शाल

शाल

डिसेंबरचा महिना. एकूणच थंडी वाढत चाललेली. संध्याकाळी ७ नंतर घराबाहेर
पडणारे जरा विचार करूनच बाहेर जात होते. पिरनेवाडी हे तसे निसर्गरम्य
ठिकाण. वाडीच्या चारही बाजू डोंगररांगांनी वेढलेल्या. डिसेंबर महिन्यात
दिसणारी डोंगररांगांची ती हिरवी शाल कुणाच्याही मनाला वेड लावेल अशीच
असायची. थंडीच्या दिवसात पडणारी कडाक्याची थंडी गावकर्‍यांची बरीच कामे
गोठूनच टाकायची. संध्याकाळनंतर अंगावर येणारे वारे धगधगत्या सूर्यालाही
गोठवून टाकतील इतके थंड असायचे. मग, अर्धवट कपड्यांत आपले राकट, मळकट शरीर
झाकणार्‍या गावकर्‍यांची काय कथा! आपला भारत देश जगाच्या दृष्टीने कितीही
समृद्ध झाला असला, नागरीकांच्या सुजाणतेचे दाखले देत आणि वैश्विकतेच्या
गप्पा मारीत असला; तरी 'अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा
आहेत' इथपर्यंतच या गावकर्‍यांचे 'नागरीक'शास्त्र मर्यादित राहिले होते.
डोंगर, दर्‍या, रानावनात हिंडून वेगवेगळ्या प्रकारची फुले, मुळ्या गोळा
करणे आणि मुख्य गावातून येणार्‍या पालकर नावाच्या कोण्या एका दलालाला देणे
एवढेच त्यांना माहित होते. दलाल देईल तेवढे पैसे, धान्य, इ. आपले असेच सर्व
मानून होते. ही फुले, मुळ्या पालकर शहरातल्या आणखी एका वैद्यक दलालाला औषध
निर्मितीसाठी विकत असे. म्हणजे गावकर्‍यांना एक रुपया मिळाला की पालकरला
कमीत कमी ७ रुपये मिळत असत. अशा चार ते पाच गावांचे कॉंट्रॅक्ट
त्याच्याकडे होते. प्रत्येक रविवारी पालकरची मोठी गाडी म्हणजे जीप येत
असे. त्यात जेवढे सामान असेल तेवढे सर्वांना मिळायचे. कधी कमी पडले तर
तक्रार करायची नाही. तक्रार करणार तरी कुठे? वाडीत इन-मीन १९ घरे. कमी पडले
तरी कोण कोणाकडे मागणार? सर्वच फाटके! असेल त्यातच समाधान मानून सर्व रहात
होते. शहर वगैरे सोडाच पण तालुक्याच्या मुख्य गावालासुद्धा या वाडीतले
लोक जात नसत. त्यांचे सरकार म्हणजे पालकर. पालकरची वाडीत आलेली गाडी म्हणजे
त्यांना पुष्पक विमानच वाटत असे. वाडीत सर्व पिरने. पिरने हे नाव कसे आले
हे कोणासच माहीत नाही. मात्र सर्व पिरने म्हणून पिरनेवाडी. तसे ती वाडीच.
मूळ गाव होतरे. तेही तसे मोठे नव्हतेच. होतरेपासून जवळपास ६ किलोमीटरवर
त्या गावची ही वाडी होती. वाडी म्हणायचे आपले! खरेतर वस्तीच! घरे किती?
फक्त १९ घरे. या १९ घरात मिळून असे किती लोक असणार? फारफार तर ७०-७५. पण,
आजूबाजूला जवळपास ६ किलोमीटरपर्यंत दुसरी वस्तीच नाही. म्हणून याला वाडी
म्हणायचं. कारण, ही वाडी चारही बाजूने डोंगरांनी वेढलेली. डोंगरांच्या
आडोशानेच या वाडीत प्रवेश मिळत असे. वाडीत जवळपास ६० वर्षांपूर्वी ७
कुटुंबे आली. आडरानात राहणारी आणि मिळेल ते खाणारी अशी ही कुटुंबे होती.
त्याचीच आता १९ झाली. साधारण २५ वर्षांपूर्वी पालकरचे वडील जंगल निरीक्षण
करीत असताना त्यांचे लक्ष या वस्तीकडे गेले. इथल्या रानात औषधी झाडे आहेत
हे त्यांना माहीत होते. ते अशा औषधी वनस्पती, फुले, मुळ्या गोळा करून
वैद्यक संशोधनासाठी देत असत. मात्र एकटे किती नेणार? ते वाडीत आले. चौकशी
करता त्यांना समजले की वाडीतील अडाणी लोक या कामाला उपयोगी आहेत. त्यावेळी
त्यातील फक्त दोन हुशार लोकांना घेऊन त्यांनी कोणती फुले, मुळ्या घ्यायच्या
याची माहिती दिली आणि धंदा चालू केला. सुरुवातीला जेवढ्यास तेवढे मिळत
होते. मात्र पालकरचे वडील गावकर्‍यांना काही मदतही करत. त्यामुळे गावकरीही
त्यांना मान देत असत. हाच व्यवसाय पालकरनेही वडिलांच्या पश्चात सुरू ठेवला.
त्याने एक मालदार वैद्यक दलाल गाठला. सुरुवातीला थोडे कमावणारा पालकर आता
दुप्पट-तिप्पट मिळवू लागला. पुढे आणखी फायदा वाढला. लोकांचे मन राखण्यासाठी
पालकरही थोडी-थोडी मदत करू लागला. कधी काही किराणा सामान देऊ लागला.
सुरुवातीला तर या लोकांना हे किराणा सामान कसे वापरायचे हे सुद्धा माहीत
नव्हते. हळूहळू खाद्यपदार्थ बनवायला जमलेच आणि वाडीत पालकरने आणलेल्या
शिक्षकामुळे सर्वसामान्य माहितीही मिळत गेली. गाव तसे अडाणीच राहिले. पण
पूर्वीच्या मानाने आता कमी अडाणी.

वाडीत एक चांगले होते की तेथे एका झाडाखाली आणि पावसाळ्यात मिळेल त्या
आडोशाला शाळा भरायची. वाडीत शिकलेले तसे कुणीच नाही. त्यामुळे १२
किलोमीटरवरील बारवे गावातून एक मास्तर यायचा. पालकरनेच त्याची नेमणूक केली
होती. मास्तर गावकर्‍यांच्या मानाने बराच शिकला होता. म्हणजे सातवीपर्यंत.
या मास्तरमुळे गावकर्‍यांचा एक फायदा असा झाला की मुलांबरोबर काहींना १ ते
१० अंक मोजता येवू लागले. आतापर्यंत सर्व मोजमाप बकालूवरच व्हायचे. बकालू
म्हणजे पिरनेगावच्या घनदाट डोंगरात मिळणारा हिरवट पिवळ्या रंगाचा एक दगड.
अतिशय रेखीव आणि सहसा एकाच आकारात मिळणारा. या दगडाचा ठराविक आकार आणि वजन
मोजमापासाठी चांगले होते.

अशा या वाडीमध्ये चिमा पिरने नावाचा एकजण रहात होता. चिमा पहिल्यापासूनच
निरीक्षण करणारा. त्याला सारखे काहीतरी नवीन हवे असायचे. लहानपणापासूनच या
गोष्टीसाठी त्याने वडिलांचा भरपूर मार खाल्ला होता. डोंगरावर एकदा ज्या
वाटेने जात असे त्याच वाटेने परत आलेला त्याला कुणी पाहिला नाही.
डोंगरावरील प्रत्येक झाडाचे, वेलीचे तो निरीक्षण करीत असे. घरी आल्यावर आई,
वडीलांना त्याबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. अज्ञानाने परीपूर्ण
असलेल्या आणि त्यातच आपली धन्यता समजत असलेल्या गावकर्‍यांनाही त्याच्या
प्रश्नांचा वीटच आला होता. अत्यंत कुतुहलाने विचारलेल्या प्रश्नांना
अर्थातच चार-दोन फटक्यांनीच उत्तर मिळत असे. या चिमाचा मुलगा भिका.
वडिलांप्रमाणेच निरीक्षक. चिमाच्या निरेक्षणशक्तीमुळे भिका चिमाचेच
निरीक्षण करीत असे. कारण, त्यातच त्याला उत्तर मिळत असे. मुलाच्या या
हुशारीवर चिमाही खूश असे.

गाव तसे भक्तिमार्गाला मानणारे होते. दरवर्षी काही ठराविक वेळी
पालकरबरोबर जेधेबुवा येत असत.या जेधेबुवाची सरबराई करण्यासाठी पालकरची
माणसे हजरच असत. जेधेबुवाला इथे आणण्यात पालकरचा फायदाच होता. एकतर वाडीत
आपल्याविरुद्ध कोणी ब्र काढणार नाही. तसेच, गावकर्‍यांच्या माध्यमातून
जेधेबुवाला आपली भक्तीही दाखवता येईल. कारण, हा बुवा तालुक्याच्या कचेरीत
कामाला होता. त्याच्यामार्फत जेवढे करता येईल तेवढे पालकरने याआधी केलेच
होते.

चिमा रोज संध्याकाळी बरोबर सूर्य मावळला की घरी येत असे. हातात एक फांदी
तोडून बनवलेली काठी, खांद्यावर फुलांचे, मुळ्यांचे बोचके, उद्याच्या
स्वयंपाकासाठी मिळालेली लाकडे असे घेऊन झुकलेल्या अवस्थेत येत असे. घरी आला
की "आऽऽऽऽ" असा मोठा आवाज काढून दमलेल्या शरीराची वर्दी देत असे. हा आवाज
ऐकला की हौसा म्हणजे चिमाची बायको बाहेर येत असे. हसर्‍या चेहर्‍याने
स्वागत करून सर्व आत नेवून ठेवत असे. चिमाचे एक होते. त्याला थंडी फार वाजत
नसे. त्यामुळे बाकीचे सूर्य मावळायच्या आतच घरी यायचे आणि चिमा मात्र
सूर्य मावळल्यानंतर.

एकदा चिमा घरी आला तेंव्हा भिका बाहेर नव्हता. त्याने हाक मारली. हौसा बाहेर आली आणि म्हणाली,
"भिका थंड करतंय. चुलेजवळ बसवलंय."

"बहेर बोलव अतं..."

"हय.." असं म्हणत हौसाने चिमाने डोंगररानातून आणलेला माल आत नेला.
सात वर्षांचा भिका बाहेर आला तोच मुळी दोन-तीन कापडं पांघरून.

"कय रं?"

"थंड.."

"जवळ हतं.."

भिका चिमाजवळ गेला. चिमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला,
"अंय.. बंर ना? थंड रहनार. घबरायचं ना."

"बंर.." तीनातला एक कपडा भिकाने काढून ठेवला खरा. पण, चिमाचं लक्ष नाही
असं पाहून पुन्हा घेऊन आत गेला. खरं तर चिमानं पाहिलं होतंच. पण, मनातल्या
मनात हसून पुढच्या कामाला लागला.

त्याच रात्री जेधेबुबाचं कीर्तन होतं. कीर्तन म्हणजे काय - पाऊण-एकतास
देवाच्या गोष्टी सांगायच्या आणि गाऊन दाखवायचं इतकंच. साथीला काय? ३ टाळ, १
जुना मृदंग, १ बाजाची पेटी आणि जमेल त्या स्वरात गाऊन साथ देणारे सहकारी.
कसेही असले तरी जेधेबुवांना पिरनेवाडीत आल्यावर मान होता. त्यांचे कीर्तन
ऐकायला बहुतेक सर्व घरातील कोणी ना कोणी जमायचेच. साधारणपणे ५० जण असायचे.
एखादी पौराणिक कथा सांगून एखादे भजन गाऊन गावच्या ओबडधोबड गणपतीच्या
मूर्तीला बुवाने साष्टांग नमस्कार घातला की कीर्तन संपायचे. गावकर्‍यांना
तरी फारसं कुठे माहित होतं कीर्तनातलं. दरवर्षी २ वेळातरी जेधेबुवांचे
कीर्तन या वाडीत व्हायचे. जेधेबुवा येणार असे कळले की लगेच लगबग सुरू
व्हायची. वाडीतल्या त्या गणपतीसदृश मूर्तीला डोंगर रानातीलच फुलांचा हार
घातला जायचा. विविध प्रकारच्या पानांनी तो देवाचा आडोसा सजवला जायचा.
रात्री ८ वाजता कीर्तन असायचे. ते साधारणपणे २ तास चालायचे. ५० लोकांमध्ये
४-५ लहान मुलेही असायची. भिका त्यातलाच एक.

जेधेबुवाचे एक वैशिष्ट्य होते की तालुक्याच्या गावात तो सजुन-धजुन असे.
मात्र, इथे कीर्तनाला येताना तो साधाच येत असे. पांढरा सदरा आणि धोतर असे.
पण तेही फार स्वच्छ नसे. त्यामुळे गावकर्‍यांना तो आपलाच वाटत असे.
यावेळीही तो तसाच आला होता. चिमा कधीच कीर्तन चुकवत नसे. आज चिमा जेंव्हा
भिकाला घेऊन गेला तेंव्हा भिका डुलक्या घेत होता. मात्र सावध होता. इतर
गावकर्‍यांचं एक वैशिष्ट्य होतं की भलेही कीर्तन चालू असताना ते डुलक्या
घ्यायचे, मात्र सत्कार करताना एकदम उत्साहात असायचे. कारणही तसेच होते.
बुवाच्या सत्कारानंतर बुवाने आणलेला सुंठवडा सर्वांना मिळत असे. ही सवय
चिमाला नव्हती. त्याच्यासारखेही दोन-चार होते. जे कीर्तन मनापासून ऐकायचे.
भिका थोडा वेगळा होता. भिका वयाच्या पाचव्या वर्षापासून नियमित कीर्तन ऐकत
असे. कीर्तन सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जागचा हलत नसे. अतिशय
तन्मयतेने कीर्तन ऐकत असे. तसे तर सर्वच लोक ऐकत असत. त्या कीर्तनातले
त्यांना काही फारसे कळत वगैरे असेल असे नाही. मात्र जेधेबुवा जे सांगणार ते
चांगलेच असणार अशा भोळ्या समजुतीने ते सर्व लोक कीर्तन ऐकत असत. कीर्तन
संपल्यावर शाल देऊन बुवाचा सत्कार पालकर करायचा. इतका वेळ अतिशय तन्मयतेने
कीर्तन ऐकणारा भिका यावेळी मात्र अस्वस्थ असायचा. आपल्या वडिलांना - चिमाला
घरी चलण्याचा आग्रह करायचा. सत्काराच्या वेळी देण्यात येणारी शाल त्याला
अस्वस्थ करायची. तिचा काहीतरी नक्कीच उपयोग असणार. पण नेमका काय? हे
त्याच्या अजूनही लक्षात येत नव्हते.

आजही जेधेबुवांचे कीर्तन चांगलेच रंगात आले होते. सर्वजण कीर्तन आणि
भजनात तल्लीन झाले होते. जांभई आणि आकार यांचे मिश्रित उच्चार करीत काही
गावकरी भजन करीत होते. बाकीचे समजल्याप्रमाणे माना डोलवत होते. काहींच्या
माना डुलक्यांच्या तालावरही डोलत होत्या. जेधेबुवा काही उत्कृष्ठ
कीर्तनकारांपैकी होते असे नव्हे. मात्र, पिरनेवाडीला दुसरा कीर्तनकार
माहीतच नव्हता.

आजही कीर्तन चालू असताना तन्मय असणारा भिका कीर्तन संपल्यावर चिमाला घरी
चलायला सांगू लागला. चिमाला वाटले हा कंटाळला असेल. म्हणून सुरुवातीला
त्याने नेहमीप्रमाणे लक्ष दिले नाही. मात्र भिका जास्तच आग्रह करू
लागल्यावर चिमा वैतागून म्हणाला...

चिमा : जरं.. थांब... तं बग जरंsss
भिका : तं नंय अवडंत...
चिमा : नंय अवडंत? कं...
भिका : नंय.
भिकाने अशापद्धतीने नकारात्मक मान हलवली की चिमासुद्धा विचारात पडला.

सत्काराच्यावेळी रिवाजाप्रमाणे बुवाला पालकरने शाल दिली.

शाल स्वीकारताना जेधेबुवा पालकरकडे पाहून गमतीनं म्हणाला,
"या शालीमुळे आता थंडी वाजणार नाही बरं..." आणि पालकरसह हसायला लागला.

या जेधेबुवाच्या वाक्यानंतर तर चिमाच्या हाताला झटका देऊन भिका घराच्या दिशेने चालूही लागला.

थंडीमुळे आपले दोन्ही गुडघे एकमेकांवर लावून त्यावर दोन्ही हाताने मिठी
मारून बसलेले गावकरीही विनोद कळल्यासारखे हसले. शालीमुळे थंडी जाते हे
समजल्यामुळे आधीच जास्त थंडी वाजत असलेल्या भिकाला ती शाल पाहून आणखीनच
थंडी वाजायला लागली. बुवाला मिळालेली शाल डोक्यात ठेवूनच भिका चिमाबरोबर
घरी आला.

चिमा अनुभवी असल्याने कीर्तनात नेमके काय सांगितले ते भिकाला सांगायचा
प्रयत्न करीत होता. भिका मात्र एकही शब्द न उच्चारता चालत होता. चिमाने
विचारलेल्या प्रश्नांनाही तो उत्तर देत नव्हता. मध्येच विचित्र नजरेनं
चिमाकडे पाहत होता. चिमाला वाटले थंडीमुळे किंवा काही न समजल्यामुळे भिका
असं करीत असेल. प्रत्यक्षात मात्र भिकाच्या डोळ्यासमोर बुवाला दिलेली शालच
येत होती. दोघेही घरापाशी आले.

भिका लगेचच आत गेला. खरं तर थंडी जरा जास्तच होती. म्हणून आल्याबरोबर
चिमाने हात चोळायला सुरुवात केली. चिमा बाहेरच खाटेवर हातावर हात चोळत "हू
हू..." करीत बसला होता. एवढ्यात भिका बाहेर आला. चिमाची अशी अवस्था बघून
एकटक बघत राहिला. चिमानं त्याला असं एकटक आपल्याकडे बघताना पाहिलं आणि
प्रश्नार्थक नजरेनं भिकाकडे एकदा बघितलं. तरीही भिका बघतच होता. पिळदार आणि
राकट शरीरयष्टीचा चिमा हात चोळताना भिका एकटक पाहत होता. चिमाने खुणेनेच
"काय?" असे विचारले. तरीही भिका पाहतच होता. आता चिमाला राहवले नाही.

"कय?" चिमा मोठ्याने म्हणाला. तसे दचकून भिका भानावर आला.

"कय? तुलं बी थंड ना..?" भिकाने मोठ्या मिस्किलीने विचारले.

"हय.." पराभव झाल्यासारख्या आवेशात चिमा म्हणाला.

"मग? हयंच की! " मोठ्या विश्वासाने युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात भिका म्हणाला.

"मग?" त्याचा आविर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने चिमाने विचारले.

त्यावर भिका म्हणाला, "तुलं इवडं कापड पुरंल?"

"हय.." चिमा हो म्हटला खरा. पण त्याच्या होकारामध्ये आज नेहमीसारखा दम नाही हे भिकाच्या लक्षात आले.

"तं... शालनं थंड जातंय हय?" थोडा विचार करून भिका म्हणाला.

"शाल..?" चिमाने शब्द प्रथम उच्चाराला आणि भिकाला काय म्हणायचे आहे ते
त्याला नंतर कळले. चिमाला आता समजले की त्या शालीमुळेच भिका आपल्याशी
रस्ताभर बोलत नव्हता. त्याचे लक्ष आपण काय सांगतो आहोत याच्याकडे नव्हते तर
बुवाला मिळालेल्या शालीकडे होते.

"असं लशात ठवतंय हंय कुन ?" चिमाने समजावण्याच्या सुरात भिकाला विचारले. तो पुढे म्हणाला ...
"असं बगु नंय कुनचं..."

"शालचं बुवा काय करनार..?" भिकाने आपला होरा कायम ठेवला.

या भिकाच्या प्रश्नावर पटकन काय उत्तर द्यावे हे चिमाला समजले नाही. मात्र वेळ घालवण्याच्या उद्देशाने त्याने भिकाला जवळ बोलावले.

"बस.." भिका जवळ बसल्यावर चिमा म्हणाला,

चिमा : "शालचं बुवा बघंल? अपेला कय..? "

भिका : "बुवालं थंड जास हुतंय कय..?"

चिमा : "तं बुवालं ठाव.."

भिका : "तुलं बी थंड असंल ना?"

चिमा : "हय की!"

भिका : "तुलं बी शाल हवं...?"

बुवाला दिलेली शाल भिकाने स्वत:साठी नाही तर आपल्यासाठी मनात ठेवली याचं
चिमाला खूपच आश्चर्य वाटलं. आपला मुलगा फक्त स्वत:चा विचार करीत नाही हे
पाहून चिमाला धन्य वाटलं.

"मलं कय करायचं शाल ?" असे बोलून चिमाने विषय संपवण्याच्या उद्देशाने
अंगावर घ्यायच्या कपड्याची खरेतर चिंध्यांची जुळवाजुळव सुरू केली.

"तुलं हवंच.." भिका निर्धाराने बोलला.

"मलं हय शाल.." चिमा म्हणाला.

चिमाच्या य वाक्यामुळे भिकाचे डोळे एकदम विस्फारले गेले. तो आश्चर्याने थक्कच झाला.

"तुलं हंय? कतं..?" भिकाच्या या प्रश्नावर चिमा फक्त खो खो हसला.

"हसंय कंय?" भिका पुन्हा म्हणाला. चिमा पुन्हा हसला. कारण, नसलेली शाल चिमा कोठुन दाखवणार होता..! तो हसतच म्हणाला,

"मलंच नाऽऽ... समद्यालं हंय शाल..?"

कोडे न उलगडल्याने विचित्र झालेला भिकाचा चेहरा बघून चिमा म्हणाला,

"तंऽऽऽऽ.. बग." चिमाने दाखवलेल्या दिशेला भिका पाहू लागला. काहीच न समजल्याने भिका पुन्हा चिमाकडे पाहू लागला. चिमा म्हणाला,

"तं... डोंगररान हंय..... तंच अपलं शाल. तं अपलेलं फूल देतं, मूलय देतं.
तं अपलेलं चुलेलं काडी देतं. बहेरचं थंड तं अडवून असं. तं असं, महून अपले
अंगलं कपडं असं. तं हिरवं रान ना... तंच अपलं हिरवं शाल. तं कडं नुसतं
बगायचं. बगत... बगऽऽत बसाचं. थंड अपाप जातं बग."

चिमाने नक्की काय सांगितले हे भिकाला अजूनही समजले नव्हते. मात्र भिका त्या डोंगररानाकडे बघत बसला.

चिमा रानातल्या गोष्टी भिकाला सांगू लागला. त्यातच भिका झोपी गेला.

********** क्रमश: **********