी जोरात चालू झाली. इथे बाजूला 'आई-बाबा' नव्हते त्यामुळे सगळ्यांच्याच तोंडाचा पट्टा सुटला होता.
एक नक्की जाणवत होतं. सगळ्यांच्या वागण्यात एक बदल दिसत होता. जे काही विनोद चालले होते त्यामध्ये सगळे पूर्णपणे सामील होत होते. प्रत्येक जण येणाऱ्या प्रत्येक क्षणातून जास्तीत जास्त आनंद मनात साठवून ठेवत होता. प्रत्येकजण स्वतःबद्दल अनेक दिवस लपवून ठेवलेल्या गोष्टी समोर ठेवलेल्या 'मनाच्या' ताटांमध्ये वाढत होता.
मोठ्या शोधमोहिमेनंतर अखेर 'जॉब' लागल्याचा इक्या छपरी नी स्फोट केला. तर पूंडी नी 'काही दिवसांपूर्वी तीच्या मागे कॉलेज मधला एक मुलगा लागला होता' असं गुपित फोडलं.
जेवण संपवताना एकमेकांनी एकमेकांच्या ताटात वाढलेलं सगळं आपापल्या झोळीत भरलं आणि सगळे हसत खेळत बाहेर आलो. "ए पूंडी, अगं इतकं सगळं झालं .. आधी सांगायचं नाहीस का?" तिला दिलासा द्यायच्या हेतूनं तीच्या खांद्यावर हात ठेवून मी बोललो.
पण परत एकदा मनात पाल चुकचुकली. आमच्या सगळ्यांमध्ये तयार झालेलं मैत्रीचं हे स्वच्छ, सुंदर, नितळ नातं अजून किती दिवस टिकेल? गोष्ट फक्त 'फ्री ली' वागण्याची नव्हती तर आमच्यामध्ये चालत असलेली विचारांची देवाण-घेवाण आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता ह्यांची पण होती.
गेले ३-४ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. प्रत्येकाला कधी न कधीतरी खडतर मार्गावरून जायला लागलं आहे. जायला लागत आहे. प्रत्येक वेळेस सगळे एकमेकांना आधार देत आलो आहोत.लग्नानंतर सगळे आपापल्या आयुष्यात मग्न होतील. एकमेकांच सांत्वन करायला आणि एकमेकांच्या आनंदात सामील व्हायला कुठेतरी मर्यादा येणार होत्या. इतका मोकळेपणा राहणार नाही याची परत एकदा जाणीव झाली.
विचार करत असताना माझा हात चटकन खाली आला.
घरी परत येताना गाडीवरती जाडीशी ह्याच विषयावर गप्पा झाल्या. ह्या गोष्टीची जाणीव तिला पण झालीच होती की..
एकदा 'कमिटमेंट' झाल्यावर जर आयुष्य नीट घालवायचं असेल तर ह्या 'मनमोकळे पणाला' कुंठतरी आवर घालणं गरजेचं आहे असं तीच पण मत होतं.
ह्या सगळ्यातून एक सुंदर मार्ग नेहमी माझ्या मनात येतो...
सगळ्यांच्या जोडीदारांना पण आमच्यात सामील करून घेता येईल. ग्रुप मधले 'मेंबर्स' वाढतील, नवीन मित्र होतील, नवीन विचारांची देवाणघेवाण होईल.
ह्या मार्गाला सुद्धा एक 'पण' नेहमीच जोडला गेलेला असतो .. सगळं शेवटी आपापल्या 'पार्टनर' वर अवलंबून असणार होतं.आमचं हे मैत्रीचं सुंदर नातं असच टिकून राहू दे हिच प्रार्थना रोज देवाकडे करतो.