चंद्रभागेच्या तीरी .. भगतांची मांदियाळी
टाळ चिपळ्यांची खेळी .. गर्जे सांज अन सकाळी ॥
नाचे किर्तनाच्या रंगी .. भक्तिरस अंगोपांगी
हर्ष दाटे अंतरंगी .. गुण विठ्ठलाचे सांगी ॥
हरिनामाचा गजर .. ऱ्हुदयी हरीचा वावर
पाकळी पाकळी अंतर .. गंध भरे निरंतर ॥
ओढ पावलासी लागे .. नाम जप मुखी रंगे
सावळ्याच्या दर्शना गे .. संत पुढे , जन मागे ॥
शोभे तुळशीमाळ गळा .. माथी चंदनाचा टिळा
विठू साक्षात सावळा .. माया त्याची जनसकळा ॥
दिंडी भक्तांची ही चाले .. ध्वजा भक्तीचीच डोले
वाळवंटी जन आले .. श्वास, श्वास विठ्ठल झाले ॥
जनभक्तीचा सागर .. विठूनामाचा जागर
भक्तीचाच गहिवर .. भारलेले चराचर ॥
झाले कैसे अपरूप .. सावळे सगुण स्वरूप
पाहूनीया हे आरूप .. सान थोर एकरूप ॥